वृक्षतोड थांबवण्यासाठी या मराठी शिक्षकाने काय अफलातून आयडिया काढली आहे ? पाहा बरं !!

रणजीत दिसले  हे खऱ्या अर्थाने डिजिटल शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षणाची अनोखी डिजिटल वाट शोधलेली दिसते. आता हेच बघा ना, त्यांनी दहावीच्या बालभारती पुस्तकाला व्हिडीओत मध्ये रुपांतरीत केलं, मग पुस्तकातील प्रत्येक धड्याला एक QR कोड दिला. हा QR कोड स्कॅन केला की युट्युबवरची त्या त्या धड्याची लिंक उघडायची. अशारितीने त्यांनी ग्रामीण भागात डिजिटल अभ्यासाला सुरुवात केली.

स्रोत

मंडळी, रणजीत दिसले यांनी यावेळी आणखी एक डिजिटल तंत्रज्ञान शोधलं आहे. हे तंत्रज्ञान संपूर्ण भारताने आदर्श घ्यावा असं आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या !!

झाडांची कत्तल ही सध्याची एक गंभीर आणि दुर्लक्षित समस्या आहे. यावर रणजीत दिसले यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधला आहे. त्यांनी माढा तालुक्यातील अकुम्भे गावातल्या झाडांना एक खास QR कोड दिला आहे. या QR कोड सोबत एक लहानशी चीप जोडलेली आहे. यामुळे होतं काय, की जर कोणी अनधिकृतपणे झाड तोडण्याचा पयत्न केला तर त्याची बातमी लगेचच गावकऱ्यांच्या मोबाईलवर समजते. जर कोणी झाडांची कत्तल केलीच, तर त्याच्याकडून गावात ५ रोपटी लावून घेतली जातात.

रणजीत दिसले यांच्या QR कोड तंत्रज्ञानामुळे मागील ६ वर्षात गावाजवळचे हरित क्षेत्र २६% वरून ३३% एवढं वाढलं आहे.

रणजीत दिसले यांच्या या कार्यात गावकऱ्यांचा आणि खास करून त्यांच्या विद्यार्थांचा मोठा सहभाग असतो. रणजीत दिसले ज्या झेडपी(ZP)च्या शाळेत शिक्षक आहेत तिथली मुलं या उपक्रमात सक्रीय सहभागी असतात. मुलांनीच मिळून पर्यावरणाचा रिपोर्ट कार्ड तयार केला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी गावाच्या परिसरातल्या झाडांची मोजणी केली होती. या मोजणीत तब्बल ५४६ झाडे आढळून आली.

स्रोत

गावातल्या प्रत्येक दहा झाडांची काळजी एक विद्यार्थी घेतो. अशा प्रकारे मुलांमध्ये झाडांची विभागणी करून त्यांच्या काळजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे वेगळं सांगायला नको, की झाडांची कत्तल आता जवळजवळ थांबली आहे.

या कार्यासाठी रणजीत दिसले  यांना नॅशनल जिओग्राफिक सोसायटीतर्फे “नॅशनल जिओग्राफिक इनोवेटिव्ह एज्युकेटर” पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता पसरवणाऱ्या शिक्षकास दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार २८ देशातल्या ९० शिक्षकांना देण्यात आला.  

मंडळी, रणजीत दिसले यांनी सुरु केलेला हा उपक्रम प्रत्येक गावकऱ्यांनी राबवण्यासारखा आहे. त्यांच्या या कार्याला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required