computer

जेव्हा सचिनने सेहवागला दिली होती बॅटने मारण्याची धमकी

क्रिकेट म्हटले म्हणजे जेवढे जास्त चौकार षटकार तेवढे जास्त एखाद्या खेळाडूचे कौतुक होत असते. कमी चेंडूत जास्त धावा हव्या असतील तर चौकार षटकार जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करत असतो. या चौकार षटकारांसाठी कुणालाही कौतुकच मिळत असते. पण एकदा याच चौकार षटकार मारण्यासाठी भारताचा कधीकाळचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला चक्क क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडुन बोलणे ऐकावे लागले होते. शांत स्वभावाचा समजल्या जाणाऱ्या सचिनने थेट सेहवागला बॅटने मारण्याची धमकी दिली होती.

आपल्या मोठमोठ्या खेळीसाठी ओळखला जाणारा सेहवाग स्वभावाने देखील दिलखुलास आहे. एका बांगला शोमध्ये त्याने वरील किस्सा सांगितला होता. या शोमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे अँकरिंगची सूत्रे होती. सेहवागच्या सोबत व्हिव्हिएस लक्ष्मण, झहीर खान, हरभजन सिंग, रवीचंद्रन अश्विन हे भारताचे महत्वाचे आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

यावेळी गांगुलीने सेहवागने पाकिस्तानच्या मुलतान येथे केलेल्या त्रिशतकी खेळीची आठवण काढली. गांगुली म्हणाला, 'तू जेव्हा मुलतान येथे 300 धावा केल्या तेव्हा तू 95 धावा झाल्यावर षटकार मारून शतक पूर्ण केले, तसेच तुझे जेव्हा 295 धावा झाल्या तेव्हा देखील तू षटकार मारूनच त्रिशतक पूर्ण केले. त्यावेळी सकलेन मुश्ताक सारखा धोकादायक गोलंदाज चेंडू टाकत होता. मैदानावर जागे जागेवर खेळाडू उभे होते. तरी देखील तू एवढे मोठे धाडस का केले? तू एकेक किंवा दोन दोन धावा करून तुझे त्रिशतक पूर्ण करू शकला असतास.' त्यावर सेहवागने उत्तर दिले, 'जर एक चेंडुवर एक धाव घेतली तर सहा चेंडू खेळावे लागतील, म्हणजेच आऊट होण्याची शक्यता ही सहा वेळा असते. पण जर एकाच चेंडुवर षटकार ठोकला तर आऊट होण्याची शक्यता फक्त एक वेळ असते. त्याचप्रमाणे जेव्हा माणूस 295 धावांपर्यंत खेळून गेलेला असतो, तेव्हा त्याला मैदान, सर्व गोलंदाज सर्वांचा चांगला अंदाज आलेला असतो, यामुळे फलंदाज म्हणून तुम्ही आत्मविश्वासाने खेळत असतात.' पण यावेळी सचिनला मात्र सेहवागबद्दल काळजी वाटायला लागली होती, कारण अवघ्या 120 धावांवर पोहोचत असताना सेहवागने सहा षटकार ठोकले होते. यामुळे सचिनला सेहवाग हा षटकार मारण्याच्या नादात आऊट होईल याची भीती वाटत होती.

सचिनने सेहवागला षटकार न मारण्याचे सांगितले होते, तसेच आपले ऐकले नाहीतर बॅटने तुला मारेल असा प्रेमळ संताप देखील दाखवला होता. यामागील कारण देखील सेहवागने सांगितले होते, ते म्हणजे, जेव्हा भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेव्हा मेलबर्न येथे खेळत असताना 195 धावांवर सेहवागने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण या नादात तो कॅच देऊन आऊट झाला होता. त्यावेळी त्याला गांगुलीने समजावले होते की, सायमन कॅटीस फुलटॉस टाकेल त्याला खालून मारून आपले द्विशतक पूर्ण कर, पण सेहवागला षटकार मारण्याची धुंदी चढल्याने तो आऊट झाला. ही गोष्ट सचिनला माहीत असल्यानेच पुन्हा असे काही होऊ नये म्हणून सचिनने त्याला षटकार न मारण्यास सांगितले होते. यावेळी एक किस्सा सांगताना जहीर खानने सांगितले की, सेहवाग जेव्हा कधी षटकार मारण्याच्या नादात आऊट होऊन पॅवेलीयनमध्ये परत यायचा त्यावेळी तो आपले शतक हुकले म्हणून नाहीतर आपला षटकार हुकला म्हणून दुःख करत असे.

वीरेंद्र सेहवागने मुलतान येथे केलेल्या त्या त्रिशतकी खेळीमुळे त्याची ओळख ही मुलतान के सुलतान अशी निर्माण झाली होती. सचिनच्या नावे इतर अनेक विक्रम असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये सचिनकडून त्रिशतक एकदाही शक्य झाले नाही पण सचिनचा शिष्य म्हणवून घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागने मात्र दोन वेळा त्रिशतक केले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required