सायबर खंडणीखोरांची जगावर दहशत. वाचा उपाय या हल्ल्यापासून बचाव करण्याचे..

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जगावर मोठा सायबर हल्ला झालाय हे तर तुम्ही वर्तमानपत्रांतून वाचत असालच. आज सोमवारी बरीचशी ऑफिसेस चालू होतील.  तिथं काम करणारे लोक चुकून काही लिंक्सवर क्लिक करतील आणि या हल्ल्याची तीव्रता वाढेल असं जगभरातल्या सायबर तज्ञांचं मत आहे. हा हल्ला तुमच्या-आमच्यावरही होऊ शकतो. यातून वाचणं खूप सोपं आहे, फक्त जरासं लक्ष देण्याची गरज आहे.

रॅनसमवेअर म्हणजे काय?

रॅनसम म्हणजे खंडणी. आता ही आहे मॉडर्न खंडणी. आधी कसे गुन्हेगार मुलं पळवायचे आणि ती परत देण्याच्या बोलीवर पैसे उकळायचे? आता हे लोक आपला डेटा लॉक करतात आणि तो परत देण्यासाठी पैसे मागतात. आजवर मोठ्या कंपन्यांना असे फटके बसायचे. त्यांच्याकडे द्यायला तितकी रक्कमही असे आणि लॉक झालेली माहिती खूप महत्वाची असल्यानं त्यांना या अशा खंडण्या द्याव्या ही लागत.

पण आता या हुशार आणि टेक्निकल चोरांनी आपल्यासारख्या साध्यासुध्या लोकांनाही याचा बळी बनवायला सुरूवात केलीय.

स्त्रोत

यापासून वाचायचं कसं?

सोपं आहे. तुम्हांला एखादा इमेल आली, त्यात एखादी लिंक किंवा ऍटॅचमेंट आहे तर..

१. लिंकवर क्लिक करू नका. ती व्यवस्थित वाचा. जरी ती तुमच्या बँकेच्या खात्याची असेल आणि ते तुमचं अकाऊंट बंद करणार असतील किंवा तुम्हांला तिथं लॉटरी लागली असेल तरीही. त्या इमेलमधली माहिती बरेचदा चुकीची असते आणि तुम्ही घाबरून पटकन  त्या लिंकवर क्लिक करावी असा त्या हॅकर्सचा इरादा असतो. ती माहिती खरी असल्याचा  संशय आला तर स्वत: नवीन टॅब किंवा विंडो उघडून तुम्हांला माहित असलेली तुमच्या बॅंकेची लिंक स्वत: टाईप करा. इमेलमधून आलेली लिंक सारखी दिसत असली, तरी ती खरोखरीची लिंक नसते.

२. इमेलमधून येणारी ऍटॅचमेंट हा ही व्हायरस असू शकतो. समोर वर्ड किंवा दुसरा कुठलाही मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा चित्र असलेली ऍटॅचमेंट दिसत असली तरी ती इन्स्टॉल होऊ शकणारी एक्झिक्युटेबल फाईल असू शकते. इमेल कुणाकडून आलीय हे तपासा. त्या व्यक्तीकडून खरंच तुम्हांला अशी इमेल अपेक्षित होती का? कधी कधी “File/Report you requested” अशी सबजेक्ट लाईन असलेले इमेल येतात. ते बरेचदा खोटे असतात. 

बरेचदा व्हायरस तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या इमेल आयडींचा उपयोग करून तुम्हांला इमेल पाठवतात. त्यामुळं ओळखीच्या व्यक्तीकडून आलेली इमेल खोटी असूस शकते. ऑफिसमधल्या प्रत्येक कामाची इमेल खोटी असू शकणार नाही, परंतु हा धोका टळेपर्यंत प्रत्येक लिंक आणि ऍटॅचमेंट जरा जपूनच उघडा.

३. गुगल ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्सवर डेटाचा बॅकअप ठेवा. म्हणजे जरी तुमची माहिती लॉक झाली, तरी किमान काहीतरी डेटा तुम्हांला अशा गुगल ड्राईव्हसारख्या क्लाऊड स्टोरेजमध्ये मिळेल.

४. चांगल्या दर्जाचं ऍंटीव्हायरस इन्स्टॉल करा. वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिमचे सिक्युरिटी पॅचेस रिलीज केले जातात. त्यामुळं तुमची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेटेड ठेवा.

स्त्रोत

आजवरचे बळी..

गेल्या काही दिवसांत या हल्ल्यानं ९९ देशांतल्या ७५,००० हून अधिक ठिकाणांवर हल्ला केलाय.  वरचा नकाशा पाहिलात तर त्याची तीव्रता समजेल.  रशियाची मंत्रालयं, चीनमधल्या युनिव्हर्सिटीज, हंगेरी आणि स्पेनमधल्या टेलिकॉम इंडस्ट्रीज, ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडून चालवली जाणारी हॉस्पिटल्स आणि दवाखाने याला बळी पडलीयेत. आकडा अजून वाढतोच आहे.

 

त्यामुळं तुम्हीही थोडे सजग व्हा आणि या मॉडर्न खंडणीखोरांपासून स्वत:चा बचाव करा.

सबस्क्राईब करा

* indicates required