दोन तोंडांचा कुत्रा बनवू पाहणाऱ्या एका डॉक्टरची गोष्ट!! त्या कुत्र्यांचे पुढे काय झाले?
सध्याचा काळ हा क्रांतीचा आहे. मेडिकल क्षेत्रातील बदल आणि प्रगती देखील आश्चर्यकारक अशीच आहे. आयव्हीएफ, क्लोनिंग, विविध लशी, शस्त्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड प्रमाणात प्रयोग झाले आणि होत आहेत.
पण कुठलीही क्रांती किंवा मोठा बदल घडून येण्यामागे काही वेडे लोक असतात. या लोकांना वेडे म्हणायचा अर्थ हा की ही लोक एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला अक्षरशः झोकून देतात. या काळात त्यांनी केलेले प्रयोग हे विचित्र वाटू शकतात. पण कधीकधी यातून क्रांतीकारी गोष्टींचा शोध लागतो. आज आपण अशाच एका उद्योगी शास्त्रज्ञाची गोष्ट आपण वाचणार आहोत. हा शास्त्रज्ञ ना यशस्वी झाला, ना अपयशी झाला तरी या मधल्या काळात त्याने केलेला प्रयोग हा एकाचवेळी विचित्र आणि आश्चर्यचकित करणारा होता.
१९५० चा काळ हा अनेक बदलांचा होता. याच काळात सोव्हिएत रशियात एक शास्त्रज्ञ होऊन गेला. डॉ व्लादिमीर डेमीखोव असे त्यांचे नाव. या साहेबांनी एक वेगळाच विडा उचलला, तो म्हणजे दोन तोंडं असलेला कुत्रा तयार करणे. या प्रयोगात त्यांनी प्रचंड विश्वास बसणार नाहीत अशा गोष्टी केल्या. मुळात त्याकाळी मेडिकल सायन्समधील प्रगती बघता असा प्रयोग करणे हेच अतिधाडसाचे होते. पण हे शास्त्रज्ञ मात्र पेटून उठले होते.
१९५४ साली त्यांनी एका कुत्र्याला दोन तोंडं लावण्याचा प्रयोग सुरू केला. याकामी त्यांनी आपली पूर्ण टीम लावली. दोन कुत्रे यासाठी त्यांनी आणले. एक मोठा जर्मन शेफर्ड, त्याला त्यांनी ब्रोडयागा असे नाव दिले. दुसऱ्या लहान कुत्र्याला शावका असे नाव देण्यात आले. आता या प्रयोगात त्यांना या दोन्ही कुत्र्यांना एकत्र करून एकच असा कुत्रा तयार करायचा होता.
यासाठी त्यांनी एकदोन नव्हे तर तब्बल २४ सर्जरी केल्या. त्यातल्या २३ अपयशी ठरल्या. तर २४ वी सर्जरी अर्धी यशस्वी झाली. ती कशी ते तुम्हाला पुढे समजेलच. शावकाचे खालील शरीर त्यांनी अर्धे कापले आणि ब्रोड्यागाच्या शरीराच्या वरच्या भागात थोडी चीर करून त्यात ते लावण्याचा प्रयत्न केला. ट्रान्सप्लांट करताना खबरदारी म्हणून शावकाला शेवटपर्यंत त्याच्या हृदय आणि फुफुसांना जोडून ठेवण्यात आले होते.
मोजून साडेतीन तासात त्यांनी हे ऑपरेशन फत्ते केले. आता एकाच कुत्र्याला दोन तोंड होती. दोन्ही तोंडाला असलेल्या अवयवातुन सगळी हालचाल होत होती. चार कान ऐकायला, दोन नाक वास घ्यायला, दोन तोंडे खायला अशी त्याची परिस्थिती होती. यात अडचण अशी झाली की शावकाचे तोंड हे ब्रोड्यागाच्या पोटाला जोडलेले नव्हते. म्हणून त्या तोंडातून जेवलेले पोटात न जाता बाहेरील ट्यूबमधून बाहेर फेकले जात असे.
या सर्वात त्यांच्या गळ्याच्या नसचे नुकसान झाले, त्यामुळे अवघ्या चार दिवसांत तो दोन तोंडाचा कुत्रा मरण पावला. जर ही चूक झाली नसती तर कदाचित हे अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाले असते. अशा पध्दतीने डॉ डोमिखोव यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला, पण तो जास्त काळ टिकू शकला नाही.
उदय पाटील