computer

स्पॉइलरने सिनेमा बघण्याचा आनंद द्विगुणित होतो ?? स्पॉइलर बद्दल विज्ञान काय म्हणतंय बघा !!

राव ती बातमी पाहिली का, ‘एव्हेन्जर्स-एंडगेम’चा स्पॉइलर सांगितला म्हणून लोकांनी माणसाला बदडलं ? आज गेम ऑफ थ्रोन्सचे चाहते पण असेच पेटलेले आहेत. यानिमित्ताने आज आपण स्पॉइलर्सविषयी बोलणार आहोत.

स्पॉइलर म्हणजे कथानकातील मुख्य भाग आपल्याला तो सिनेमा किंवा कार्यक्रम बघण्यापूर्वीच समजला तर आपल्या आनंदावर पाणी पडतं. म्हणून स्पॉइलर हा प्रकार कोणालाच आवडत नाही, पण विज्ञान या बाबत काहीतरी वेगळंच म्हणत आहे. हे वाचून तुमचा स्पॉइलरकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

२०११ साली सायकोलॉजिकल सायन्स या मासिकाने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. या शोधनिबंधाचं नावंच होतं ‘story spoilers don't spoil stories’. शुद्ध मराठीत ‘स्पॉइलरने तुमच्या आनंदाचा सत्यानाश होत नाही नाही.’

या शोधनिबंधासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि सॅन डियेगो येथील शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. वेगवेगळ्या इंग्रजी लेखकांच्या १२ कथा निवडून ३ प्रकारचे प्रयोग करण्यात आले होते. हे ३ प्रयोग पुढीलप्रमाणे होते.

प्रयोग १. परिचयाच्या लेखातच कथानकाचा शेवट सांगण्यात आला होता.

प्रयोग २. कथेचा शेवट कथेपासून वेगळ्या एका वेगळ्या परिच्छेदात सांगण्यात आला होता.

प्रयोग ३. कथेचा शेवट सांगितलाच नव्हता.

या प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. आपल्याला वाटेल की कथेचा शेवट सांगितल्यावर कसली मजा उरणार, पण आश्चर्य म्हणजे ज्या कथेचा शेवट परिचयातच देण्यात आला होता ती कथाच लोकांना जास्त आवडली. ज्या कथांचा शेवट एका वेगळ्या परिच्छेदात देण्यात आला होता ते कथानक सर्वात जास्त पसंतीस उतरलं.

मंडळी, हा अभ्यास सांगतो की कथेचा मुख्य भाग किंवा कथेचा शेवट आधीच माहित असल्याने वाचण्याचा किंवा बघण्याचा आनंद द्विगुणित होतो. हा अभ्यास असं न पटण्यासारखं विधान का करतो याचं कारणही जाणून घ्या.

राव, हा अभ्यास जर त्या माणसाला धुणाऱ्यांनी वाचला तर ते आधी या शास्त्रज्ञांना जाऊन मारतील, पण याचं कारण जाणून घेतल्यावर तुम्हाला कदाचित हे पटेल. त्याचं असं आहे की, कथानकाचं मुख्य आकर्षण जर आधीच माहित असेल तर आपला मेंदू इतर लहानसहान गोष्टींवर लक्ष देतो. म्हणजे एव्हेन्जर्सचा शेवट जर माहित नसेल तर आपण सगळ्या उत्सुकतेने शेवटाकडे डोळे लावून बसलेले असू, पण जर तो माहित असेल तर पूर्ण सिनेमात नेमकं काय काय घडत आहे ते बघण्यात आपलं जास्त लक्ष असेल. एकाच एक भाग बघण्यासाठी तासभर बसून राहिल्यास इतर गोष्टी निसटून जाऊ शकतात असं हा शोध म्हणतो.

उदाहरणादाखल आपले जुने सिनेमे पाहा. तुमच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत असे बरेच सिनेमे असतील जे तुम्ही निदान १० वेळातरी बघितलेच असतील. या चित्रपटांचा शेवट तुम्हाला माहित असूनही तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. थोडक्यात स्पॉइलर कथा नीट समजून घ्यायला मदत करतो.

 

मंडळी, याचा अर्थ बोभाटा स्पॉइलर्सच्या बाजूने आहे असं नाही बरं का, स्पॉइलर्स देणं हे पापच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required