वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण,'द चाईल्ड' म्हणून हिणवलं; पुढे गोलंदाजीचे सर्व विक्रम मोडणारा गोलंदाज...

न्यूझीलंड संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक हिरे दिले आहेत. ज्यामध्ये रिचर्ड हेडली, मार्टिन क्रो, ग्ले टर्नर, स्टीफन फ्लेमिंग सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या दिग्गज खेळाडूंनी न्यूझीलंड क्रिकेटचा पाया रचला. त्यानंतर जे खेळाडू आले त्यांनी न्यूझीलंड क्रिकेटला पुढे नेण्याचे काम केले. ज्यामध्ये डॅनियल विट्टोरी (Daniel vittori) सारख्या खेळाडूचा उल्लेख केला गेलाच पाहिजे.
उंच काठी असलेला, डोळ्यावर चष्मा, मात्र चेंडू असा फिरवायचा की फलंदाज देखील गोंधळून जायचा. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, आम्ही डॅनियल विट्टोरी बद्दल का बोलतोय. कारण असं की, आज २७ जानेवारी रोजी डॅनियल विट्टोरी आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय.
न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केलेला हा खेळाडू आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ ३ कारणांमुळे चांगलाच चर्चेत राहिला. पहिलं कारण म्हणजे त्याची फलंदाजी. दुसरं कारण म्हणजे त्याची गोलंदाजी आणि तिसरं कारण म्हणजे त्याचा चष्मा. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत असताना चेंडूवर नजर ठेवणं खूप गरजेचं असतं. मात्र करीयरच्या सुरुवातीपासून ते रिटायरमेंटपर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी करताना चष्मा घालून खेळणं खूप मोठी गोष्ट आहे.
डॅनियल विट्टोरीने जेव्हा न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले, त्यावेळी तो केवळ १८ वर्षांचा होता. ज्यावेळी तो संघात आला, तेव्हा त्याचा चेहरा लहान मुलासारखा होता. तसेच नजरेचा चष्मा पाहून सर्व त्याला 'द चाईल्ड' म्हणजे लहान मुलगा असे म्हणायचे.
डॅनियल विट्टोरीने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्याला चष्मा लागला होता. त्यानंतर त्याला सवय झाली. डॅनियल विट्टोरीची कारकीर्द सुरू असताना, हॅरी पॉटर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेट चाहते हॅरी पॉटर देखील म्हणायचे.
मात्र त्याने आपली खरी निर्माण केली ती आपल्या फिरकी गोलंदाजीने. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ २ सामने खेळून वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या विट्टोरीने अनेक दिग्गजांना नाचवलं. हेच कारण आहे की, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. असा पराक्रम करणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला होता.
विट्टोरीने आपल्या कारकिर्दीतील ११३ सामन्यांमध्ये ३६२ गडी बाद केले होते. तो सर्वाधिक गडी बाद करणारा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज होता. पुढे जाऊन श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज रंगांना हेरथने हा विक्रम मोडून काढला. त्याने ४३३ गडी बाद केले होते. विट्टोरीने गोलंदाजीसह फलंदाजी करताना, ६ शतकांच्या साहाय्याने ४५३१ धावा देखील केल्या होत्या. तर २९५ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३०५ गडी बाद करण्यासह २२५३ धावा केल्या होत्या.