आयसीसीने या देशांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास घातली आहे बंदी; वाचा काय आहे कारण..

आंतररष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) गेल्या काही वर्षांपासून छोट्या देशांना देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पुढे आणण्याच्या प्रयत्नात आहे. जपान, नायजेरिया आणि थायलंड सारख्या देशांनी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तर पापुआ न्यू गिनी संघाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे छोटे आणि मोठे देश एकत्र खेळताना दिसून येत आहे. मात्र असेही काही देश आहेत, ज्यांवर विविध कारणांमुळे आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे (Banned countries by icc in international cricket)

ब्रुनेई :

आशिया खंडातील छोटा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रुनेईने १९९२ मध्ये आयसीसीचे सदस्यत्व मिळवले होते. तसेच १९९६ मध्ये या देशाने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र एकही विश्वचषक स्पर्धा न खेळता या देशाला केवळ एसीसी ट्रॉफी स्पर्धा खेळता आली. २००९ मध्ये झालेल्या एसीसी ट्रॉफी स्पर्धेत हा संघ सहाव्या स्थानी होता. त्यानंतर २०१० मध्ये या संघाने एसीसी स्पर्धेतील शेवटचा सामना थायलंड संघाविरुद्ध खेळला. तेव्हापासून आयसीसीने या संघावर निर्बंध लादले आहेत.

स्वित्झर्लंड :

स्वित्झर्लंड क्रिकेट बोर्डने १९८५ मध्ये आयसीसीचे सदस्यत्व मिळवले होते. हा संघ त्यावेळी चांगली कामगिरी करत होता. स्वित्झर्लंडने ४० षटकांची लीग स्पर्धा देखील सुरू केली होती. या स्पर्धेला त्यांनी स्वित्झर्लंड सुपर लीग असे नाव दिले होते. १९९० मध्ये या संघाला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. हा सामना ग्रीस संघाविरुद्ध पार पडला होता. मात्र काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे स्वित्झर्लंड संघावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र २०२२ मध्ये आयसीसीने हे निर्बंध मागे घेतले आहेत. आता स्वित्झर्लंड संघाने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे.

क्युबा :

क्युबा या देशाला आयसीसीने २००२-०३ मध्ये अधिकृत मान्यता दिली होती. त्यानंतर २००८ मध्ये सेंट मार्टिनविरुध्द झालेल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र क्युबा क्रिकेट कमिशनवर २०१३ साली आयसीसीने बंदी घातली होती. कारण क्युबा क्रिकेट कमिशन आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कामकाज करण्यास अपयशी ठरत होते. क्युबा संघाला ८ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले होते.

टोंगा:

आयसीसीने निर्बंध लादलेल्या संघांच्या यादीत टोंगा संघ चौथ्या स्थानी आहे. २००० साली टोंगा संघाने आयसीसीचे सदस्यत्व मिळवले होते. आयवेनी ताकीमोएका हा टोंगा क्रिकेट संघाचा कर्णधार होता. या संघाने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पात्रता फेरीत या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच आयसीसीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आयसीसीने टोंगा संघावर बंदी घातली.

पूर्व आफ्रिका :

पूर्व आफ्रिका संघ हा त्या ८ संघांपैकी एक होता ज्या संघाने १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते. पूर्व आफ्रिका संघाकडे १९६६ पासून १९८९ पर्यंत आयसीसीचे सदस्यत्व होते. त्यानंतर या संघाची जागा पूर्व आणि मध्य आफ्रिका संघाने घेतली. पूर्व आफ्रिकेने शेवटचा सामना १९८६ मध्ये केनियाविरुद्ध खेळला होता.

मोरोक्को :

मोरोक्को आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडे १९९९ पासून ते २०१९ पर्यंत आयसीसीचे सदस्यत्व होते. या संघाला आयसीसीचे सदस्यत्व गमवावे लागले कारण आयसीसीला या क्रिकेट बोर्डाच्या पारदर्शकतेवर शंका येत होती. त्यामुळे मोरोक्को संघ आता तोपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही, जोपर्यंत आयसीसी मान्यता देत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required