computer

जगातून दबाव आल्याने अखेर चीनला गायब केलेल्या खेळाडूला जगासमोर आणावेच लागले!! काय किस्सा आहे हा?

चीनमध्ये एकच राजकीय पक्ष आहे- चायनीज कम्युनिस्ट पार्टी!! एकहाती सत्ता, एकहाती अंकुश म्हणजे आणखी काही सांगण्याची गरजच नाही. तिथल्या सरकारबद्दल कुठलीही टीका किंवा आरोप तिथे सहन केला जात नाही. याबद्दल अनेक ठिकाणी तुम्ही वाचले असेल. गेल्या वर्षी चीनमधला सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा याने एका कार्यक्रमात सरकारवर केलेली किरकोळ टीका त्याला चांगलीच भोवली होती. कित्येक दिवस तो गायब होता. आता असाच किस्सा घडला आहे.

चायनीज टेनिस खेळाडू पेंग शुअई हिने तेथील प्रीमियर व्हॉइस प्रेसिडेंट असलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तर ती चक्क सार्वजनिक जीवनात दिसेनाशी झाली. ती जेव्हा पुन्हा सार्वजनिक ठिकाणी आणि ऑनलाइन मिटींग्समध्ये दिसायला लागली तेव्हा या गोष्टीला पुष्टी मिळाली.

आता ही पेंग काही साधीसुधी खेळाडू नाही. ३५ वर्षाची ही खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचणारी तसेच ती दोनवेळेची ग्रँड स्लॅम डबल चॅम्पियन आहे. तसेच ती यूएस ओपनच्या सेमिफायनलमध्ये पोहोचणारी खेळाडू आहे. तिच्याकडे २५ टुअर टायटल्स आहेत. नोव्हेंबर ६ ला तिने चीनचे माजी व्हॉइस प्रिमियर झंग गाओली यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले होते की जवळपास १० वर्ष गाओली यांनी तिच्यावर बळजबरी संबंध ठेवण्यास दबाव आणला. गाओली यांनी तिला बीजिंग येथे टेनिस खेळण्यासाठी बोलावून घेतले. तिथे त्यांनी तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली ज्याला तिने नकार दिला.

तिच्या पूर्ण पोस्टमध्ये याचसारखे म्हणणे मांडले होते. पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे नसल्याचे तिने नमूद केले होते. ही पोस्ट तिने वेइबो नावाच्या सोशल मीडिया ऍपवर मांडली होती. वेइबो हा तेथील अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तिने ही पोस्ट केल्यावर अवघ्या अर्ध्या तासात ती पोस्ट हटविण्यात आली.

तिच्या वेइबो अकाउंटवर ५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते. तिच्या अकाउंटची लिंक कुणालाच मिळत नव्हती. तसेच तीन आठवडे ती कुणालाही दिसली नव्हती. जेव्हा जागतिक टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सिमोन यांनी तिची माहिती विचारली असता ती बीजिंगमध्ये सुरक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. पण खुद्द पेंगसोबत मात्र कुणाचा संपर्क झाला नाही.

एवढेच नाहीतर सिमोन यांना पेंगकडून एक मेल गेला होता, ज्यात तिने केलेले आरोप नाकारले, तसेच आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. हा मेल तिनेच पाठवला का याबद्दल पण शंका सिमोन यांनी बोलून दाखवली. चीनमध्ये काहीही होत असले तर ते जगात कमी माहीत होते, पण पेंग मात्र जागतिक सेलेब्रिटी असल्याने हा मुद्दा जगभर चर्चिला जाऊ लागला.

मानवी अधिकार कार्यालयाने देखील या मुद्याला गंभीरपणे घेतले होते. सोशल मीडियावर यावर भरभरून बोलले जाऊ लागले. सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका, नोव्हाक जोकोविच यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंनी #whereispengshuie या हॅशटॅगखाली पोस्ट्स केल्या. जगभर या मुद्याला मोठे महत्व प्राप्त होत होते.

मात्र नोव्हेंबर २० आणि २१ ला चीनच्या सरकारी मीडियाने पेंगचा एक व्हिडिओ जाहीर केला. यात बीजिंगमधील एका रेस्टॉरंटमध्ये ती बसली होती. तिच्यासोबत चायनीज ओपन टुर्नामेंटचे सहसंचालक झंग जुनहूई आणि दोन महिला बसल्या होत्या. पण पेंग काहीच बोलताना दिसत नाही. अजून एका व्हिडिओत ती आपल्या ज्युनियर्ससोबत टेनिस कोर्टवर दिसते. याही व्हिडीओत ती अगदी मोजके बोलताना दिसते.

रविवारी इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅक यांचा पेंगसोबत व्हिडिओ कॉल झाला. यात चीनचे पण काही पदाधिकारी होते. अर्धा तास चाललेला हा कॉल पेंगचे पहिले सार्वजनिक दर्शन होते. यावेळी पेंगने आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला सध्या एकांत हवा असल्याचे ही सांगितले.

या विषयाला जागतिक महत्व प्राप्त झाल्यामुळे चीनला पेंग सुरक्षित असल्याचे जाहीर करावे लागले. कारण ऑलिम्पिक समितीचे सिमोन यांनी आधीच सांगितले होते की चीनने हा विषय गंभीरपणे घेतला नाही तर चीनला मोठा बिजनेस गमवावा लागू शकतो. ऑलिम्पिक समिती आणि चीनमध्ये तब्बल १ बिलियन डॉलरचा व्यापार आहे. यात आशिया पॅसिफिक मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. तसेच ऑलिम्पिक फायनल्स चीनमध्ये घेण्याचा १० वर्षांचा करार अशा गोष्टींचा यात समावेश आहे.

चीनमध्ये त्यांच्या संस्थांविरुद्ध कुणी बोलले तर त्यांच्या सोबत अशीच वागणूक होते. पण यावेळी ऑलिम्पिक समिती कुठल्याही थराला जायला तयार होती. म्हणून पेंगला समोर आणणे त्यांना भाग पडले.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required