computer

सायनाबद्दल सर्वांना माहित नसलेल्या २० रोचक आणि रंजक गोष्टी.. ती प्रत्येक विजय कसा साजरा करते माहित आहे?

सध्या डेन्मार्कमधल्या अर्हस शहरात उबर कप ही बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु आहे. तिथे आपली सायना नेहवालनेही भाग घेतला होता. मात्र सध्या शारीरिक दुखापतीमुळे सायनाने खेळातून माघार घेतली आहे. असे असले तरी सायनाला एकेरी बॅडमिंटनची राणी म्हटलं जातं. तिच्यावर मध्यंतरी एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून तुम्हाला सायना आणि तिच्या पालकांनी आजचे हे स्थान मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष केला आहे, हे तुम्ही पहिलेच असेल. आपल्या सर्वांच्या या आवडत्या बॅडमिंटनपटूबद्दल काही खास रोचक माहिती आम्ही आजच्या या लेखातून घेऊन आलो आहोत.

१) आज जरी सायना बॅडमिंटनसाठी ओळखली जात असली तरी बॅडमिंटनमध्ये येण्यापूर्वी ती कराटे चॅम्पियन होती. कराटेमध्ये तिने ब्लॅकबेल्टही मिळवला आहे.

२) सायनाने आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीतरी मोठी मजल गाठली आहे, याचे श्रेय नक्कीच तिच्या आईवडिलांकडे जाते. त्यांनी तिच्यासाठी खस्ता तर खाल्ल्याच, पण बॅडमिंटनचा हा वारसा तिला तिच्या आई-वडील दोघांकडूनही मिळाला. तिचे वडील हरवीर सिंग आणि आई उषा नेहवाल दोघेही हरयाणाचे स्टेट बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. खेळाचा वारसा तिला रक्तातूनच मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही

३) सायनाला देशातले उत्तमोत्तम प्रशिक्षक भेटतील याची तिच्या आईवडीलांनी काळजी घेतली. या सगळ्या गोष्टींसाठी भरमसाठ खर्च येत असे. तिच्या वडिलांनी कधी हार मानली नाही. प्रसंगी उधार-उसनवारी करून किंवा कर्ज काढून का असेना पण तिला कशाचीही कमतरता भासणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.

४) २००६ साली तिने एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकून इतिहास घडवला. ही टूर्नामेंट तिने दोनदा जिंकली आहे आणि हाही एक इतिहासच आहे.

५) फिलिपाईन्स ओपन स्पर्धा जिंकणारी ती पहिली सर्वात तरुण आशियाई खेळाडू तर पहिली भारतीय महिला खेळाडू होती.

६) २००८ मध्ये तिने ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

७) २००९ मध्ये तिने BWF सुपर सिरीज हा किताब जिंकला आणि हा किताब पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

८) २०१० साली तिने मलेशियन खेळाडू वोंग म्यू चू हिचा ओपन ग्रँड गोल्डमध्ये पराभव केला आणि या स्पर्धेतील ती क्रमांक एकची विजेती ठरली.

९) २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेमसाठी तिने ॲम्बॅसिडर म्हणूनही काम केले.

१०) कॉमनवेल्थमध्ये तिने एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदके अशी एकूण तीन पदकांची कमाई केली.

११) २०१२ साली झालेल्या लंडन ऑलम्पिक्समध्ये तिने कांस्य पदक पटकावले होते.

१२) महिला एकेरीमध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने तिला क्रमांक एकची खेळाडू घोषित केले होते. ही बिरुदावली पटकावणारीही ती पहिली भारतीय महिला आहे.

१३) बॅडमिंटन लीगमध्ये सायना हैद्राबाद हॉटशॉटकडून खेळते.

१४) प्लेईंग टू विन नावाने तिने स्वतःचे आत्मचरित्रही लिहिले आहे. हे पुस्तक खेळाच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी खूपच प्रेरणादायी ठरले आहे.

१५) भारतातील सर्वात जास्त प्रसिद्ध आणि यशस्वी खेळाडू म्हणून तिच्याकडे पहिले जाते. तिने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव करण्यासाठी तिला पद्मभूषण या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. याशिवाय तिला राजीव गांधी खेळ रत्न म्हणजेच आताचा ध्यानचंद पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.

१६) एकेकाळी सायना ही जगातील सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू होती. तिचे वार्षिक मानधन कोट्यावधी डॉलर्सच्या घरात होते.
१७) सायनाला चित्रपट पाहण्याचेही प्रचंड वेड आहे आणि कदाचित खूप कमी लोकांना याची माहिती असेल की ती एसआरके म्हणजेच शाहरुख खानची खूप मोठी चाहती आहे. ऑलम्पिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर जेव्हा तिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता, त्यावेळी या कार्यक्रमात शाहरुखनेही उपस्थिती लावली होती आणि तिने शाहरुखला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करायला लावला होता. शाहरुखने तिच्या विनंतीवरून हा सीन करूनही दाखवला होता.

१८) भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचीही ती एक प्रमुख अम्बॅसिडर होती.

१९) खूप कमी लोकांना हे माहिती असेल की, सायनाने २०१५ साली तमिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांची मदत केली होती. आसाममधील पूरग्रस्तांसाठीही तिने पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्य निधीमध्येही तिने मदत केली होती. २०१७ साली केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकातील एन्काउंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी तिने सहा लाखांची मदत दिली होती.

२०) आणखी एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे सानिया तिचा प्रत्येक विजय आईसक्रिम खाऊनच साजरा करते. तिच्यातील निरागसपणा आणि साधेपणा अजूनही तिने जपला असल्याचीच ही पोचपावती म्हणावी लागेल.

एक यशस्वी महिला खेळाडू म्हणून सानिया नेहवाल बद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. आज तिच्याबद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required