वयाच्या २५ व्या वर्षी धर्मांतर ते टी -२० WC स्पर्धेतील हिरो! या आहेत रॉबिन उथप्पाच्या आयुष्यातील ५ खास गोष्टी...

भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने (Robin uthappa) सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (१४ सप्टेंबर) ट्विट करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने भारतीय संघासाठी एकूण ४६ वनडे आणि १३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.भारतीय संघाला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात रॉबिन उथप्पाने मोलाची भूमिका बजावली होती. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने कर्नाटक आणि केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ९००० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तब्बल २० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. दरम्यान त्याच्या निवृत्तीनंतर आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील ५ खास गोष्टींबद्दल अधिक माहिती देणार आहोत. (Robin uthappa retirement)
१) रॉबिन उथप्पाच्या वडिलांचे नाव वेणू उथप्पा आहे. त्याच्या वडिलांनी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका पार पाडली आहे. तसेच ते कर्नाटक हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. वडिलांना हॉकीची आवड असताना देखील मुलाने वेगळी वाट निवडली. रॉबिन उथप्पाला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची खूप आवड होती.
२) रॉबिन उथप्पाचे वडील हिंदू आणि आई ख्रिश्चन आहे. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत तो हिंदू म्हणून राहिला. मात्र २०११ मध्ये त्याने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. उथप्पासोबत त्याच्या बहिणीनेही ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
३) रॉबिन उथप्पाला एक उत्कृष्ट फलंदाज बनवण्यात कोच प्रवीण आमरे यांचा मोलाचा वाटा आहे. प्रवीण आमरे हे त्याचे पर्सनल कोच होते. रॉबिन उथप्पा जिथे जिथे सामने खेळण्यासाठी जायचा, प्रवीण आमरे देखील त्याच्यासोबत जायचे. त्यांनी रॉबिन उथप्पाला फलंदाजीतील चुका समजावून सांगितल्या.
४) २०१३-१४ हे वर्ष रॉबिन उथप्पाच्या आयुष्यातील सर्वात आनंदादायी वर्ष होते. कारण याच वर्षी रॉबिन उथप्पाने कर्नाटक संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली होती. इतकेच नव्हे तर दिलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी स्पर्धेत देखील विजय मिळवून दिला होता. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयात देखील मोलाची भूमिका बजावली होती.
५) तसेच २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत रॉबिन उथप्पाने भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्याने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ५० धावांची खेळी केली होती. इतकेच नव्हे तर सामना जेव्हा बरोबरीत सुटला होता, त्यावेळी त्याने बॉल आऊटमध्ये देखील चेंडू यष्टीला मारला होता.
रॉबिन उथप्पा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र त्याला भारतीय संघासाठी जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला केवळ १३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. तर शेवटचा टी -२० सामना त्याने २०१५ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळला होता. मात्र तो आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येत होते. आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र आता तो आयपीएल स्पर्धा देखील खेळताना दिसून येणार नाहीये.