कसोटी सामन्यातील १० वा चेंडू पडताच संपला सामना! कारण वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही..

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट आहे. हा सामना ५ दिवस चालतो. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा देखील सामना झाला आहे, जो टी -२० पेक्षाही छोटा ठरला. टी -२० क्रिकेटचे सामने २० षटकांचे असतात. म्हणजे १२० चेंडू. मात्र हा सामना अवघ्या १० चेंडूंमध्ये समाप्त झाला होता.

आजच्याच दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी हा सामना सुरू झाला होता. सामन्यातील केवळ दहावा चेंडू पडताच सामना संपला होता. हा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना ठरला. मात्र या सामन्यात नेमकं काय घडलं? बोभाटाच्या या लेखात जाणून घेऊया.

विवियन रिचर्ड्स मैदानावर पार पडला होता सामना...

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना अँटिगातील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर पार पडणार होता. सामन्याची संपूर्ण तयारी झाली होती. वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र १० चेंडूंमध्ये हा सामना समाप्त झाला. सामना सुरू होऊन दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकला, इतक्यात पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यानंतर काही मिनिटांनी पाऊस थांबल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. मात्र यावेळी देखील २ चेंडूंचा खेळ झाला आणि पाऊस आला. सामना पुन्हा थांबवला गेला. याच कारण होतं स्टेडियमची आऊटफिल्ड.

सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर जेव्हा वेस्ट इंडिजचे गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आले, त्यावेळी फिडल एडवर्ड्स ३ वेळा सटकून पडला. हे षटक टाकण्यापूर्वी जेरोम टेलर देखील गोलंदाजी करताना सटकला होता. त्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार, अंपायर यांनी खूप वेळ चर्चा केली. शेवटी मॅच रेफ्री एलन हर्स्टला निर्णय घेण्यास सांगितले. बऱ्याच गोष्टी पाहिल्यानंतर अंपायरने ठरवले की पहिल्या दिवसाचा खेळ होणं शक्य नाही. त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला होता.

हा सामना झाल्यानंतर, आयसीसीने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डला चांगलेच फटकारले होते. पुढील १२ महिन्यांसाठी या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यास बंदी देखील घातली होती. त्यावेळी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने आपली चूक मान्य करत मैदान पुन्हा तयार करण्यासाठी सहमती दर्शवली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required