computer

पश्चिम घाटात सापडल्या नखाएवढ्या बेडकांच्या नवीन जाती

गेल्याच महिन्यात म्हणजे २०१७च्या फेब्रुवारीमध्ये भारतातल्या पश्चिम घाटात नखाएवढा आकार असलेल्या बेडकाच्या चार नव्या प्रजातींची नोंद झाली.

या सर्व प्रजाती निक्टीबाट्रॅकस या जीन्सशी संबंधित आहेत. हे सर्व बेडूक रात्रीच्या वेळेस फिरतात. त्यामुळं त्यांना रात्रीच्या गडद अंधारात आणि दाट जंगलांत लपून राहता येतं. आपण शाळेत शिकलो ना, बेडकांच्या पायांच्या बोटांत पडदे असतात आणि त्यामुळं त्यांना पोहता येतं. पण या नव्यानं सापडलेल्या बेडकांच्या पायाच्या बोटांच्यामध्ये चक्क हे पडदे नाहीत. आणि गंमत म्हणजे आजूबाजूला  ही बेडकं मुबलक प्रमाणात सापडत असली तरी बेडकाच्या दृष्टीनेही अत्यंत छोटा आकार, लपून राहण्याची प्रवृत्ती आणि एखाद्या कीटकासारखा आवाज यामुळे आत्तापर्यंत या प्रजाती सापडल्याच नव्हत्या. दिल्ली विद्यापीठ आणि केरळच्या जंगल विभागातर्फे गेली पाच वर्ष  एक संशोधन सुरू आहे. त्या संशोधनातूनच या पश्चिम घाटातल्या वेगळ्या प्रकारच्या बेडकांचा शोध लागलाय.

कशा शोधतात प्राण्यांच्या नवीन जाती?

नव्या जाती शोधण्यासाठी संशोधक त्या प्राण्यांची शारीरिक लक्षणं बघतात. आजकाल डीएनएच्या तंत्रात सायन्सनं खूप प्रगती केलीय, त्यामुळं डीनएचा अभ्यास होतोच होत. झालंच तर त्या प्राण्यांच्या आवाजाच्या लहरींचाही अभ्यास केला जातो. 

रात्रीच्या वेळी फिरणार्‍या या निशाचर बेडकांच्या प्रजातींची एकूण संख्या आता ३५ झालीय.  आणि या सापडलेल्या चारही नव्या जातींच्या बेडकांचा आकार म्हणे जगातला सर्वात कमी आकार आहे.  या बेडकांचा सरासरी आकार सुमारे १२.२ ते १५.४ मिलीमीटरच्या दरम्यान आहे. म्हणजे आपल्या करंगळीचं पेरसुद्धा या बेडकांपेक्षा मोठं आहे.  

का आहे भारतीय पश्चिम घाटाला सजीवांच्या संशोधनात महत्त्वाचं स्थान?

भारतातला पश्चिम घाट प्रदेश हा जगभरातल्या सजीवांच्या विविधतेनं नटलेला प्रदेश आहे. जगात अशा प्रकारच्या आठ मुख्य जागा आहेत आणि आपला पश्चिम घाट त्या आठांपैकी एक. या भागात असलेल्या वेगवेगळ्या सजीवांच्या जातींपैकी सुमारे ३२% प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

दुदैव असं की,  सध्या सापडलेल्या बेडकांचा एक प्रकार ज्या वनस्पतींच्या परिसरात सापडतो, त्या वनस्पतींना संरक्षित म्हणून घोषित केलं नाहीय. त्यामुळं या वनस्पतींना धोका आला, तर या नखाएवढ्या बेडकांची जातही कदाचित पृथ्वीतलावरून नष्ट होऊ शकते. हा धोका खरंच मोठा आहे. उरलेल्या तीन जाती एकाच ठिकाणी उगम पावल्या आहेत त्यामुळं ते ठिकाण अधिक जपायला हवंय. म्हणूनच ते ठिकाण आणि बेडकांच्या जातींच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं मत या संशोधनाच्या प्रमुख सत्यभामा दास बिजू यांनी केलेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required