जेव्हा ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवीने केला होता हल्लबोल! वाचा या ऐतिहासिक षटकापूर्वी नेमकं काय घडलं?

आजचा दिवस (१९ सप्टेंबर) हा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. आजच्याच दिवशी भारताचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh)आयसीसी टी -२० विश्वचषक २००७ (Icc T20 World Cup) स्पर्धेत सलग ६ षटकार मारत ऐतिहासिक खेळी केली होती. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, स्टुअर्ट ब्रॉड (Stuart broad) गोलंदाजीला येण्यापूर्वी अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew flintoff)  आणि युवराज सिंग यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. या ऐतिहासिक खेळीला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

फ्लिंटॉफच्या चुकीची शिक्षा मिळाली स्टुअर्ट ब्रॉडला..

या सामन्यातील १८ वे षटक टाकण्यासाठी अँड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजीला आला होता. या षटकात आक्रमक फलंदाजी करत असलेल्या युवराज सिंगने २ चौकार मारले होते. हे पाहून अँड्र्यू फ्लिंटॉफ संतापला होता. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. शेवटी पंचांनी आणि खेळाडूंनी मध्यस्ती केल्यानंतर हा वाद थांबला. मात्र या घटनेनंतर युवराज सिंग चांगलाच संतापला होता.

अँड्र्यू फ्लिंटॉफच्या चुकीची शिक्षा पुढच्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडला भोगावी लागली. स्टुअर्ट ब्रॉडने या षटकात ६ वेगवेगळ्या लाईन आणि लेंथवर चेंडू टाकले, मात्र परिणाम एकाच होता. तो म्हणजे षटकार. मैदानाचा असा एकही कोपरा नसेल जिथे युवराज सिंगने शॉट खेळला नसेल. यासह युवराज सिंग भारतीय संघासाठी सलग ६ चेंडूंमध्ये सलग ६ षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा फलंदाजी ठरला होता. यापूर्वी हर्षल गिब्सने हा पराक्रम केला होता.

भारतीय संघाने मिळवला विजय...

युवराज सिंगने या ६ षटकारांचा मदतीने केवळ १६ चेंडूंमध्ये ५८ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने अवघ्या १२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. हा विक्रम आजवर कोणालाही मोडता आला नाहीये. भारतीय संघाने या सामन्यात ४ गडी बाद २१८ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने १८ धावांनी आपल्या नावावर केला होता.

हर्षल गिब्स आणि युवराज सिंग या दोघांनी एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार कायरन पोलार्डने देखील सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम त्याने श्रीलंकेविरुध्द झालेल्या सामन्यात केला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required