computer

२०२२ च्या शेवटी येणारी वेबसिरिज 'द रेल्वेमेन' - काय आहे या सिरिजचा कथाविषय ?

२ डिसेंबर १९८४ ची रात्र होती.भोपाळ स्टेशनवर श्री. गुलाम दस्तगीर नावाचे स्टेशन उपअधीक्षक नाईट ड्युटीवर होते. दररोजच्या दिनक्रमाची सवय झाली होती.रोजच्या प्रमाणे ते आजही निवांतपणे आपलं काम करत होते.रात्री 'गोरखपूर-मुंबई एक्सप्रेस' यायची वेळ झाली म्हणून ते प्लॅटफॉर्मवर आले,तेव्हा त्यांचे डोळे जळजळू लागले होते,घसा खवखवायला सुरुवात झाली होती आणि डोळ्यातून पाणी येत होते.श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता.
नक्की काय होतंय हे कळत नव्हतं, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे, एवढंच त्यांना जाणवत होतं. त्यांना त्यावेळी याची पुसटशी देखील कल्पना नव्हती, की त्यांचे वरिष्ठ श्री. हरीश दुर्वे आणि स्टेशनवर कार्यरत इतर २३ सहकारी आधीच मृतावस्थेत पडलेले होते.

त्यादिवशी भोपाळमध्ये सर्वात भयानक गॅस-दुर्घटना घडली होती.'युनियन कार्बाईड' या फॅक्टरीतून मिथिल आयसोसायनेट नावाच्या विषारी वायूची गळती झाली होती,आणि लाखो लोकांच्या नाकातोंडातून फुफ्फुसात शिरून त्याचे दुष्परिणाम त्याने सुरू केले होते. शेकडो लोक तेव्हापर्यंत मयत झाले होते, आणि ही शोकांतिका अजून खूप खूप मोठी व्हायची बाकी होती.
 

दस्तगीर यांना त्याक्षणी यातलं काहीही माहीत नव्हतं, पण परिस्थिती काहीतरी फार भयानक आहे, एवढंच त्यांना जाणवलं होतं. त्यांनी कंट्रोल पॅनलजवळ जाऊन विदिशा आणि इटारसी या स्टेशन्सच्या स्टेशन मास्तरांना फोन करून दोन्हीकडून येणाऱ्या सगळ्या गाड्या भोपाळकडे रवाना न करता तिथेच थांबवून ठेवण्याची सूचना केली. बाहेर एक प्लॅटफॉर्मवर 'गोरखपूर-कानपूर एक्सप्रेस' नुकतीच आली होती. त्या प्लेटफॉर्मकडे दस्तगीर धावत सुटले. त्यावेळी त्यांना नीट चालता सुद्धा येत नव्हतं. अगदी अडखळत, धापा टाकत, गुदमरलेल्या अवस्थेत त्यांनी गार्ड आणि लोको-पायलटला तिथून ती गाडी पळविण्याची विनंती केली. गार्ड आणि लोको-पायलट नुकतेच तिथे आलेले असल्याने त्यांना काही समजलं नाही. गाडीची निर्धारित वेळ २० मिनिटांनंतरची होती, आणि अशाप्रकारे 'निर्धारित वेळेअगोदर गाडी हलवणे म्हणजे वरिष्ठांच्या पुढच्या कारवाईला आमंत्रण देणे' हे माहीत असल्याने लोको-पायलट आणि गार्ड म्हणाले, "दस्तगीर साहेब, एकदा कंट्रोल रूमला बोलून घेतलं तर बरं होईल."
परंतु दस्तगीर यांची एक मिनिट सुद्धा उशीर करण्याची तयारी नव्हती. "पुढच्या सगळ्या परिणामांची जबाबदारी मी घेतो", अशी ग्वाही देऊन त्यांनी ती ट्रेन लगबगीने पुढे रवाना केली. त्या ट्रेनमधील शेकडो लोक जर अजून २० मिनिटे तिथेच थांबले असते, तर पुढची कल्पनादेखील करवत नाही.

एवढं होईपर्यंत दस्तगीर यांची अवस्था बरीच खालावली होती. पण त्यांच्या समोरील अडचणी आत्ता कुठे सुरू झाल्या होत्या. 
विषारी वायूपासून सुटकेसाठी लोक मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या वाहनाने शहरापासून दूर पळत होते. त्यासाठी स्टेशनवरसुद्धा गर्दी वेगाने वाढू लागली. दस्तगीर यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या अनुपस्थित सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली, आणि जेवढे कर्मचारी उपलब्ध होते, त्यांच्या सहकार्याने वेगाने हालचाली सुरू केल्या. लोक अक्षरशः बिथरले होते. उलटी, मळमळ, श्वास गुदमरणे, डोळे लाल होऊन जळजळणे ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना प्रचंड त्रास होत होता, आणि अशा अवस्थेत त्यांची स्टेशनवर गर्दी वाढत होती. 
दस्तगीर यांनी लोकांना तिथून शक्य त्या मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली.रुग्णवाहिकांना पाचारण केले,आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची,किंवा तिथेच स्टेशनवर उपचारांची सोय केली. स्टेशनला एका इमर्जन्सी वॉर्डचे रूप आले होते.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दस्तगीर आणि त्यांचे सहकारी लोकांची मदत शेवटपर्यंत करत राहिले.

या दरम्यान दस्तगीर यांचं कुटुंब देखील भोपाळमध्येच होतं,ज्याची काळजी करायला दस्तगीरांना एका क्षणाचीही उसंत मिळाली नाही. त्यादिवशी त्या दुर्घटनेत त्यांनी त्यांचा हाताशी आलेला मुलगा गमावला.दस्तगीर आणि त्यांच्या इतर कुटुंबियांना आयुष्यभरासाठी सतावणाऱ्या व्याधी जडल्या. त्यानंतरची त्यांच्या आयुष्याची सगळी वर्षे हॉस्पिटलमध्ये चकरा मारण्यात गेली. वाईट गोष्ट म्हणजे कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबांना अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत मिळाली, परंतु दस्तगीर त्यालाही वंचित राहिले. 
२००३ साली त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या मृत्य-प्रमाणपत्रावर 'मृत्यचे कारण' या शीर्षकाखाली जे कारण दिले गेले, त्यात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, की त्यांचा मृत्यू मिथिल आयसो-सायनेट या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने झालेल्या विविध व्याधींमुळे झालेला आहे. आज त्यांची पत्नी व कुटुंब गरिबीत-हलाखीत जगत आहे.
 

भोपाळ गॅस दुर्घटनेने बिघडलेली परिस्थिती आज ३८ वर्षांनंतर देखील 'नॉर्मल' झालेली नाही. शेकडो लोक आजही त्या दिवशी मिळालेल्या व्याधी घेऊन जगत आहेत. दोन हजारांवर लोकांनी त्याच दरम्यान जीव सोडला परंतु कित्येक लोक त्यादिवशी कायमसाठी अधू झाले, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या देखील. 
मी दस्तगीर या एका व्यक्तीबद्दल सांगितलं. परंतु असे अनेक शूर लोक त्यादिवशी परिस्थितीशी लढत राहिले, आणि बऱ्याच लोकांनी स्वतःचे प्राणदेखील गमावले.
या योद्ध्यांच्या कार्यावर 'The Railwaymen' नावाची एक कलाकृती लवकरच पडद्यावर येतीये. आपल्या आयुष्याची बाजी लावणाऱ्या दस्तगीरांसारख्या योद्ध्यांना ही कलाकृती म्हणजे त्यांच्या चरणी वाहिलेली आदरांजली आहे.

- लेखन आणि सौजन्य

 डॉ. प्रदीप डुबल 

सबस्क्राईब करा

* indicates required