computer

अमेरिकेतल्या डेथ व्हॅलीतल्या स्थलांतरीत होणाऱ्या दगडांमागचं रहस्य!! मोठाले दगडही चक्क १ किमी अंतरावर सापडतात!!

पृथ्वीवरच्या अनेक रहस्यमय ठिकाणांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. लाखो प्रयत्न करूनही शास्त्रज्ञ त्यांचे कोडे सोडवू शकलेले नाहीत. ही ठिकाणे त्यांच्या अनोख्या आणि विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. या लेखात आज आपण अमेरिकेच्या डेथ व्हॅलीबद्दल बोलणार आहोत. डेथ व्हॅली नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पूर्व कॅलिफोर्निया आणि नेवाडादरम्यान आहे. असे म्हणतात की या रहस्यमय ठिकाणी मोठमोठे दगड शेकडो फुटांवर आपोआप फिरतात.

हे दगड स्वतःहून कसे फिरतात? या जागेवर अनेक संशोधने झाली असूनही त्याचे रहस्य उलगडलेले नाही. याच कारणांमुळे हे रहस्यमय ठिकाण पाहण्यासाठी परदेशातून अनेक पर्यटक येतात.. हे रहस्यमय ठिकाण २२५ किमीच्या भागात पसरले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे दगड आजपर्यंत कोणीही हलताना पाहिलेले नाहीत. हे दगड हलल्यानंतर सापडलेल्या रेषांच्या खुणांवरून दगड एका ठिकाणाहून दुसरीकडे गेल्याचे लक्षात येते.

दगड फिरतात, पण मग ठिकाणाला डेथ व्हॅली का म्हणतात?

डेथ व्हॅली हे नाव मिळण्यामाने तिथले तापमान आहे. एकदा तिथले तापमान ५६.७ डिग्री सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. अर्थातच याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे.
ही दरी रंगीबेरंगी खडकांनी भरलेली आहे. हे खडक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे समुद्रसपाटीपासून २८२ फूट खाली असूनही ही दरी पूर्णपणे कोरडी आहे. भूगर्भशास्त्रज्ञ मानतात की या ठिकाणी एकेकाळी समुद्र असावा, कारण ते समुद्रसपाटीपासून खाली आहे आणि दऱ्यांमध्ये मिठाचे ढिगारेही सापडले आहेत.

दगड फिरण्यामागे रहस्य काय असावे?

हे दगड घसरण्यामागे शास्त्रज्ञांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. हे रहस्य उलगडण्यासाठी १९७२ साली शास्त्रज्ञांची एक टीम या ठिकाणी आली होती. त्यांनी सुमारे ७ वर्षे या दगडांचा अभ्यास केला. त्या काळात शास्त्रज्ञांनी विशेषतः ३१७ किलो वजनाच्या दगडाचा अभ्यास केला. त्याच्या संशोधनादरम्यान तो दगड अजिबात हलला नाही.

मात्र काही वर्षांनी, तो दगड पुन्हा शोधण्यासाठी शास्त्रज्ञ पुन्हा तेथे पोहोचताच, तो सुमारे १ किलोमीटर अंतरावर सापडला. हे पाहिल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. इतर अनेक शास्त्रज्ञांच्या मते हे दगड जोरदार वाऱ्यामुळे हलतात. मात्र दगड हलण्याच्या कारणाबाबत संशोधकांचे एकमत नाही.

काही लोक म्हणतात की अलौकिक शक्ती या दगडांना हलवतात. स्पेनच्या कॉम्प्युटेन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की हे येथील मातीत असलेल्या सूक्ष्मजंतूंमुळे होते. हे सूक्ष्मजंतू मातीला स्निग्ध बनवतात. त्यामुळे दगड मातीवर फिरतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दगडांच्या गूढ घसरण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही.

काहींच्या मते धुळीच्या वावटळीमुळे दगड पुढे सरकतात. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की या महाकाय तलावाच्या परिसरात अनेकदा जोरदार वारा वाहत असतो. त्या वाऱ्यांमुळेच दगड पुढे सरकतो.

२०१४ मध्ये हे गूढ उलगडले?

काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांच्या टीमने याचे कारण शोधल्याचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार सरोवराच्या पृष्ठभागावर काही पाणी शिल्लक आहे. ते थंडीत गोठते आणि तलावाच्या पृष्ठभागावरच्या दगडांना खाली घट्ट चिकटते. नंतर जेव्हा हवामान गरम होते, तेव्हा दगडाला चिकटलेला बर्फ वितळतो, ज्यामुळे तलावाच्या पृष्ठभागावर थोडेसे पाणी साचते. त्यानंतर जेव्हा वारा वाहतो तेव्हा दाबामुळे दगड पुढे जाऊ लागतो. तसेच तिथली वाळूही त्याला हलायला मदत करते आणि बर्फामुळे तलावाचा पृष्ठभाग मागे राहतो.

हे गूढ उलगडल्याचा दावा केला असला तरी अजूनही काही जणांच्या मते हे सिद्ध झाले नाही. म्हणूनच येणारा काळच सांगू शकेल ही यामागेही अजून कुठले रहस्य दडले आहे का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required