computer

Twitterची जन्मकथा: वाचायलाच हवी अशी दोस्ती आणि राजकारणाची पडद्यामागची कथा !

कशाला हवा सोशल मिडिया आणि काय ते सारखं तिथे पोस्ट करत राहायचं म्हणणारेसुद्धा आता फेसबुक आणि इन्स्टावर पडिक असतात. अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेट आणि सोशल मिडिया हे सगळं एकाच माळेत आलं आहे. अलीकडेच फेसबुक, व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम काही काळासाठी बंद पडलं होतं तर सर्वांचीच किती कोंडी झाली होती. या काळात सर्वाना दिलासा दिला तो ट्विटरने. सोशल मिडियाच्या जगात ट्विटर हे तसे सर्वात तरुण माध्यम असले तरी या माध्यमाने थोडक्या काळात मोठी मजल गाठली आहे. याचा आजवरचा प्रवास अतिशय रोचक आणि भन्नाट आहे. म्हणूनच आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी खास ट्विटरची जन्मकथा आणि त्यामागच्या रोचक घडामोडी घेऊन आलो आहोत.

इव्हान विल्यम्स, नोआ ग्लास, जॅक डॉर्सी, ख्रिस्तोफर उर्फ बीझ स्टोन हे चार तरुण आहेत ट्विटरचे संस्थापक! पण म्हणून चार लोक एकत्र आले आणि ट्विटर सुरू झाले इतकी ही सोपी कथा नाही, तर यात प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, सोबत चढाओढीचे राजकारणही आहे. म्हणूनच म्हटलं की ट्वीटरचा प्रवास रोचक आणि तितकाच रंजक आहे..

इव्हान विल्यम्स आधी गूगलमध्ये काम करायचा. त्याने गुगलमधून बाहेर पडून ऑडीओ नावाचा स्वत:चा स्टार्टअप सुरू केला. ऑडीओ हा एक पॉडकास्टींग प्लॅटफॉर्म होता. ऑडीओची सुरुवात झालेलीच असताना ॲपलनेही आय-ट्यून पॉडकास्टींग सुरू केले त्यामुळे इव्हानच्या ऑडीओला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. इव्हानने आपला मित्र बीझ स्टोनलाही आपल्या या स्टार्टअपमध्ये सामील करून घेतले होते. इव्हान, बीझ आणि ऑडीओचा आणखी एक कर्मचारी जॅक डॉर्सी यांनी काही तरी नवा प्रयोग करण्याचे ठरवले. या तिघांनी जेव्हा आपली नवी संकल्पना ऑडीओच्या गुंतवणूकदारांना सांगितली, तेव्हा त्यांना ही नवी संकल्पना अजिबात आवडली नाही. मात्र इव्हानने कशीबशी त्यांची समजूत घालून ट्विटरसाठी पुन्हा एकदा फंड उभा केला. यासाठी इव्हानने त्यांचा स्टॉक विकत घेण्याचीही तयारी दाखवली.

इव्हान आणि इतर गुंतवणूकदारांच्याही आधी नोहा ग्लासने त्याच्या अपार्टमेंटमध्ये ऑडीओची सुरुवात केली होती. हे सर्व घडत होतं ट्विटरच्या जन्माच्या सहा वर्षे आधी!! त्यावेळी नोहाची कल्पना अशी होती की जेव्हा तुम्ही एखाद्या नंबरवर कॉल मेसेज सोडता तेव्हा तो अपोआपच MP3 मध्ये कन्व्हर्ट व्हायला हवा . इव्हानने तेव्हा गुगलमधली नोकरी सोडली नव्हती आणि तो नोहाच्या या संकल्पनेत गुंतवणूक करणारा एक गुंतवणूकदार होता. इव्हानला ऑडीओमध्ये जास्तच रस होता. त्यामुळे नोहाच्या अपार्टमेंटमधून ऑडीओ इव्हानच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. इथेच ऑडीओचा विस्तार होत गेला. काही काळाने जॅक डॉर्सी हा वेब-डिझायनर म्हणून ऑडीओमध्ये रुजू झाला. हे सगळं घडेपर्यंत इव्हान ऑडीओचा सीईओ बनला होता.

ॲपलने स्वतःचे पॉडकास्टिंग आणल्यावर ऑडीओने काही तरी नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. जॅककडे त्यावेळी एक हटके कल्पना होती. जॅकची कल्पना नोहाला खूपच आवडली. जॅकची ही कल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडताना नोहाने त्याला ट्विटर (Twttr) हे नाव दिले. त्यानंतर त्याचे Twitter असे नामांतर झाले. ही कल्पना जोम धरेल की नाही याबाबत इव्हान थोडा सांशक होता. पण नोहाने त्याला ही कल्पना आपण यशस्वी करून दाखवू असा विश्वास दिला. ग्लासने ट्विटरचा हा प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. बीझ स्टोनने नोहा ग्लास आणि त्याच्या टीमला मदत केली. नोहा आणि त्याच्या टीमच्या प्रयत्नातून अखेर ट्विटरचे अंतिम रूप साकार झाले.

जॅक किंवा इतर कुणाहीपेक्षा ट्विटरच्या निर्मितीत नोहा ग्लासचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. नोहा आणि त्याच्या कल्पनेतून आणि अथक प्रयत्नातूनच आजचे ट्विटर साकार झाले. पुढे अशा काही घडामोडी घडल्या की ट्विटर ज्याच्या कल्पनेतून जन्माला आले तोच ट्विटरमधून हद्दपार झाला. ट्विटरचे अंतिम रूप तयार होईपर्यंत जॅक डॉर्सी अगदी निवांत होता, पण नंतर त्याने अचानक नोहाचे अधिकार सीमित केले आणि स्वतःला ट्विटरचे सीईओ घोषित केले.

ट्विटरची कल्पना जॅक डॉर्सीची होती, त्याने जे काही डायग्राम सुरुवातीला तयार केले होते तेही सध्याच्या ट्विटरशी साधर्म्य साधणारे होते आणि ट्विटरच्या निर्मितीत तोही केंद्रस्थानी होताच, हे सगळे मान्य करतील. असे असले तरीही त्याला अंतिम रूपरेषा नोहानेच दिली होती. ट्विटरची सुरुवात शक्य तितक्या लवकर व्हावी म्हणून पुढाकार घेणारा, सर्वांना प्रोत्साहन देणारा नोहाच होता. ट्विटर कसे काम करेल याबाबत त्याच्या कल्पना अगदी स्पष्ट होत्या. ट्विटरची सगळी कामे नोहाच्या लॅपटॉपवरूनच करण्यात आली. नोहा या स्टार्टअपशी भावनिकरित्या खूप घट्टपणे जोडला गेला होता. आपण एकट्यानेच सर्व उभे केले अशी त्याची भावना नसली तरी ज्याप्रकारे त्याला ट्विटरमधून बेदखल करण्यात आले त्यामुळे निश्चितच तो आतून दुखावला गेला.

नोहा या प्रोजेक्टमध्ये अगदी मनापासून गुंतला होता त्यामुळे काम करतानाही तो काहीसा आक्रमक वाटायचा. विल्यम्सला वाटले की त्याचा हा आक्रमक अवतार पुढे जाऊन डोईजड होऊ शकतो म्हणूनच त्याला अचानकपणे प्रोजेक्टमधूनच काढून टाकण्यात आले. नोहाला काढल्यानंतर ट्विटर अगदी धडाक्यात चालू लागले असे नाही. पाच वर्षे उलटून गेली तरी ट्विटर अगदी जैसे थे अवस्थेत होते. पाच वर्षानंतर अचानक ट्विटरला अच्छे दिन आले. एका नैसर्गिक आपत्तीने ट्विटरला मोठी संधी दिली.

२००६ साली तिथे एक छोटासा भूकंपाचा धक्का बसला. जो तो ट्विटरचे मेसेजिंग ॲप वापरून या भूकंपासंबंधीचे अपडेट्स देऊ लागला. या भूकंपाने तसे नुकसान काहीच झाले नव्हते, मात्र ट्विटरचा भरपूर फायदा झाला होता. प्रत्येकाने भूकंपासंबंधी काही ना काही माहिती या ॲपद्वारे शेअर केली होती. २००७ पर्यंत ट्विटरची घौडदौड अगदी उत्तम सुरू होती. पण अध्येमध्ये ट्विटरवर लोड आला की ते बंद पडत असे. जॅक ट्विटरचा सीईओ असला तरी त्याला या गोष्टी तितक्याशा गांभीर्याने हाताळता येत नव्हत्या. जॅक जर असाच करत राहिला तर ट्विटर पाहिजे ती गती घेणार नाही अशी शंका इव्ह आणि बीझ दोघांनाही सतावत होती. शेवटी त्यांनी काही निमित्ताने जॅकलासुद्धा ट्विटरमधून बाहेर काढले.

जॅक नोहा सारखा गप्प बसणारा नव्हता. त्याने आपल्याशी झालेल्या या वागण्याचा पुरेपूर सूड उगवण्याचे ठरवले आणि तो जिथे तिथे ट्विटरच्या उभारणीत आपले योगदान किती मोठे आहे हे सांगू लागला. वरून ट्विटरच्या अंतर्गत टीममध्ये आणि संचालक मंडळात फूट कशी पडेल याचीही त्याने तयारी करून ठेवली. संचालक मंडळाला इव्हचे काम अजिबात पटत नव्हते. अचानक एके दिवशी या संचालक मंडळाने इव्हलाच पदावरून खाली खेचले.

आधी नोहा बाहेर गेला, नंतर जॅक आणि आता इव्ह. इव्हची हकालपट्टी होताच संधी साधून जॅक डॉर्सीने पुन्हा ट्विटरमध्ये पुनरागमन केले.

पुढे जे काही घडले ते तर तुम्ही जाणताच. आज ट्विटर सर्वच सोशल मिडियाच्या तुलनेत आघाडीवर आहे.

अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या ट्विटरमध्येही किती मोठे राजकारण घडले होते पाहा. कॉर्पोरेट क्षेत्रातील या खेकडावृत्तीच्या राजकारणापेक्षा खरेखुरे राजकारण परवडले, असे जर कुणाला वाटत असेल तर त्यात चूक ती काय?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required