इंग्रजांना सलग २१ मेडन टाकणारा भारतीय 'कंजूस' गोलंदाज माहित आहे?

क्रिकेटमध्ये गोलंदाज जेव्हा मैदानावर येतो त्यावेळी तो फलंदाजाला बाद कसं करावं आणि कमीत कमी धावा खर्च कराव्या याच्या विचारात असतो. मात्र स्कोररबोर्ड हलते ठेवण्यासाठी फलंदाज गोलंदाजांवर आक्रमण करतात. यादरम्यान काही असे गोलंदाज असतात जे, आपल्या योग्य लाईन लेंथचा वापर करून कमीत कमी धावा खर्च करतात. अशा गोलंदाजांना क्रिकेटच्या भाषेत इकोनॉमीकल किंवा 'कंजूस' गोलंदाज असे म्हणतात. भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा कंजूस गोलंदाजाचा उल्लेख केला जातो, तेव्हा केवळ एकच नाव समोर येतं ते म्हणजे बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni). 

बापू नाडकर्णी यांच्या नावे कसोटी क्रिकेटमधील एका खास विक्रमाची नोंद आहे. सलग १३१ चेंडू टाकून त्यांनी इंग्लिश फलंदाजांना एकही धाव करू दिली नव्हती. त्यांनी हा पराक्रम आजच्याच दिवशी म्हणजे १२ जानेवारी १९६४ रोजी केला होता.

एक धाव घेण्यासाठी तरसले इंग्लिश फलंदाज...

डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या बापू नाडकर्णी यांनी अक्षरशः एक धाव घेण्यासाठी इंग्लिश फलंदाजांना रडवून सोडले होते. मद्रासच्या (चेन्नई) कॉर्पोरेशन स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात त्यांनी १३१ चेंडू टाकले, मात्र यादरम्यान त्यांनी एकही धाव खर्च केली नव्हती. त्यांनी एकूण ३२ षटके गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्यांनी २७ षटके निर्धाव फेकली होती. मुख्य बाब अशी की, त्यांनी २७ पैकी सलग २१ षटके निर्धाव फेकली होती.

मद्रास कसोटी सामन्यातील बापू नाडकर्णी यांच्या स्पेल...

पहिला स्पेल: ३-३-०-०

दुसरा स्पेल: ७-५-२-०

तिसरा स्पेल: १९-१८-१-०

चौथा स्पेल:३-१-२-०

नेट्समध्ये करायचे खास पद्धतीने सराव..

बापू नाडकर्णी नेट्समध्ये जोरदार मेहनत घ्यायचे. ते गोलंदाजी करताना स्टंपवर नाणं ठेवून गोलंदाजी करायचे. त्यांना आपल्या गोलंदाजीवर इतके नियंत्रण होते की,त्यांना हवं त्याच ठिकाणी ते चेंडू टाकायचे आणि फिरवायचे देखील. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी १.६७ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या. तसेच त्यांच्या कसोटी कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर त्यांनी ४१ कसोटी सामन्यांमध्ये ९१६५ चेंडूंमध्ये अवघ्या २५५९ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्यांनी ८८ गडी देखील बाद केले होते. 

काय वाटतं? वर्तमान भारतीय संघातील असा कोणता गोलंदाज आहे, जो बापू नाडकर्णी यांचा हा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required