computer

कोपा अमेरिका २०२१: २८ वर्षांनी आर्जेन्टिनाला मिळालेलं जेतेपद, मेस्सीची सर्वोत्कृष्ट कामगिरी, नेमारचा पराभव....

फुटबॉल विश्वात मानाची समजली जाणारी कोपा अमेरिका ही साऊथ अमेरिकेतील दहा राष्ट्रीय संघांमध्ये खेळली जाणारी स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोनाच्या सावटाखाली भरवल्या गेलेल्या या स्पर्धेत भलेही चाहत्यांनी खच्चून भरलेले स्टेडियम्स पाहायला मिळाले नाहीत पण जगभर पसरलेल्या या ‘फुटबॉल फिवर’ची जादू तसूभरही कमी झालेली नव्हती. कित्येकांचं झगमगतं करिअर पणाला लावणारी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली, ती बऱ्याच कारणांमुळे! पण या स्पर्धेचा खरा केंद्रबिंदू होता तो इंटरनॅशनल स्पर्धांमधून निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोचलेला अर्जेंटिनाचा कॅप्टन - ३४ वर्षीय लिओनेल मेस्सी! वेगवेगळ्या लीग्जमध्ये एकामागोमाग एक विक्रम रचत जाणाऱ्या या सध्याच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला एकच चिंता कायम सतावत होती- एक आंतरराष्ट्रीय जेतेपद!

कोरोनामुळे लांबणीवर पडत चाललेली ही स्पर्धा सरतेशेवटी सुरु झाली ती ब्राझीलच्या या स्पर्धेतील पहिल्या विजयाने आणि तिची सांगता झाली ब्राझीलच्या या स्पर्धेतील पहिल्या पराभवाने! ब्राझीलला पराभूत करून जेतेपद पटकावणाऱ्या अर्जेंटिनाच्या इतिहासात ‘१० जुलै २०२१’ ही तारीख सुवर्णाक्षराने लिहली गेली. साखळी फेरीत पहिल्याच मॅचमध्ये चिलीबरोबरचा सामना अनिर्णीत राहिल्याने अर्जेंटिनाने आक्रमक पवित्रा स्विकारत उरुग्वे, पॅराग्वे आणि बोलिवियावर मात करत बाद फेरी गाठली. इकडे ब्राझीलही साखळीतील इक्वेडोरसोबतचा शेवटचा सामना ड्रॉ करत बाद फेरीत दाखल झाला. अर्जेंटिनाने आपला धडाका कायम ठेवत इक्वेडोर आणि कोलंबियाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. रिओ दी जानेरोमधल्या ऐतिहासिक मराकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात अर्जेंटिनासमोर आव्हान होते ते पेरू आणि चिलीवर मात करत अंतिम सामन्यात आलेल्या आणि सलग तिसऱ्यांदा अर्जेंटिनाला अंतिम सामन्यात हरवण्याचे स्वप्न बघत जेतेपदासाठी आसुसलेल्या बलाढ्य ब्राझीलचे! कागदोपत्री हा सामना अर्जेंटिना वि. ब्राझील असा जरी असला, तरी खरी चुरस होती, ती नेमार ज्यु. (ब्राझील) आणि मेस्सी (अर्जेंटिना) या दोन अव्वल फुटबॉलपटूंमध्ये!

स्पर्धेची ट्रॉफी आपल्या देशाला मिळावी यासाठी हे दोघेही आपला जीव ओतून हा सामना खेळणार होते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी, १९२१मध्ये अर्जेंटिनाने या स्पर्धेतलं आपलं पहिलं जेतेपद पटकावलं होतं आणि तेही ब्राझीलविरुद्ध! पुढच्या ७० वर्षांत अर्जेंटिनाने तब्बल चौदावेळा या ट्रॉफीवर आपलं नाव करून आपणच इथले बॉस असल्याचं सिद्धही केलं होतं. १९९३ला मेक्सिकोला हरवून मिळवलेल्या जेतेपदानंतर मात्र अर्जेंटिनाचा सूर हरवला आणि गेली २८ वर्षं त्यांना चार वेळा फायनल गाठूनही चिली आणि ब्राझीलच्या उत्कृष्ट खेळामुळे ट्रॉफीपासून वंचितच रहावं लागलं. २०१६ला चिलीसमोर झालेला मानहानीजनक पराभव अर्जेंटिनाच्या, विशेषतः मेस्सीच्या जिव्हारी लागला होता. पण यावर्षी आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करत अर्जेंटिनाची शानदार फॉर्ममध्ये असलेली टीम गतविजेत्या ब्राझीलला आव्हान देण्यासाठी आणि आपल्या लाडक्या कॅप्टनला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी सज्ज झाली होती.

आणि झालंही तसंच! पंधराव्या मिनिटाला नेमारची फ्री किक निष्प्रभ ठरल्यानंतर संयतपणे खेळणाऱ्या ब्राझीलवर बघता बघता आक्रमक अर्जेंटिनाने आपला हल्ला चढवला आणि २१व्या मिनिटालाच पहिला गोल नोंदवून आघाडी घेतली. मिडफिल्डर रॉड्रीगोने दिलेल्या पासचं सोनं करत एंजल डी मारियाने गोल केला आणि अर्जेंटिनाचं खातं उघडलं. त्यानंतर बत्तिसाव्या मिनिटाला मेस्सीला गोल करण्याची संधी चालून आलीच होती, पण बॉल नेटला घासून गेल्याने ही संधी वाया गेली. त्यानंतर अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलीआनो मार्टिनेझने एका जबाबदार आणि उत्कृष्ट गोलरक्षकाच्या भूमिकेत शिरून वेळोवेळी ‘नेमार अँड कंपनी’चे मनसुबे धुळीला मिळवत ब्राझीलचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर ब्राझीलला एकही गोल करू न देता अर्जेंटिनाने १-० या फरकाने हा सामना जिंकला आणि तब्बल २८ वर्षांनी जेतेपदाला गवसणी घातली! 

२०१८च्या फिफा वर्ल्डकपनंतर सुमारे १३ लढतींमध्ये एकही गोल करू न शकलेल्या डी मारियाने या सामन्यातला एकमेव आणि निर्णायक गोल करून फक्त अर्जेंटिनाच्या जेतेपदाचाच नव्हे तर स्वतःच्याही सुमार कामगिरीचा दुष्काळ संपवला. एखाद्या अभेद्य ढालीसारखा नेमारचा धडाका रोखून अर्जेंटिनाला विजय मिळवून देणारा गोलकीपर मार्टिनेझ ‘गोल्डन ग्लोव्ह’ मिळवणारा पहिला अर्जेंटाईन खेळाडू ठरला. अर्जेंटिनाने मेस्सीच्या नेतृत्वाखाली ब्राझीलला धूळ चारत मागच्या पराभवांचा वचपा काढण्यात यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर, आपलं पंधरावं ‘कोपा अमेरिका’ जेतेपद मिरवणाऱ्या अर्जेंटिनाने ब्राझीलच्या सर्वाधिक जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या स्पर्धेच्या आणि पर्यायाने आपल्या इंटरनॅशनल करिअरच्या शेवटच्या सामन्यात गोल करू न शकल्याची खंत मेस्सीला सतावत राहीलच, पण त्याहूनही जास्त आनंद त्याला या गोष्टीचा आहे की तो आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर आपल्या देशाला इथपर्यंत घेऊन येऊ शकला. यावर्षीच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल आपल्या नावावर असलेल्या मेस्सीला या स्पर्धेचा ‘बेस्ट प्लेअर’ म्हणून गौरवण्यात आले.

अर्जेंटिनाच्या या यशानंतर ‘जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू’ कोण या वादावर तूर्तास पडदा पडलाय आणि त्या पडद्यावर सध्या एकच नाव दिमाखात झळकताना दिसत आहे..
लिओनेल मेस्सी, जर्सी नं १०!

सबस्क्राईब करा

* indicates required