computer

थेट अंतराळातून जमिनीवर पडून मृत्यू पावलेला अंतराळवीर:व्लादिमीर कोमारोव!! हे खरेतर टाळताही आले असते..

अपघात कुठे चुकलेले नाहीत, मग ते अंतराळ का असेना!! अंतराळातही काही दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे अंतराळवीरांचा मृत्यू होतो. पण अवकाशाने घेतलेला पहिला मानवी बळी कोणता माहित आहे? हा अंतराळवीर थेट अंतराळातून जमिनीवर पडून मृत्यू पावला होता.सोव्हिएट अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव असे त्याचे नाव. २४ एप्रिल १९६७ रोजी व्लादिमीर कोमारोव अंतराळ मोहिमेवर असताना मरणारा पहिला माणूस बनला. सोयुझ 1 अंतराळ यानाच्या मोहिमेदरम्यान कोमारोव पॅराशूट उघडण्यात अयशस्वी झाला आणि खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी नक्की काय घडले होते? याची माहिती आपण करून घेणार आहोत.

अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव हे एक अनुभवी अंतराळवीर होते. विशेष म्हणजे एकदा नव्हे, तर दोन वेळा अवकाशात उड्डाण करणारे ते पहिले अंतराळवीर बनले होते.असे असूनही त्यांच्याबरोबर अशी दुर्घटना घडल्याने खूप हळहळ व्यक्त झाली होती. सोव्हिएत अधिकाऱ्यांनी सोयुझ 1 प्रक्षेपणाची घाई केल्याने ही घटना घडली होती. ग्रेट ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त सोव्हिएत अधिकाऱ्यांना एक अंतराळ कामगिरी करून दाखवायची होती.त्यामुळे सोयुझ 1 प्रक्षेपणाची पूर्ण तयारी झाली नव्हती तरीही यासाठी घाई केली गेली. त्यावेळी सोयुझ 1 अंतराळ यान मानवांना अंतराळात नेण्यासाठी पूर्णपणे तयार नव्हते, ही बाब कोमारोव्हसह इतर अंतराळवीरांनाही माहित होती. आणि विशेष म्हणजे सोयुझ 1 क्रू लाँच करण्यापूर्वी तीन मानवरहित चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या होत्या. पहिल्या यानामध्ये बिघाड झाला, दुसरा प्रक्षेपण पॅडवर स्फोट झाला आणि तिसरा समुद्रात बुडाला होता. एवढेच नाही तर सोयुझ 1 फ्लाईटपूर्व तपासणी दरम्यान डिझाईन फॉल्टही सापडला होता. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता.

२३ एप्रिल १९६७रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे ३:३५ वाजता सोयुझ 1 ला बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून लॉन्च करण्यात आले. प्रक्षेपण ठरल्याप्रमाणे झाले. परंतु यान त्याच्या कक्षेत पोहोचताच समस्या सुरू झाल्या. पहिल्यांदा एक सौर पॅनेल उघडण्यात अयशस्वी झाले. कोमारोव याने दुसऱ्या पॅनेलला सूर्याकडे वळवण्यासाठी अंतराळयान वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. शक्तीच्या अभावामुळे ऑनबोर्ड लाइफ सपोर्ट सिस्टीमशी तडजोड करण्यात धोका होता. नेव्हिगेशन(दिशादर्शन)देखील कार्य करत नव्हते. त्यामुळे ग्राउंड कंट्रोलने मिशन शक्य तितक्या लवकर रद्द करण्याचा निर्णय घेतला. २७ तास आणि १८ मिनिटे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर अंतराळवीर घरी परतण्याच्या मार्गावर होते. कोमारोवनी स्वहस्ते यानाला दिशा दिली आणि रिट्रोकेट्स फायर केले. तोपर्यंत सर्व ठीक होते. त्यावेळी युरी गागारिन आणि व्लादिमीर कोमारोव यांच्यात संवादही झाला. त्यावेळी युरी गागारिन यांनी कोमारोव यांना दीर्घ श्वास घ्या. तुमच्या लँडिंगची वाट पाहत आहे. असा संदेश दिला आणि कोमारोव म्हणाले, "सर्वांना धन्यवाद द्या".

पण दुर्दैवाने कोमारोव यांचे ते अखेरचे शब्द ठरले आणि लँडिंग कॅप्सूलचे मुख्य पॅराशूट उघडण्यात त्यांना यश आले नाही. आणि कोमारोव ६० मीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीवर कोसळले. त्यांच्या मृत्यूनंतर शरीराचे फक्त काही अवशेषच सापडले होते. एक अनुभवी अंतराळवीर, एक कुशल वैमानिक आणि अभियंता, एक कुटुंबप्रमुख, एक नम्र माणूस यांच्या या दुःखद, अनाकलनीय मृत्यूने अंतराळवीर दल, सोव्हिएत जनता आणि पूर्ण जगाला हादरवून सोडले. एका चुकीच्या निर्णयामुळे ही टाळता येणारी घटना घडली होती. त्यानंतर सोव्हिएत युनियनला मानवयुक्त अंतराळ उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास १८ महिने लागले होते.

व्लादिमीर कोमराव यांचा जन्म १९२७मध्ये मॉस्को येथे झाला. सात वर्षांच्या प्राथमिक शाळेनंतर वयाच्या १५व्या वर्षी व्लादिमीरने प्रतिष्ठित “फर्स्ट मॉस्को स्पेशल एअर फोर्स स्कूल” मध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर तो एअर पायलट म्हणून अभ्यास करायला गेला. त्यांनी १९४९ मध्ये फायटर पायलट म्हणून म्हणून काम केले. १९५९ मध्ये कोमारोव यांना नवीन सोव्हिएत अंतराळ कार्यक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आणि ते पहिल्या सोव्हिएत अंतराळवीर संघात सामील झाले . १९६१ मध्ये त्यांनी कॉस्मोनॉटचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि १९६४ मध्ये त्यांची कमांडर म्हणून निवड झाली . त्यांनी २४ तासांचे अंतराळ उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले. कोमारोव्ह यांना अनेक राज्य पुरस्कार मिळाले होते. जेव्हा नवीन सोयुझ अंतराळ यानाची चाचणी घेण्याची वेळ आली, तेव्हा असे म्हटले जाते की कोमारोवने आधीची अपयशी उड्डाणे असूनही स्वतः चालवण्यासाठी पुढाकार घेतला. या मोहिमेत गागारिन सुद्धा सहभागी होते. गागारिन आणि कोमारोव चांगले मित्र होते. जर कोमारोवने माघार घेतली तर गागारिनने त्याची जागा घेतली असती.

पण हे घडले नाही. कोमारोवची नेमणूक मंजूर झाली आणि गागारिनला त्याचा बॅक अप बनवण्यात आले. पुढे जे घडले ते फार दुर्दैवी होते. याच उड्डाणात व्लादिमीर कोमराव याचा जीव गेला आणि तो अंतराळातील पहिला मानवी बळी ठरला.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required