आजच्याच दिवशी ५०० धावा बनवून सुद्धा बांगलादेशने गमावला होता सामना; झाली होती लाजिरवाण्या विक्रमाची नोंद...

क्रिकेट इतिहासात १६ जानेवारी हा दिवस बांगलादेश संघ कधीच विसरू शकणार नाही. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की,या दिवशी नेमकं काय घडलं होतं? तर याच दिवशी बांगलादेश संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पराभव होणं विजय मिळवणं हा तर खेळातील एक भाग आहे. मात्र बांगलादेश संघासाठी हा पराभव न पचवणारा का ठरला? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. शाकीब अल हसनने २१७ तर मुश्फिकुर रहिमने केलेल्या १५९ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाने ५९५ धावा केल्या होत्या. हा डाव बांगलादेश संघाने ८ बाद ५९५ धावांवर घोषित केला.

न्यूझीलंड संघाने दिले जोरदार प्रत्युत्तर..

बांगलादेश संघाने धावांचा डोंगर उभारल्यानंतर न्यूझीलंड संघाने देखील चोख प्रत्युत्तर दिले. न्यूझीलंड संघाने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत, ५३९ धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये टॉम लेथमने १७७ तर कर्णधार केन विलियमसनने ५३, रॉस टेलरने ४०,हेन्री निकोलसने ५३ आणि वॉल्टिंगने ४९ धावांचे योगदान दिले होते.

दुसऱ्या डावात होत्याचं नव्हतं झालं...

सामन्यातील पहिल्या दोन्ही डावात जर ५०० पेक्षा अधिक धावा कुटल्या गेल्या असतील, तर नक्कीच सामना बरोबरीत सुटण्याच्या वाटेवर आहे असे समजले जाते. मात्र बांगलादेश संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा काहीतरी भलतच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या डावात ५०० धावांचा डोंगर उभारणाऱ्या बांगलादेश संघाचा डाव दुसऱ्या डावात अवघ्या १६० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी २१७ धावांचे सोपे आव्हान मिळाले होते. न्यूझीलंड संघाने ३ फलंदाज गमावत हे आव्हान गाठले. केन विलियमसनने १०४ तर रॉस टेलरने ६० धावांचे योगदान दिले. 

या पराभवासह बांगलादेश संघाच्या नावे नको त्या विक्रमाची नोंद झाली होती. पहिल्या डावात ५०० पेक्षा अधिक धावा केल्यानंतर सामना गमावणारा बांगलादेश हा पहिलाच संघ ठरला.

सबस्क्राईब करा

* indicates required