जेवल्यानंतर झोप का येते ? हे आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण !!

जेवल्यानंतर झोप येते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण हे का होतं हे माहित आहे का ? नसेल माहिती तर आम्ही सांगतो ना.
अन्न पोटात गेल्यानंतर काय घडतं?
जेवल्यानंतर झोप का येते हे समजून घेण्यापूर्वी पचनक्रिया कशी काम करते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा अन्न चावत असता तेव्हा पोटात गॅस्ट्रिन तयार होत असतं. या गॅस्ट्रिन मुळे पाचकरस तयार होतो. पाचकरसामुळे अन्न पचायला सुरुवात होते. पुढे जाऊन आतड्यात एंटरोगॅस्ट्रॉन संप्रेरक सोडलं जातं. एंटरोगॅस्ट्रॉनमुळे पचलेलं अन्न लहान आतड्यांमध्ये पाठवलं जातं.
हे होत असताना कर्बोदकांमधून ग्लुकोज शोषून घेण्यासाठी स्वादुपिंडाकडून इन्सुलिन सोडलं जातं. इन्सुलिन मेंदूकडे वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल पाठवतं. यात ट्रिप्टोफेन नावाचं आम्ल देखील असतं. या ट्रिप्टोफेनला 'स्लीपि केमिकल' हे दुसरं नाव आहे. आता लक्षात आलं, झोप येण्यामागे कोण जबाबदार आहे ?
आपल्याला प्रत्येक जेवणानंतर झोप येतेच असं नाही. झोप येण्याचं प्रमाण आपण घेत असलेल्या अन्नावर पण अवलंबून असतं. ज्या अन्नामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असतात ती घेतल्यानंतर आळस, गुंगी आल्या सारखी वाटते.
कर्बोदके जास्त प्रमाणात असणे म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जास्त असणे. इन्सुलिन जास्त म्हणजे इन्सुलिनमुळे मेंदूकडे जाणाऱ्या ट्रिप्टोफेनचं प्रमाण पण जास्त असणार.
ट्रिप्टोफेन मेंदूत जाऊन काय करतो ?
ट्रिप्टोफेन आधी तर सेरोटोनीनमध्ये रुपांतरीत होतो. यामुळे आपल्याला छान वाटतं. पुढे जाऊन ट्रिप्टोफेनचं रुपांतर मेलाटोनीनमध्ये होतं ज्यामुळे आपल्याला गुंगी येते. याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कर्बोदाकातील गुल्कोज सुद्धा मेंदूतील ओरेक्सीन न्युरॉनवर परिणाम करतं.या ओरेक्सीन न्युरॉनचं काम हे आपल्याला जागरूक ठेवण्याचं असतं. ग्लुकोजमुळे ओरेक्सीन न्युरॉनवरवर परिणाम होऊन आपल्याला झोप येते.
मंडळी, कर्बोदाकामुळे आपल्याला गुंगी येते तर त्याच्या अगदी उलट परिणाम प्रथिनांमुळे होतो. प्रथिनं जास्त असलेल्या अन्नामुळे उत्साही वाटतं. प्रथिनांमुळे शरीरात उत्तेजक अमिनो आम्ल तयार होतात.
झोप येऊ नये किंवा गुंगी येऊ नये म्हणून काय कराल ?
सुट्टीच्या दिवशी अशी झोप लागणं ठीक असतं, पण कामाच्या वेळात गुंगी येऊन चालत नाही. त्यासाठी काही उपाय आहेत. आधी तर सावकाश खा. सावकाश खाल्ल्याने शरीरातील संप्रेरकांना समतोल राखण्यास मदत होते. याखेरीज फॅट्सचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा. महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार केव्हाही चांगला.
तर मंडळी, काम करताना सकाळी असलेला उत्साह दुपारच्या जेवणानंतर कुठे जातो त्याचं हे उत्तर आहे.