computer

भारतीय क्रिकेट संघाला भुर्दंड सोसायला लावलेले अंपायर्सच्या चुकीच्या निर्णयांचे ६ किस्से!!

क्रिकेटमध्ये खराब अंपायरिंगमुळे एखादी मॅच हरली की भरपूर चर्चा होते. एक चुकीचा निर्णय पूर्ण मॅचचा कल बदलतो आणि जिंकणारी मॅच हरण्याची नामुष्की संघावर येते. भारतीय संघालाही खराब अंपायरिंगमुळे मॅच हरण्याची वेळ बऱ्याचदा आली आहे. आज आपण ते ६ वादग्रस्त किस्से बघूया ज्यामुळे भारतीय संघाला भुर्दंड सोसावा लागला होता.

स्टीव्ह बकनर

२००८ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ती सिरीज आतापर्यंतची सर्वात वादग्रस्त क्रिकेट मालिका ठरली होती. या मालिकेत दुसऱ्या सामन्यामध्ये अनेक वाईट अंपायरिंग कॉल करण्यात आले होते. हे खुद्द अंपायर स्टीव्ह बकनरने वर्षांनंतर कबूल केले होते. त्यातली एक चूक म्हणजे भारत चांगली कामगिरी करत असताना ऑस्ट्रेलियन फलंदाज अँड्र्यू सायमंड्सला नाबाद ठरवले आणि दुसरी चूक म्हणजे राहुल द्रविडला बाद ठरवले. स्टीव्ह बकनरचे एकाच कसोटीत दोन्ही निर्णय भारतविरोधी ठरले. आजवर बकनरने भारताविरुद्ध एवढे चुकीचे निर्णय दिले आहेत कि त्यांना भारताविरुद्ध आकस होता असे म्हणायला वाव आहे. 

 

विनीत कुलकर्णी

भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात टी२० सामन्यादरम्यान विनीत कुलकर्णी हे पंच होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज जेपी ड्युमिनीला लागोपाठ दिलेल्या दोन जीवदानामुळे भारत मॅच हरला होता. एरवी कूल असणारा कर्णधार एमएस धोनीही पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हताश झाला होता. तेव्हा विनीत कुलकर्णी हे पंच होते.  "जर पंचाचे निर्णय तुमच्या बाजूने नाही गेले तर दबाव आणखी वाढतो, माझ्या मते ड्युमिनीचा निर्णय आमच्या बाजूने न लागणे दुर्दैवी होते" अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

पुन्हा स्टीव्ह बकनर

स्टीव्ह बकनरची आणखी एक चूक भारताला महागात पडली होती. २००३ मध्ये गब्बामध्ये हे घडले होते. तेव्हा सचिन तेंडुलकरला त्यांनी lbw ठरवले होते. पण तो चेंडू खूप पॅडवर खूप उंच लागला होता हे स्पष्टपणे दिसत होते. सचिनला बाद दिल्यावर समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. आपण आधी म्हणालो तसे बकनर साहेब हे या यादीत असणारच आहेत. सचिनला आउट देण्यात त्यांचा खास हातखंडा होता.

अलीम दार

आणखी एका दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पंच अलीम दार यांनी दिलेला निर्णय सगळ्यात धक्कादायक होता. झहीर खानच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्स चकला होता. त्याच्या बॅटला बॉल लागून मागे स्लीपमध्ये असलेल्या सचिन तेंडुलकरने तो झेलला होता. पण अलीम दार यांनी त्याला नाबाद ठरवले. तेव्हा भारतीय खेळाडूंना ही धक्का बसला होता. हा व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल चक्क बॅटची कड लागूनही नॉट आउट दिले आहे. 

सचिन तेंडुलकर चे LBW- डेरेल हार्पर

सचिन तेंडुलकरला अनेकदा अंपयारच्या चुकीचे निर्णयामुळे आउट व्हावे लागले आहे. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी होती. तेव्हा सचिनला खांद्यावर चेंडू लागलेला दिसत असतानाही पायचीत म्हणून आउट दिले गेले. खरं तर हे यादीत टाकायचे का नाही हा प्रश्न आहे. हा निर्णय योग्य होता असे अनके तज्ञाचे मत आहे. 

विराट कोहलीचे न्यूझीलंड विरुद्धचा पायचीत

आत्ताच संपलेल्या न्यूझीलंड कसोटी मधला विराट कोहली विरुद्धचा निर्णय. पायचीतचा निर्णयावर विराट कोहलीला ही शून्यावर बाद व्हावे लागले होते. पॅडला स्पर्श करण्यापूर्वी चेंडू त्याच्या बॅटला लागलेला स्पष्टपणे दिसत होता. तरीही विराट कोहलीला पायचीत बाद म्हणून घोषित केले. कोहलीने त्वरीत डीआरएसची मागणी केली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे थर्ड अंपायरनेही निर्णय ग्राउंड अंपयारवर सोडला. त्यामुळे कोहलीला परत पॅव्हिलियनमध्ये जावे लागले होते.

 

खेळ ऐन रंगात असताना अशी अंपायरकडून चूक घडल्यास खेळाडूंबरोबरच चाहत्यांनाही वाईट वाटते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required