computer

भारत आता हेरगिरी करणारे उपग्रह पण मिसाईलने पाडू शकतो.. वाचा याचा भारताला काय फायदा होऊ शकतो!!

(प्रातिनिधिक फोटो)

स्टार वॉर्स सिरीज तर पाहिलीच असेल तुम्ही… त्यातली माणसे किंवा रोबोट्स पृथ्वीवर न लढता अंतराळात युद्ध लढताना पाहून विचार केला असेल की हे खरंच शक्य आहे का? म्हणजे त्या मध्ये फक्त अमेरिका वगैरे देश दाखवतात, पण भारताला हे शक्य आहे का? तर हो! भारतालाही ते शक्य आहे! 

कसं आहे मंडळी, या जगात पूर्वीपासूनच विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात एक छुपी स्पर्धा सुरू असते. विकसित देशांकडे असलेले उच्च तंत्रज्ञान हे त्यांना विकसनशील देशांना द्यायचे नसते. जसे श्रीमंत लोक गरिबांना निम्न दर्जाची वागणूक देतात तसंच हे. मग अश्या वेळी एखादा गरीब समजला जाणारा व्यक्ती जेव्हा स्वतः कष्ट घेऊन कमाई करून पैसे मिळवून श्रीमंतांची बरोबरी करायला जातो तेव्हा त्याच्यावर आरोप केले जातात. आता असेच आरोप भारतावरही केले जाणार आहेत. कारण? आजची महत्वपूर्ण घोषणा! आता भारत जगातील चौथा देश बनला आहे जो ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल’ या तंत्रज्ञानाने सज्ज आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर आता भारताकडेही ही शक्ती आली आहे… ‘मिशन शक्ती!’ 

पूर्वी भारताने अणुचाचण्या केल्या तेव्हाही या देशांनी आपल्यावर बहिष्कार घातला होता हे आठवत असेलच. पण तेव्हाचा भारत आणि आजचा भारत हा वेगळा आहे मंडळी. आज कुणी भारताला अरे म्हंटले तर भारत त्यांना कारे म्हणू शकतो इतकी हिंमत आपण राखून आहोत. 

आता हेच बघा ना… आज पंतप्रधानांनी अशी घोषणा केली की “भारताने एल इ ओ मधील लाईव्ह सॅटेलाईटला मिसाईलने तीन मिनिटात उडवले.” ऐकण्यास हे सोपे वाटत असले तरी या मागे आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे कष्ट आहेत. हे तंत्रज्ञान वाटते तितके सोपे नाही. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या देशाची मदत न घेता आपण हे स्वबळावर विकसित केले आहे. चला या निमित्ताने जाणून घेऊया की आज चर्चेत असणारे एल इ ओ आणि ए-सॅट हे नक्की आहे तरी काय? 

(प्रातिनिधिक फोटो)

एल इ ओ म्हणजे ‘लो अर्थ ओरबीट’ पृथ्वीच्या बाहेरील जवळपास 2000 किलोमीटर्स पर्यंत असणाऱ्या कक्षेला एल इ लो म्हणतात. याच ओरबीट मध्ये मानवनिर्मित उपग्रह सोडले जातात जे पृथ्वीभोवती भ्रमण करत असतात. हे सॅटेलाईट अंतराळातून पृथ्वीवर नजर ठेवून माहिती गोळा करतात आणि ती माहिती आपापल्या नियंत्रण कक्षाला पाठवतात. त्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा योग्य/अयोग्य वापर केला जातो.

अर्थातच, ज्या देशाचे अंतराळात जास्त सॅटेलाईट असतील तो देश बलाढ्य समजला जातो. आज अमेरिका, रशिया आणि चीन याबाबत आघाडीवर आहेत आणि भारत जवळपास त्यांची बरोबरी करण्याच्या स्थितीत आहे. सॅटेलाईट द्वारे काय काय करता येऊ शकतं? तर वातावरणावर नजर ठेवणे, प्रदूषणावर नजर ठेवणे, ग्लोबल पोझिशनिंग, दळणवळण, दूरसंचार इत्यादी बाबी सुरळीत चालवणे. यामुळे शेतकर्यांपासून ते जवानांपर्यंत सर्वांनाच फायदा होतो. पण आणखी एका प्रकारे याचा वापर होतो मंडळी… दुसऱ्या देशांची किंवा शत्रूराष्ट्राची हेरगिरी करणे आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणे. कुठल्याही व्यक्तीला स्वतःची हेरगिरी करणे आवडणार नाही, मग याला एखादे राष्ट्र तरी कसे अपवाद असू शकेल? मग अश्या वेळी गरज भासते अश्या तंत्रज्ञानाची जे हेरगिरी करणाऱ्या सॅटेलाईटला अंतराळातच नष्ट करू शकेल. त्यातूनच जन्म झाला ए-सॅट अर्थात ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल’ चा. 

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आपल्याला माहीतच आहे. पण जमिनीवरून आकाशात, ते सुद्धा तीन-चारशे किलोमीटर्स वरील लक्ष्याचा अचूक वेध घेणे म्हणजे सोपे काम नव्हे! पण ती किमया अमेरिका, रशिया आणि चीन नंतर आपल्या भारत देशाने साधली आहे. मिशन शक्ती या प्रकल्पाद्वारे DRDO (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) आणि ISRO (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) या दोन संस्थांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. अर्थात, भारत हा नेहमीच शांतिप्रिय देश असल्याने युद्धासाठी याचा वापर करणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे. परंतु मंडळी, वेळ पडली तर याचा वापर होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. 

आपल्यासाठी ए-सॅट महत्वाचे का होते? भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून भारताला त्रास देत असतात. अश्यातच चीन कडे सॅटेलाईटस आणि ए-सॅट असल्याने व पाकिस्तान हा चीनचा मित्र देश असल्याने भारताला, पर्यायाने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. भारतावर नजर ठेवून हेरगिरी करणारे चिनी सॅटेलाईट हे पाकिस्तानला आपली गुप्त माहिती पुरवत असतात हे उघड गुपित आहे. तर आजची घोषणा ही या दोन्ही देशांसाठी गर्भित इशारा आहे हे समजण्यास हरकत नाही. जर तुम्ही कागाळी केली तर आम्ही आता तुमचे सॅटेलाईट सुद्धा नष्ट करू शकतो, ते ही फक्त तीन मिनिटात हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे! 

ज्या वेळी अवकाशात सॅटेलाईट पाठवण्याची स्पर्धा सुरू होती त्यावेळी त्याला ‘स्पेस रश’ अस्स संबोधले गेले होते. आता सॅटेलाईट पाडण्याच्या स्पर्धेत आपण उतरलो आहोत… स्टार वॉर्स सुरू झाले आहे मंडळी!

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required