सानिया मिर्झा ते फेडरर, यंदाच्या विम्बल्डनमध्ये काय खास असणार आहे?

क्रिकेटमधील आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपली आहे, फुटबॉलमधील युरो चषक पण समाप्तीच्या दिशेने जात आहे. मात्र टेनिस चाहत्यांचा उत्साह मात्र जोरात आहे. कारण आता विम्बल्डनची सुरुवात होत आहे. अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच स्पर्धेच्या सुरुवातीला विम्बल्डनच्या महत्वपूर्ण बाबींबद्दल आज आपण वाचणार आहोत.

या महत्वाच्या स्पर्धेत अनेक चांगल्या खेळाडूंची अनुपस्थिती जाणवू शकते. पण भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सानिया मिर्झा या स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. विमेन्स डबलमधून ती आपली साथीदार बेथानी मॅटेकसँडस हिच्या बरोबर उतरणार आहे. सानियाने यावर्षीच कतार ओपन मधून टेनिस मैदानावर पाऊल ठेवले होते. त्याचप्रमाणे सानिया तोक्यो ऑलिम्पिकमध्ये पण सहभागी होणार असल्याने भारतासाठी शुभसंकेत आहेत.

यंदाच्या विम्बल्डनचे सालाबादप्रमाणे सर्वात मोठे आकर्षण असेल तो म्हणजे रॉजर फेडरर!! गेली कित्येक वर्षे टेनिसचा हा बादशहा मैदान गाजवत आहे. त्याच्या नावावर तब्बल २० ग्रॅड स्लॅम ऑनर्स आहेत. फेडररने विम्बल्डनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फ्रेंच ओपनमधून पण अंग काढून घेतले होते. त्याच्या नावावर आधीच ८ विम्बल्डनचे विजेतेपद असताना यंदा तो ९ व्या विजेतेपदाला गवसणी घालतो का याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष असेल.

फेडरर इतकाच लोकप्रिय असलेला राफेल नदाल यावेळी सहभागी होणार नसल्याने त्याच्या चाहत्यांची प्रचंड निराशा झाली आहे. त्याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानी असलेला डोमिनिक थीम पण यावेळी जखमेमुळे नसेल. तर विमेन्स सिंगल दिग्गज टेनिसपटू नाओमी ओसाकानेही यावेळी स्पर्धेतून अंग काढून घेतले आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे काही प्रमाणात रंगात भंग पडेल हे नक्की.

भारतातील टेनिस चाहत्यांना ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे हॉटस्टारवर देखील थेट प्रक्षेपण असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required