computer

ओझोन आवरणाला अजून एक भगदाड!! शास्त्रज्ञांचा दावा...

ओझोन हे नाव पहिल्यांदा आपण वाचले असेल ते शाळेत असताना. तेव्हापासून आपल्याला एक गोष्ट माहीत असते ती म्हणजे ओझोन थर आणि पर्यावरण यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि पृथ्वीसाठी ओझोन हा अतिशय महत्वाचा आहे. ओझोन थर ज्या वेगाने कमीकमी होत आहे ही गोष्ट आजच्या ग्लोबल वॉर्मिंग विषयातील सर्वात जास्त चिंतेची बाब ठरत आहे.

आजवर हा विषय अनेकवेळेस आणि विविधांगांनी चर्चिला गेला आहे. सोबतच वैज्ञानिक क्षेत्रात बऱ्याचदा हा मुद्दा विवादास्पद देखील ठरला आहे. या सर्वात सध्या अजून एक नवी बातमी पर्यावरण विषयात रस असलेल्या लोकांबरोबरच प्रत्येकाला चिंतेत टाकू शकते.

जगातील ५० टक्के जनतेच्या जीवावर बेतण्याची क्षमता असलेले अतिविशाल ओझोन छिद्र उष्णकटिबंधीय क्षेत्राच्या खालील भागात आहे याचा शोध घेण्यात आला आहे. ए आय पी अडवान्सेसमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या नवीन अहवालात हे उघड करण्यात आले की हे नवीन ओझोन होल हे (फक्त वसंत ऋतूमध्ये दिसणाऱ्या) आर्क्टिक ओझोन होलपेक्षा तब्बल सातपटीने मोठे आहे.

ओंटारिओ, कॅनडा येथील वॉटर्लू विद्यापीठाचे प्राध्यापक क्विंग बिन लू यांनी त्यांच्या संशोधनात मोठा दावा केला आहे, हे नवीन ओझोन होल १९८० पासून तेथे अस्तित्वात आहे, विशेष म्हणजे त्याची जागा बदलत नाही. आर्क्टिकच्या ओझोन थराप्रमाने तो ये-जा करत नसून तो सुरुवातीपासून तसाच आहे. प्रोफेसर लू यांचे असेही म्हणणे आहे की, हे दोन्ही ओझोन छिद्रे खोलीच्या बाबतीत अगदी सारखी आहेत.

या अहवालाचे साधेसोपे मराठी नाव हे'उष्णकटबंधातील लक्षणीय तसेच सर्व ऋतूंमधील ओझोन थराचे वितळणे' असे होऊ शकते. या प्रसिद्ध झालेल्या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, ही निरंतर वर्षभर अस्तित्वात असणारी ओझोनमधील पोकळी ही अतिनील किरणांच्या वाढीमुळे पुढे पृथ्वीवरील ५० टक्के क्षेत्रफळाला हानी करू शकेल.

टेक्निकल भाषेत म्हटलं तर ओझोन होल हा काही शब्दश: होल नसते. ती ओझोन थरातील अशी जागा असते जेथे ओझोन थराची पातळी खूप कमी असते. जेथील ओझोन पातळी ही २२० डॉब्सन युनिटपेक्षा खाली घसरते तेव्हा तिथे ओझोन होल आहे असे म्हटले जाते. डॉब्सन युनिट हे ओझोनच्या पातळीचे मोजमाप करण्याचे मापक आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) च्या मते ओझोन थर हा सध्या नवनिर्मितीच्या अवस्थेत आहे. १९८७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनात माँट्रियल प्रोटोकॉलनुसार हे ठरवण्यात आले की, सीएफसी(chlorofluorocarbon आपल्या फ्रीजसारख्या उपकरणांतून उत्सर्जित होणारा वायू)सारखे केमिकल हे ओझोन थराला सर्वात घातक ठरत असून त्यांच्या निर्मितीवर तत्काळ प्रतिबंध लावण्यात यावा. असे ठराव प्रत्येक परिषदेत होतच असतात. पण त्यांचे पुढे काय होते हे सर्वांना माहीत आहे, म्हणूनच असे अहवाल वाचले कि मानवाचे डोळे खाडकन उघडतात. पण थोड्या दिवसांनी परिस्थिती जैसे थे असते.

लू यांचे असे म्हणणे आहे, की या नवीन सापडलेल्या ओझोन होलच्या दरम्यान येणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रचंड मोठा धोका आहे. प्रमाणित व्याख्येनुसार मांडायचे म्हटले तर प्रोफेसर लू म्हणतात की, ओझोनचा ज्या क्षेत्रात बाकी क्षेत्रांच्या तुलनेने २५ टक्के ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते, त्या क्षेत्राला आपण ओझोनमधील होल असे म्हणू शकतो.

लू म्हणतात की, ओझोनच्या उत्तर ध्रुवीय क्षेत्रात तुलनेने २५ टक्के जास्त हानी झाली आहे. म्हणून ही नवीन व्याख्या बरोबर आहे असं म्हणायला वाव आहे. असे असताना सुद्धा उष्णकटिबंधीयातील ओझोन थर हा २२० डॉब्सन युनिट ओलांडतो म्हणून लू म्हणतात की तेथील ओझोन थराला आपण ठराविक परिमाण लावून मोजू शकत नाही. तर त्यासाठी वेगळी व्यवस्था गरजेची आहे.

ओझोन हा नैसर्गिकपणे पृथ्वीच्या समशीतोष्ण मंडळात सापडणारा पदार्थ आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील जीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. हा उपयोगी ओझोनचा थर हा काही मानवनिर्मित रसायनांमुळे वितळत आहे. ते रसायन म्हणजे मेथिल ब्रोमेड, कार्बन तेट्राक्लोराईड, हल्लोंस, सीएफसी, एचसीएफसी आणि मेथील क्लोरोफॉर्म.

वाहने, पॉवरप्लांट, इंडस्ट्री मध्ये वापरले जाणारे बॉयलर, रिफायनरीज आणि केमिकल इंडस्ट्री मुळे होणाऱ्या प्रदूषणाचे सूर्यप्रकाशासोबत प्रक्रिया होऊन हा ओझोन निर्मित झाला आहे. यातली बरीचशी माहिती आपण शाळेत वाचलेली असते. पण दिवसेंदिवस ओझोनची होत जाणारी दुरवस्था सोडल्याशिवाय यात नवी कोणतीही घडामोड घडताना दिसत नाही.

अनैसर्गिक मानवनिर्मित रसायनांच्या अतिवापरामुळे ओझोन थराची पातळी कमी होणे यालाच आपण ओझोन थर वितळणे असेही म्हणू शकतो. ओझोन हा मानवनिर्मित गोष्टींमुळे कमीकमी होत आहे, हे आता काही वेगळे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. अशातच, ODS चे आकडे हे दाखवत आहेत की ओझोनचा स्तर हा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. म्हणजेच धोक्याची घंटा अधिकच जोरात वाजू लागली आहे.

ओझोनला हानी पोहोचणाऱ्या रसायानांचा वापर हा आपल्या रोजच्या जगण्यात नेहमीच होत असतो. कूलर असो किंवा अग्निशामक उपकरणांमध्ये असो की कीटकनाशकांमध्ये असो हे रसायन वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर खूप मोठ्या कालावधीपर्यंत नष्ट होत नाहीत. ही रसायने खरंतर कितीतरी वर्षे ते troposphere ते stratosphere मध्ये प्रवास करत राहतात. शेवटी अतिनील किरणांसोबत त्यांच्या संपर्क होऊन ते नष्ट होतात, पण त्यांचे रूपांतर क्लोरिन किंवा ब्रोमिन नावाच्या रसायनामध्ये होते हे दोन्ही रसायन ओझोनसाठी खूपच हानिकारक आहेत.

ओझोनच्या वितळण्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात शिरणाऱ्या अतिनील किरणांमुळे माणसांमध्ये त्वचेचा कॅन्सर आणि मोतीबिंदूसारख्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, हे तुम्ही अनेकठिकाणी वाचले असेल. यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याचा थेट परिणाम माणसांच्या प्रतिकारक्षमतेवर सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमतेवर देखील याचा वाईट परिणाम होऊ शकतो. एका अर्थी थेट माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सर्व विषय आहे.

यात लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे या परीक्षणात सामिल नसलेले अनेक शास्त्रज्ञ हा दावा खोडून काढतात. लिडस युनिव्हर्सिटी मध्ये पृथ्वी आणि हवामान या विषयाचे प्राध्यापक मार्टिन चीपर्फिल्ड यांचे म्हणणे आहे की, ली यांचे ओझोनबद्दलचे हे दावे पूर्णपणे सत्यावर आधारित नाहीत. चीपर्फिल्ड यांच्या मते या परिक्षाणात असलेली सर्वात मोठी उणीव ही आहे की प्रोफेसर लू यांनी ओझोन चे १९६० चे चेंज डाटासेटच्या आधारावर हे सर्व परीक्षण केले आहे.

चिपर्फिल्ड म्हणतात की, '१९६० मध्ये अल्प प्रमाणात परीक्षणे करण्यात आली असून तीही कनिष्ठ दर्जाच्या साधनांवर आधारित होती. त्यामुळे त्यांच्या आधारे झालेल्या कोणत्याही परीक्षणाबद्दल शंका घेणे महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणतात की, 'ओझोन मधील १९६० पासून झालेले बदल हे आपण इतर उपकरणे किंवा इतर तांत्रिक व्यवस्था वापरून करायला हवेत. तसे केले असता ओझोनची पातळी ही एवढीही वितळलेली नाही हे दिसून येते.'

सुझेन सॉलोमन या मेसाच्युसेट युनिव्हर्सिटीमध्ये हवामान विज्ञान आणि वातावरण रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या देखील या विषयावर वेगळे मत राखून आहेत. त्यांच्या मते, 'ओझोन विरहित असलेल्या stratospheric वाऱ्यांमुळे त्या उष्णकटबंधीय भागातील ओझोनचा थर वितळत आहे. आणि ओझोनमध्ये पडलेल्या ह्या विलक्षण छिद्राचे हेच कारण असू शकते.'

एका मुलाखतीत त्या म्हणतात की ओझोनचा स्तर खाली आणायला वैश्विक किरणे ही कारणीभूत असू शकत नाहीत. आणि वैश्विक किरणांच्या या परिणामासंबंधी झालेल्या परीक्षणामध्ये कोणतेही रासायनिक गणिते वापरण्यात आलेली नाहीत.

वरील वेगवेगळी मते जर आपण व्यवस्थित समजून घेतली तरी सध्या ओझोनबद्दल येत असलेल्या बातम्यांची बऱ्यापैकी सत्य आणि असत्य परिस्थिती समजण्यास आपल्याला मदत होऊ शकेल. तसेच या माध्यमातून एकूणच ओझोन हा विषय आमच्या वाचकांना समजवून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required