computer

झारखंडच्या या घाटात वेळ अचानक दीड वर्षे पुढे जाते? काय प्रकरण आहे हे?

जगभर विविध टाईमझोन आहेत. काही देश इतके मोठे किंवा आडवे पसरलेले आहेत की एका देशातच वेगवेगळे टाईम झोन्स आहेत. ग्रीनीचमधली वेळ प्रमाण मानून जगभर हे टाईमझोन्स आखण्यात आले आहेत. भारतात GMT+5:30 म्हणजेच ग्रीनीच प्रमाणवेळेच्या पुढे साडेपाच तास असा 'इंडियन स्टँडर्ड टाईम' मानला जातो. तसे भारतात पूर्वी दोन टाईम झोन मानण्यात येत, पण बऱ्याच कारणांमुळे ते मागे पडले. असो. पण म्हणजे भारतात देशभर एकच प्रमाणवेळ मानली जाते. या टाईमझोन्सनुसार देशादेशांच्या वेळेत काही तासांचा फरक असू शकतो. पण भारतात मात्र अशी एक जागा आहे जिथे गेले की माणूस तब्बल दीड वर्ष पुढे जातो.

रांची जमशेदपूर हा झारखंड राज्यातील एक मार्ग. याच मार्गावर एक घाट लागतो. तैमारा घाटी म्हणून प्रसिद्ध असा हा घाट आहे. निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेला हा घाट म्हणजे काय झाडी, काय डोंगर सगळंच ओक्के गोष्ट. पण हा घाट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कुणालाही तोंडात बोटे घालायला लावणारी अशीच ही गोष्ट आहे.

घाट येण्यापूर्वी तुम्ही २०२२ मध्ये असतात. जसा का तुम्ही घाटात प्रवेश केला तुम्ही थेट २०२४ मध्ये प्रवेश करता. तुम्ही म्हणाल इथे काय टाईममशीन लावलंय का काय? पण तसेही नाही. घाटात प्रवेश करताना जामचूआ नावाची जागा आली रे आली की तुम्हाला थेट मोबाईलवर डेट सेटिंग बदलण्याचा ऑप्शन येतो आणि तिथे चक्क आपोआप २०२४ ची तारीख आलेली दिसते. असा प्रकार जवळपास १४ किमीच्या क्षेत्रात दिसून येत आहे.

या ठिकाणी थेट टाईमझोन बदललेला दिसतो. हे खरेच आहे का याची खात्री करून बघितली तर अनेकांना हाच अनुभव आला. भिंतीवरील घड्याळात मात्र काहीही बदल झालेला दिसत नाही. आता हा नेमका काय प्रकार आहे याचाही शोध घेतला गेला. यात अजूनही काही चित्रविचित्र घटना इथे पाहायला मिळतात. अनेकांना या घाटात प्रवेश केल्यावर गाडीची लाईट बंद झाली असाही अनुभव आला आहे.

हा रस्ता म्हणूनच अनेकांना रहस्यमय वाटत आहे. आजूबाजूच्या लोकांना या गोष्टीचा चांगलाच त्रास होत आहे. येथील शाळेत ऑनलाईन अटेंडन्स लावता येत नाही, कारण तिथेही २०२४ ची तारीख येते. तर तेथील लोकांना हाच अनुभव येत आहे. इथे व्हाट्सएप पण नीट चालत नाही. इतरही अनेक ऍप इथे चालत नाहीत असाही अनुभव आहे. इथे एक गोष्ट अशीही आहे की जेव्हा मोबाईलची टाईम सेटिंग ही ऑटोमॅटिक असते तेव्हाच असे होते. मॅन्युअल सेटिंग असली की असे काहीही होत नाही.

हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक संशोधक आणि पर्यावरण अभ्यासकांशी काही पत्रकारांनी संपर्क साधला. कारण एखाद दुसरी घटना असती तर नेटवर्क समस्या आहे म्हणून सोडून देता आले असते. या भागात स्ट्रीट लाईट पण बंद चालू होत असते म्हणून लोकांच्या भीतीत भर पडत आहे.

यावर पर्यावरण तज्ञ असलेले नितीश प्रियदर्शी यांनी यामागे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन असू शकते अशीही शक्यता व्यक्त केली आहे. या गोष्टीबद्दल सखोल संशोधन झाल्यावरच यामागील सत्य काय ते बाहेर येऊ शकते असेही ते म्हटले आहेत. सध्या तरी ते स्वतःच काही संशोधन करत आहेत. त्यात त्यांना काही गोष्टी आढळून आल्या आहेत.

त्यांनी इथल्या काही दगडांचे नमुने गोळा केले आहेत. त्यांना मॅग्नेटिक रॉक असे म्हटले जाते. हे दगड लोखंडाला आकर्षित करतात. या दगडांजवळ मोबाईल घेऊन गेले असता कंपासमध्ये हलकासा बदल दिसून येतो. यातून त्यांनी या ठिकाणी चुंबकीय दगडांचा साठा असू शकतो अशीही शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी काहींना तर गाडी मागे खेचली जात आहे असाही अनुभव आला आहे.

असा प्रकार हा लड्डाख मॅग्नेटिक हिल्समध्ये पाहायला मिळतो. सध्या तरी यात सरकारी संस्था संशोधन करण्यासाठी उतरल्या नाहीत. त्यांनी संशोधन केल्यावरच नेमका हा काय प्रकार आहे हे समजून येऊ शकते. निसर्ग ठिकठिकाणी आपला चमत्कार दाखवत असतो. तोच अनुभव अध्या तैमारा घाटातून प्रवेश करताना लोकांना येत आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required