computer

शरीरात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा करणारे लोक किती खरं बोलत असतात? विज्ञान काय म्हणतं पाहा!!

माणसाचं शरीर म्हणजे एक गुढ आहे. अनेक चमत्कारिक गोष्टी यामध्ये घडत असतात. विज्ञानाच्या मार्गाने शरीराचा अभ्यास करण्यात माणसाला बऱ्यापैकी यश आले आहे, पण असं काहीतरी नवीन घडतं की परत विचार सुरू होतो, हे खरंच शक्य आहे का? हो! बघा ना सध्या एका चुंबकीय माणसाचे फोटो व्हायरल होत आहेत. असा हा पहिलाच माणूस नव्हे, यापूर्वीही जगभरात अशी अनेक चुंबकीय माणसे समोर आली आहेत. या सगळ्यांचा एकच दावा होता की ‘आमच्या शरीरात चुंबकीय शक्ती आहे’. पण खरोखरच चुंबकीय लोकं आहेत का? या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या?  आज समजून घेऊयात या मागचे वैज्ञानिक कारण.

सुरुवातीला चुंबकीय शक्ती बाळगणाऱ्या लोकांनी केलेले दावे पाहूया.

स्वतःमध्ये चुंबकीय शक्ती आहे असा दावा करणाऱ्या लोकांचे एक समान गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीराला स्टीलचे चमचे, नाणी, छोट्या लोखंडी वस्तू सहज चिकटतात. याखेरीज हे लोक ठामपणे दावा करतात की ते चक्क चुंबकीय क्षेत्र तयार करतात. हे जर खरे असेल तर कोणतीही धातूची वस्तू त्यांच्या दिशेने आकृष्ट होऊ शकेल. म्हणजे ते ज्या दिशेला फिरतील त्या दिशेला ती वस्तू फिरत राहिली पाहिजे. याखेरीज लहान लहान धातूच्या वस्तू त्यांना येऊन अपोआप चिकटतील.

आता पाहूया या सगळ्या भानगडीमागचं सत्य

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांचे सगळे प्रयोग उघड्या शरीरावर होतात. जर चुंबकीय शक्ती अंगात असेल तर कपडे घालूनही धातूच्या वस्तूंना आकर्षित करता येऊ शकते. त्यासाठी उघडे असण्याची काहीच गरज नाही. आपण हातात दोन लोहचुंबक घेतले तर ते दुरून एकमेकांना आकर्षित किंवा अवरोध करतात. आपले हात आपोआप खेचले जातात. त्यावर कापड जरी टाकलेत तरी चुंबकीय आकर्षण कधीच कमी होऊ शकत नाही. यामुळे शरीरात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा पुर्णपणे चुकीचा ठरतो.

मग त्यांच्या अंगावर चिकटणाऱ्या वस्तू कशामुळे चिकटतात? याची दोन कारणे आहेत. पहिले घर्षण होय. या लोकांच्या अंगी असलेली चुंबकीय क्षमता संपूर्णपणे घर्षणावर आधारित असते. तुम्ही जर नीट पाहिले तर दिसेल की शरीरावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये नेहमी गुळगुळीत पृष्ठभाग असतो. आणि जेव्हा हे लोक वस्तू शरीरावर ठेवतात तेव्हा ते नेहमी थोडेसे मागे झुकलेले दिसतात. यामुळे वस्तू पडत नाहीत व गुरुत्वाकर्षणामुळे त्वचेवरील घर्षण सहन करण्याची शक्ती कमी होते.

दुसरे कारण म्हणजे या लोकांची विलक्षण चिकट (किंवा क्लेमी) आणि लवचिक त्वचा. त्वचेवर चिकटपणा नैसर्गिकपणे एका स्त्रावापासून तयार होतो. त्या स्त्रावाला सीबम म्हणतात. काही लोकांमध्ये हा सीबम जास्त प्रमाणात तयार होतो. त्यामुळे समजा त्वचा धुतली गेली नाही तर त्यांची त्वचा चिकट होते.

चुंबकीय शक्ती असलेल्या लोकांच्या त्वचेची लवचिकता वस्तूंना अधिक चांगले चिकटून राहण्यास मदत करते. जेव्हा एखादी वस्तू त्वचेवर ठेवली जाते, तेव्हा लवचिक त्वचा अधिक ल त्या वस्तू पकडून ठेवण्यास मदत करते. म्हणूनच हे लोक कोणतीही धातूची वस्तू नेहमी त्यांच्या उघड्या शरीरावर लावतात.

एकूण काय तर लवचिक आणि चिकट शरीरामुळे या लोकांच्या शरीरावर धातूच काऊ प्लास्टिक, काच किंवा लाकूडही चिकटेल त्यामुळे शरीरात चुंबकीय शक्ती असण्याचा दावा साफ खोटा ठरतो.

शेवटी एवढंच म्हणू की केवळ मनोरंजन किंवा ट्रिक म्हणून या गोष्टीकडे पाहायला हवं. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात चुंबकीय शक्ती असणे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required