computer

माणसाच्याही आधी चिंपांझीने कसा केला अंतराळप्रवास? वाचा गोष्ट अवकाशात गेलेल्या पहिल्या प्राण्याची....

अवकाश हे अतिशय गहिरे आहे. फार जुन्या काळापासूनच लोकांना आकाशाची पर्यायाने अवकाशाबद्दल उत्सुकता होती. हळूहळू नासा या संस्थेतील एका अॅलन शेपर्ड नावाच्या वैज्ञानिकाच्या डोक्यात एक कल्पना आली की अवकाशात सजीव जाऊ शकतात का आणि गेले तर तिथे काही काम करू शकतात का?

अवकाशात संशोधन करण्यासाठी नासाचे हे पहिले पाऊल मानावे लागेल. अवकाशात पहिला माणूस पाठविण्याआधी अवकाशात एक प्रयोग म्हणून एका चिंपांझीला पाठवायचे ठरवले गेले. चिंपांझी हुशार असतात तसेच चिंपांझी बुद्धीचा वापर करून काही कामे करू शकतात. याच वैशिष्ट्यामुळे चिंपांझीची निवड करण्यात आली. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर स्वतः अॅलन शेपर्ड अवकाशात प्रवास करणार होता. सुदैवाने चिंपंझीचा प्रयोग यशस्वी झाला आणि नंतर अॅलन शेपर्ड स्वतः मिशन मर्क्युरी या उपक्रमाअंतर्गत  अवकाशात जाऊन आला.

आजच्या लेखातून आपण अवकाशात जाणाऱ्या चिंपांझीची गोष्ट वाचणार आहोत.  

या चिंपांझीचे नाव होते हॅम. अमेरिकेच्या कॅमेरून भागात जुलै १९५७ साली या चिंपांझीचा जन्म झाला. आणि जुलै १९५९ मध्ये या छोट्याश्या दोन वर्षाच्या चिंपांझीला अमेरिकेच्या हवाई विभागाने होलोमन हवाई तळावर आणले. या खास प्रशिक्षणासाठी एकूण चाळीस चिंपांझीची निवड केली गेली होती. आपला चिंपांझी हा त्यातला नंबर ६५ वा चिंपांझी होता. त्याची ओळखही ६५ अशीच होती.

हळुहळू निवडक सहा चिंपांझी शिल्लक राहिले आणि हॅम त्यामधला एक होता. सुरुवातीला त्याचे नाव ठेवले गेले नव्हते. त्याचे प्रशिक्षक त्याला चोप चोप चांग या नावाने बोलवत असत.

जोसेफ ब्रॅडी या संशोधकाने या चिंपांझीच्या समूहाला विजेचे कमी दाबाचे झटके आणि आवाज यांच्या सहाय्याने प्रशिक्षित केले. निळ्या रंगाचा प्रकाश दिसला की लिवर ओढायचा अश्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. जो चिंपांझी व्यवस्थित काम करेल त्याला केळ्याचा स्वाद असलेली गोळी देण्यात येत असे आणि जो चिंपांझी व्यवस्थित काम करणार नाही त्याला कमी दाबाचा विजेचा झटका देण्यात येत असे.

हॅम निळा प्रकाश दिसल्यानंतर लिवर दाबायला शिकला आणि मग त्याची निवड या अवकाशात उड्डाण घेण्याच्या कामावर झाली.

या उपक्रमाचे नाव प्रोजेक्ट मर्क्युरी असे ठेवले गेले.

पहिल्यांदा एक छोटी बंद केबिन बनवण्यात आली. त्या केबिनमध्ये सेन्सर, कॅमेरा आणि सर्व उपकरणांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हॅमसाठी स्पेस सूट तयार करण्यात आला, त्यात अवकाशातील वातावरणात हॅमला काही त्रास होऊ नये आणि ऑक्सिजन पुरवठा व्हावा याची व्यवस्था होती.

दीड वर्षाच्याच्या प्रशिक्षणानंतर १ जानेवारी १९६१ रोजी हॅम अवकाशात उड्डाण घेण्यासाठी तयार झाला. हॅमच्या अवकाशातील वाहनाला ‘एम आर २’ हे नाव देण्यात आले. हॅमच्या छोट्या छोट्या हालचाली आणि कामे ही पृथ्वीवर सेन्सर्स आणि संगणकाच्या देखरेखीखाली नोंदवली जात होती.

अवकाशात असताना हॅमने त्याला प्रशिक्षण दिल्याप्रमाणे खटका दाबण्याचे कार्य केले. ते पृथ्वीवरच्या कामापेक्षा एखाद्या सेकंदाने उशिरा झाले.

दरम्यान ‘एम आर २’ वर बाहेरून कमी दाब निर्माण झाला. त्यामुळे ते पृथ्वीच्या दिशेने फेकले जाऊन अटलांटिक समुद्रात पडले. तिथून युस डोनर या नौसेनेच्या बोटीने बचावाचे कार्य करून हॅमची सुटका केली. हॅम सुरक्षित होता. फक्त त्याच्या नाकाला जखम झाली होती.

त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर समजले की तो थोडा थकला होता आणि शरीरातले पाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते. या व्यतिरिक्त तो अगदी सुखरूप होता.

हॅमने १६ मिनिटे आणि ३९ सेकंद अवकाशात काढली. त्यातली ६.६ मिनिटे तो वजनविरहित अवस्थेत होता. अशाप्रकारे तो अवकाशात गेलेला पहिला होमिनॉइड ठरला.

होलोमान प्रयोगशाळेच्या कर्नल हॅमिल्टन यांच्या नावावरून त्याला हॅम हे नाव देण्यात आले. हॅमच्या या अवकाशातील प्रवासामुळे काही गोष्टी समजून आल्या. त्या पुढीलप्रमाणे:

१. अवकाशात सुरक्षित प्रवास करता येतो.

२. पृथ्वीवर आपण जशी कामे करतो तशा प्रकारे अवकाशात कामे करता येतात.

या मिशन मर्क्युरी अंतर्गत अॅलन शेपर्ड या खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळवीराने आणखी सहा वीरांना घेऊन अंतराळात जाण्याची मोहीम आखली. आणि १ मे १९६१ रोजी ती पूर्ण केली.

आज जरी मानव अंतराळात आणि चंद्रावर पाऊल ठेवून आला तरी अवकाशात जाणारा पहिला प्राणी म्हणून हॅमचे नाव घेतले जाते.

हॅमचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला वॉशिंग्टन प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले. तेथे तो २५ सप्टेंबर १९८० पर्यंत राहिला. पुढे त्याला नॉर्थ कॅरोलायना येथल्या आशेब्रोच्या प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले. १७ जानेवारी १९८३ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी हॅमचा मृत्यु झाला.

हॅमची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या हाडांचा सापळा राष्ट्रीय आरोग्य व औषधे यांच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आला आहे. त्याचे उरलेले मृत शरीर न्यू मेक्सिकोच्या स्पेस हॉल ऑफ फेम समोर पुरण्यात आले आहेत. हॅमची कबर अतिशय आदर आणि सन्मानपूर्वक जतन करून ठेवण्यात आली आहे.

तर ही होती अवकाशात जाणाऱ्या पहिल्या प्राण्याची गोष्ट. दुर्दैवाने मानवाच्या प्रगतीला प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाची एक काळी बाजूही आहे. हॅम त्याचंच एक उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required