computer

एलियन्सनी अपहरण केल्याचा दावा करणारे हिल्स दांपत्य!! त्यांची गोष्ट खरी की खोटी?

‘कोई मिल गया’ चित्रपट आठवतो? त्यातला तो जादू? हो. हो. सगळं काही आठवत असेल. पण समजा तो जो जादू परग्रहावरून आलेला आणि चुकून इथेच राहिला असं न दाखवता ह्रितिक रोशनलाच त्यांनी आपल्या सोबत परग्रहावर नेलं असं दाखवलं असतं तर? पण हे दाखवणार कसं? कारण परग्रहावर नेमकं काय काय असेल आणि काय काय नसेल याबद्दल आपल्याला कसलीच माहिती नाहीय. बरोबर ना? चित्रपटात जरी अशी स्टोरी दाखवता आली नसली तरी प्रत्यक्षात मात्र एका जोडप्याने आपल्याला एलीयन्सनी पळवून नेलं होतं असा दावा केला होता.

ही गोष्ट आहे १९६०च्या दशकातली. तेव्हा उडत्या तबकड्या, एलियन्स, परग्रहवासी वगैरे कल्पना इतक्या रुळल्या नव्हत्या. तर झालं असं की बेटी आणि बर्नी हिल्स नावाचं एक जोडपं संध्याकाळच्या वेळी फिरायला म्हणून घरातून बाहेर पडलं. तो दिवस होता १९ सप्टेंबर १९६१चा. रात्रीच्या वेळी दोघे नवरा बायको आपल्या कारमधून न्यू हॅम्पशायरच्या रूट नं. ३ वरून फिरत होते. सोबत त्यांचा कुत्रा डेल्सीदेखील होता.

चांगलाच अंधार पडला होता आणि त्या अंधारात बेटीला आकाशात काही तरी चमकत असल्याचं दिसलं. बर्नीने थोडावेळ बारीक निरीक्षण केलं आणि तो कारमधून खाली उतरला. कारण वरती जे काही चमकत होतं ते चांदणी किंवा ताऱ्या सारखं अजिबात नव्हतं. त्यातून रंगीबेरंगी किरणं बाहेर पडत होती. थोड्या अंतरावर गेल्यावर ते दोघेही कारमधून बाहेर आले आणि त्या चमकदार, रंगीत किरणांकडे पाहू लागले. आपल्या दुर्बिणीतून ते टक लावून त्या किरणांकडे पाहत होते इतक्यात ती किरणे त्यांच्याच दिशेने येत असल्याचे त्यांना जाणवले. अगदी पापणी लावायच्या आत एक गोल यंत्र त्याच्यासमोर आले आणि त्यातून काही लोकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्या यंत्रामधले लोक अजिबात माणसांसारखे नव्हते, ते काय बोलताहेत हेही कळणं कठीणच. काय होतं हे समजायच्या आतच त्या माणसांनी त्या दोघांना त्या यंत्राच्या दिशेने खेचून घेतलं. त्यानंतर काय झालं हे दोघांनाही आठवत नाही, मात्र त्यानंतर दोन तासांनी ते ज्या ठिकाणी होते त्यापेक्षा ३५ मैल अंतर पुढे जाऊन फ्रांकोनिया नॉचजवळ होते. पण ते तिथे कसे पोहोचले हे मात्र त्यांना आठवत नाही. त्यांचा डेल्सी आणि कारही तिथेच होती. पण कारवर काही वर्तुळे काढली गेली होती. त्या दोघांचीही घड्याळे बंद पडली होती. त्यांची दुर्बीण मोडली होती. बर्नीचे बूट उचकटले होते आणि बेटीच्या ड्रेसवर भरपूर धूळ जमा झाली होती. बर्नीला असे वाटत होते की त्याचे वीर्य काढून घेण्यात आले आहे

या दोन तासांत आपल्यासोबत नेमकं काय झालं हे त्या दोघांनाही समजलं नव्हतं. पण जे काही झालं त्यामुळे बेटी आणि बर्नी दोघेही हादरून गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी अमेरिकेच्या हवाईतळावर जाऊन आपल्याला एलियन्सनी पळवून नेल्याची तक्रार केली. सुरुवातीला तर ते दोघे जे काही सांगत होते त्यावर कुणाचाच विश्वास बसेना. पण हिल्स दांपत्याला मात्र त्यांच्या सोबत जे घडलं ते नेमकं काय होतं हे जाणून घ्यायचं होतं.

बेटी जेव्हा तिच्या घराजवळील ग्रंथालयात गेली तेव्हा तिथे तिला काही उडत्या तबकड्यांची माहिती देणारी पुस्तकं मिळाली. या पुस्तकाचे लेखक होते डोनाल्ड केहोय. या दोघांनी त्यांची भेट घेतली. डोनाल्ड किहोय हे अवकाशीय घटनांवर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष होते. डोनाल्ड यांनी बेटी आणि बर्नीचा अनुभव ऐकून घेतला. आपल्याला कुणीतरी ऐकून घेतंय याचंच त्या दोघांना जास्त समाधान होतं. किहोय यांनी त्यांचा संपूर्ण वृतांत अत्यंत उत्साहाने आणि उत्सुकतेने ऐकून घेतला. त्याच्या समितीतील वाल्टर वेब नावाच्या आणखी एका सदस्यानेही बेटी आणि बर्नीची प्रदीर्घ मुलाखत घेतली.

परंतु या घटनेचा बेटीवर तर खूपच खोलवर परिणाम झाला. तिला रात्री अपरात्री विचित्र भास होऊ लागले. तिने तिच्या मुलाखतीत या अनुभवांचीही माहिती दिली. तिच्याशी बोलताना तिच्यातील काही विस्मृतीत गेलेल्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. तिच्या स्वप्नात वरचेवर ती घटना येऊ लागली. एलीयन्स तिला आणि बर्नीला एका धातूच्या तबकडीतून घेऊन जात आहेत असे ती स्वप्नात पाहत असे. हे एलीयन्स त्यांच्यावर विविध प्रयोग करत आहेत. त्यांना दोन वेगवेगळ्या खोल्यामध्ये नेऊन हे त्यांच्यावर काही प्रयोग केले जात आहेत. असे काहीही चित्रविचित्र स्वप्ने तिला पडू लागली.

तिच्या या स्वप्नाबद्दल ऐकल्यानंतर या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीने तिची मानसोपचार तज्ञांशी भेट घालून दिली. मानसोपचार तज्ञांनी तिला हिप्नोटाईझ करून तिला एलियन्स आणि त्यांनी केलेल्या अपहरणाबद्दल विचारले तेव्हाही तिने तीच माहिती दिली. एलियन्सनी तिला ज्या यंत्रातून नेले त्याचे चित्र काढता येईल का विचारल्यावर त्याच अवस्थेत बेटीने त्यांना एक चित्रही काढून दाखवले. या चित्रातील हे एलियन्सचे यंत्र एखाद्या गॅस स्टेशन सारखेच होते. बेटीच्या मनावर या घटनेचा जो गाढ परिणाम झाला होता तो काहीसा निवळण्यासाठी तिच्यावर मानसोपचार सुरू करण्यात आले. हे झालं बेटीचं, पण बर्नी जी वर्णन करायचा ती ही तंतोतंत बेटीच्या वर्णनाशी जुळायची.

बेटी आणि बर्नी यांना कोणत्याही प्रकारे परग्रह किंवा उडत्या तबकड्यांच्या विषयात रस नव्हता. जेणेकरून दोघांच्याही मनातील हे भ्रामक खेळ असावेत असे म्हणण्यासही नाव नव्हता. तरीही ते जे काही सांगताहेत या त्यांच्या कविकल्पना आहेत असाच मानसोपचार तज्ञांचा निर्वाळा होता. बेटी आणि बर्नी यांचा हा अनुभव अजूनही त्यांच्यापर्यंतच मर्यादित होता. एके दिवशी चर्चच्या एका कार्यक्रमात बोलता बोलता त्यांनी आपला हा अनुभव सांगितला. तिथे प्रसिद्ध द बॉस्टन हेराल्ड-ट्रॅव्हलरचे एक स्तंभलेखक जॉन लट्रेल आले होते. बेटी आणि बर्नीच्या बोलण्यातून त्यांनी जे काही ऐकलं त्यावर त्यांनी एक लेख लिहिला आणि तो हेराल्डमधून प्रकाशित केला.

तेव्हा बेटी आणि बर्नी या एलियन्सनी अपहरण केलेल्या जोडप्याविषयी बहुतांश लोकांना माहिती मिळाली. बेटी आणि बर्नी यांना प्रसिद्धीचा सोस नव्हता, पण किमान लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा एवढीच त्यांची अपेक्षा होती. हेराल्डमधून त्यांची ही कथा प्रकाशित झाल्यावर या जोडप्याची प्रसिद्धी चांगलीच वाढली.

त्यांच्या या अनुभवाने अनेक साय-फाय चित्रपटांना, कथा-कादंबऱ्यांना एक नवीन विषय मिळाला. या कल्पनेवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, कथा, कादंबऱ्या बाजारात आल्याही. पण आपल्या सोबत नेमके काय झाले होते या प्रश्नाचे उत्तर मात्र त्या दोघांनाही शेवटपर्यंत मिळाले नाही. बर्नी तर शेवटपर्यंत त्या घटनेच्या धक्क्यातून सावरू शकला नाही. वयाच्या ४६ व्या वर्षीच म्हणजे १९६९ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेला. बेटी हिल मात्र २००४ मध्ये वयाच्या ८५व्या वर्षी गेली. आता ते दोघेही नसले तरी त्यांच्या अनुभवाच्या कथा मात्र न्यू हॅम्पशायरमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी बेटीने हिप्नोटाईझ अवस्थेत जे गॅस स्टेशन प्रमाणे चित्र काढले होते तसेच स्टेशन उभारण्यात आल्या असून त्यामध्ये बेटी आणि बर्नीचे फोटो, त्यांनी विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखती, त्यांच्या अनुभवाची कथा, असं सगळंच एकत्रित पाहायला मिळतं. जणू काही त्याचं एक छोटसं स्मारकच त्याठिकाणी उभारण्यात आलं आहे.

एलियन्सनी अपहरण केल्याचा दावा करणारी ही पहिलीच घटना होती. यानंतर अनेक लोकांनी अशाप्रकारचे दावे केले पण कोणत्याच दाव्यामागील सत्यता पडताळणे अजून तरी शक्य झालेले नाही. बेटी आणि बर्नी आता या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी मागे राहिल्या आहेत.

तुम्हाला काय वाटतं बेटी आणि बर्नीचा हा अनुभव खरा असावा की, ही त्यांची कपोलकल्पित कथा असावी? तुमचे उत्तर नक्की कमेंट करा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required