तो सामना ज्यामध्ये सुनील गावस्करांनी ८ व्या क्रमांकावर केली फलंदाजी अन् नवीन चेंडूने केली गोलंदाजी..

भारतीय संघातील माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा उल्लेख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दिग्गज फलंदाजांच्या यादीत केला जातो. ज्यावेळी वेस्ट इंडिजचे उंच काठीचे गोलंदाज भेदक बाऊंसर चेंडू टाकायचे त्यावेळी भारतीय संघातील लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर त्यांचा हेल्मेट न घालता सामना करायचे.सुनील गावस्कर हे सलामीवीर फलंदाज होते. त्यामुळे त्यांना नवीन चेंडूचा समान करावा लागायचा. मात्र एक सामना असा देखील झाला होता, जेव्हा सुनील गावस्कर यांना आठव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती.

आजच्याच दिवशी सुनील गावस्करांना आठव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले होते. अजित वाडेकर हे भारतीय संघाचे कर्णधार होते. सामना चेन्नईच्या मैदानावर सुरू होता. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करते हे जगजाहीर आहे. त्यामुळे अजित वाडेकर यांनी ४ फिरकी गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, सलीम दुर्रानी हे चार फिरकीपटू होते. तर वेगवान गोलंदाज म्हणून संघात फक्त एकनाथ सोलकर होते.

नवीन चेंडूने केली गोलंदाजी...

या सामन्यात इंग्लंड संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यामुळे सुनील गावस्कर यांनी एकनाथ सोलकर सोबत मिळून नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुनील गावस्कर यांना केवळ १ षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्यांनी ६ धावा खर्च केल्या होत्या. इंग्लंड संघाने या डावात फलंदाजी करताना २४२ धावा केल्या होत्या. या डावात किथ फ्लेचरने नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना चंद्रशेखर यांनी ६ गडी बाद केले होते. भारतीय संघाने जोरदार प्रत्युत्तर देत ३१६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मन्सूर अली खान पतौडी यांनी ७३ धावांची खेळी केली होती.

आठव्या क्रमांकावर सुनील गावस्कर आले फलंदाजीला..

दुसऱ्या डावात इंग्लंड संघाला केवळ १५९ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ ८६ धावांची गरज होती. चेतन चौहान सोबत सुनील गावस्कर सलामीला येणार होते. मात्र सुनील गावस्कर ऐवजी फारुख इंजिनियर फलंदाजीला आले होते. ८६ धावांचे आव्हान दिसते तितके सोपे नव्हते. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचे विकेट्स गेले होते. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारतीय संघाला संघाला संघर्ष करावा लागला होता. या डावात सुनील गावस्कर ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. ते ११ चेंडू खेळून एकही धाव न करता माघारी परतले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required