computer

भारतातून निवृत्त होऊन खेळण्यासाठी अमेरीकेत गेलेले क्रिकेट खेळाडू !

लहानपणी प्रत्येकाला एकदातरी असे वाटते की आपण क्रिकेटर व्हावे. कारण भारतात क्रिकेटला दिले जाणारे महत्व हे इतर कुठल्याही खेळाच्या मानाने प्रचंड आहे. ज्यामुळे क्रिकेटर होण्यासाठी खूप स्पर्धा असते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करूनही एखादा यशस्वी क्रिकेटर होईल की नाही हे सांगता येत नाही.

भारतीय संघात स्थान मिळूनही ते स्थान टिकवून ठेवणे सोपे नसते. आयपीएल हा एक चांगला मार्ग खेळाडूंपुढे निर्माण झाला आहे. पण आयपीएलमध्येही चांगली बोली मिळेलच असे नसते. मग खेळाडू परदेशी स्पर्धांमध्ये भाग घेतात. पण त्यासाठी त्यांना भारतातून निवृत्त व्हावे लागते. गेल्या काही काळात भारताचे काही खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्त झाले आहेत. याच खेळाडूंची माहिती आपण घेणार आहोत.
 

१) उन्मुक्त चंद

२०१२ साली अंडर १९ वर्ल्डकप जिंकून हिरो झालेला उन्मुक्त चंद नंतर काही विशेष प्रभाव पाडू शकला नाही. कधीकाळी तो पुढचा विराट म्हणून ओळखला जात असे. पण सुरुवातीची चमक सोडली तर तो सपशेल अपयशी ठरला. भारतीय संघ तर सोडाच, तो आयपीएलमध्ये पण विशेष कामगिरी करू न शकल्याने त्याचे क्रिकेट करियर तसे संपल्यातच जमा होते. अशावेळी त्याने भारतात काय निभाव लागत नाही हे बघून भारतात निवृत्त होऊन अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगसोबत तीन वर्षांचा करार केला आहे.
 

२) स्मित पटेल

२०१२ साली भारतीय अंडर १९ संघाने वर्ल्डकप जिंकला. त्या संघातील स्मित पटेल एक महत्वाचा खेळाडू होता. पण त्याला त्यानंतर मोठा संघर्ष करूनही जम बसवता आला नाही. गुजरात क्रिकेटमधील पार्थिव पटेल संघात असल्याने गुजरातचा हा खेळाडू पण संघात येईल असे बोलले जात होते. पण तो काय टिकू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५५ सामन्यांमध्ये ३२७८ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ शतकंही ठोकली होती. अवघे २८ वय असलेला स्मित मात्र आता भारतात निवृत्ती घेऊन अमेरिकन लीगमध्ये खेळणार आहे

३) मनन शर्मा

दिल्लीचा हा ऑल राउंडर खेळाडू कधीकाळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विराट कोहली, रिषभ पंत, इशांत शर्मा यांच्यासोबत खेळला आहे. तसेच रणजी ट्रॉफीत तो दिल्लीसाठी महत्वाचा स्पिनर होता. त्याचप्रमाणे विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही त्याने चांगली कामगिरी केली. त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून पण विकत घेण्यात आले होते. पण त्याचा हा फॉर्म टिकवून ठेवण्यात तो कमी पडला आणि नंतर त्याला संधी मिळणे दुरापास्त झाले. शेवटी त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत कॅलीफोर्नियाला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
 

४) सिद्धार्थ त्रिवेदी

२००२ साली रणजीत धमाकेदार कामगिरी करून या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याची बॉलिंग बघून त्याला पुढच्याच वर्षी अंडर १९ वर्ल्डकपसाठी संघात घेतले गेले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची कामगिरी डोळ्यात भरावी अशी होती. गुजरातकडून खेळणाऱ्या सिद्धार्थने अवघ्या ८२ सामन्यांमध्ये २६८ विकेट घेतले होते. पुढे त्याने राजस्थान रॉयल्सकडून ५ वर्ष बॉलिंग केली. पण भारतीय संघाचे त्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही. आज ३८ वर्षांच्या वयात त्याने अमेरिकेत मायनर लीग क्रिकेटमधील सेंट लुईस अमेरिकन्स संघासोबत करार केला आहे.
 

५) मिलिंद कुमार

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्ली, त्रिपुरा आणि सिक्कीम असा प्रवास केलेला हा खेळाडू सुरुवातीला चांगली कामगिरी करत होता. रणजी ट्रॉफीत त्याने फक्त ८ सामन्यांमध्ये १३१ च्या सरासरीने १३३१ धावा करत श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला होता. आयपीएलमध्ये २०१३ साली दिल्ली डेयरडेव्हील्स आणि २०१९ साली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून तो खेळला होता. आता तो भारतातून निवृत्त होऊन अमेरिकेत मायनर लीगमध्ये सहभागी होत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required