जेव्हा कुक्कुट पालन करणारा इंग्लंड संघाला पुरून उरला! वनडेमध्ये केली होती ऐतिहासिक कामगिरी..

कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणारा खेळाडू जेव्हा मैदानावर उतरायचा, त्यावेळी विरोधी संघातील खेळाडू थरथर कापायचे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो आपल्या कामगिरीने सर्वांचेच मन जिंकायचा. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय, त्या खेळाडूने आजच्याच दिवशी म्हणजे ३ जानेवारी १९९७ रोजी ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्नं असतं की, आपल्या कारकीर्दीत एकदा तरी हॅट्ट्रिक पूर्ण करावी. मात्र काही मोजकेच गोलंदाज आहेत जे हे स्वप्नं सत्यात उतरवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र आज आम्ही अशा एका गोलंदाजाबद्दल माहिती देणार आहोत ज्या गोलंदाजाने हॅट्ट्रिक करत नवा इतिहास रचला होता.  

आम्ही बोलतोय झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू एडो ब्रँडीस बद्दल. कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द १२ वर्षांपर्यंत लांबली. मात्र यादरम्यान तो अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला. त्याला आपल्या कारकीर्दीत एकूण १० कसोटी आणि ५९ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. 

हॅट्ट्रिक सह बाद केले फलंदाज...

तर झाले असे की, झिम्बाब्वे आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू होती. हरारेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात, झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद २४९ धावा केल्या होत्या. मात्र ज्यावेळी इंग्लंड संघ फलंदाजीला आला त्यावेळी एडो ब्रँडीस संपूर्ण इंग्लंड संघासाठी कर्दनकाळ ठरला.

एडो ब्रँडीसने एकट्यानेच अर्ध्या इंग्लंड संघाला माघारी धाडले. त्याने ३ चेंडूंमध्ये ३ फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने १० षटकांमध्ये २८ धावा करत ५ गडी बाद केले होते. ही त्याची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक पूर्ण करणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला होता. 

वनडेमध्ये हॅट्ट्रिक पूर्ण करणारा वरिष्ठ गोलंदाज...

ब्रॅंडिसने निक नाईट, जॉन क्राउली आणि नासेर हुसेन यांना बाद करून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली, जी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ११ वी हॅट्ट्रिक होती. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक पूर्ण करणारा सर्वात वरिष्ठ गोलंदाज ठरला होता. त्याने वयाच्या ३४ व्या वर्षी हा पराक्रम केला होता. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने इंग्लंड संघावर १३१ धावांनी जोरदार विजय मिळवला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required