computer

गोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते ? हे आहे वैज्ञानिक उत्तर !!

गोंडस बाळ दिसलं की त्याचे गालगुच्चे घेण्याची इच्छा होते, त्याला कुशीत घ्यावसं वाटत. हो ना ? मांजर किंवा कुत्र्याचं गोंडस पिल्लू दिसलं तरी साधारण हीच भावना असते. यावेळी आपण एक गोष्ट विसरलेलो असतो ती म्हणजे, त्या ‘so cute’ बाळाला आपल्या अचानक आक्रमणाने त्रासही होत असावा.  

मंडळी, कधी विचार केला आहे का, गोंडस प्राणी दिसला की आपण त्याला हात लावण्यासाठी एवढे उतावीळ का होतो ? नाही उत्तर ? विज्ञानाकडे याचं उत्तर आहे !! चला जाणून घेऊ या !!

या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘cute aggression’ म्हणतात. ज्यावेळी आपण गोग्गोड बाळाला किंवा प्राण्यांना बघतो तेव्हा आपण एक प्रकारे हिंसक होत असतो, पण वाईट कारणांनी नाही. याला मानवी स्वभाव कारणीभूत आहे.

ज्या क्षणी आपल्याला भरून येतं त्यावेळी मेंदू त्याच्या अगदी उलट प्रतिक्रिया व्यक्त करतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चांगली बातमी ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं, मुल जन्माला आल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी येतं, काही अघटीत घडलं की माणूस अचानक हसायला लागतो. अशा प्रकारच्या विरुद्ध प्रतिक्रिया आपण व्यक्त करतो. गोंडस बाळाला पाहून आपली अशीच प्रतिक्रिया असते. आत्यंतिक प्रेम दाटून आलेलं असताना अशा विरुद्ध प्रतिक्रियांनी मेंदू आपल्या भावनांचा समतोल साधण्याचं काम करत असतो.

२०१५ साली एल युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ ओरीयाना अॅरेगॉन यांनी केलेल्या परीक्षणात असं दिसून आलं आहे, की खऱ्या आयुष्यात बाळाचा गालगुच्चा घ्यायची जेवढी इच्छा होत नाही त्यापेक्षा जास्त इच्छा बाळाचा फोटो पाहिल्यानंतर होते. कारण फोटोमधून आपल्याला त्यांना स्पर्श करता येत नाही.

आपण सगळ्यांनीच ‘बबल रॅप’ फोडले असतील. वैज्ञानिकांनी या बबल रॅपच्या मदतीने एक प्रयोग करून पाहिला होता. प्रयोगात सामील लोकांना बबल रॅप फोडायचे होते, पण त्याआधी त्यातील अर्ध्या लोकांना लहान प्राण्यांचे, बाळांचे फोटो दाखवण्यात आले. ज्यां लोकांनी फोटो पाहिले होते त्यांनी इतरांपेक्षा जास्त बबल रॅप फोडले हे सिद्ध झालं.

विज्ञानाने यामागची आणखी एक थियरी सांगितली आहे. लहान बाळ किंवा पिल्लांना पाहिल्यावर माणसाची सर्वात पहिली प्रतिक्रिया त्यांना संरक्षण देण्याची असते. यामुळेच ते आपल्याला Cute वाटतात.

तर मंडळी, ज्या गोष्टी आपल्याला आत्यंतिक गोड वाटतात त्यांच्याच बाबतीत आपण असे हिंसक का होतो त्याचं हे वैज्ञानिक उत्तर.