देशाला २ रौप्य पदक मिळवून देण्याआधी ती या अग्निदिव्यातून गेली...वाचा 'द्युती चंद'च्या अस्तित्वाचा लढा !!

जर एखाद्या विजेत्या खेळाडूचे स्पर्धेनंतर तिचे मेडल मिळाले म्हणून कौतुक करायचे सोडून तिच्या स्त्री असण्यावरच कोणी प्रश्न उपस्थित केले तर? वेळ अशी येते की कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते मदतीला देखील नव्हते. पण कुठून तरी तुमची खेळावरची श्रद्धा स्वतःवरचा विश्वास इतका पक्का असतो की कुठून तरी कोणीतरी देवदूत येतोच तुमच्या आयुष्यात. द्युती चंद च्या आयुष्यात देखील असेच देवदूत एकदा नाही दोनदा आले त्याची ही गोष्ट. 

AFI (स्रोत)

2014 मध्ये अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) ने तिला समन्स पाठवलं होते. हायपर अँड्रॉजेनिझम असल्यामुळे तिच्या स्त्री असण्यावरच प्रश्न उपस्थित केला होता. कोणतीही टेस्ट चौकशी न करता तिच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे तिला ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा इतकेच काय २०१४ च्या आशियाई स्पर्धेत सुध्दा जाते आले नाही. मुळात तिने कोणतेही उत्तेजक घेतले म्हणून ही बंदी नव्हती, तर केवळ काही चाचण्यांवर आधारित बंदी होती ही. 

हायपर अँड्रॉजेनिझम (स्रोत)

ती सच्ची खेळाडू असल्यामुळे वयाच्या १८व्या वर्षी आपली क्रीडा कारकीर्द संपू नये म्हणून तिने धाडसाने पुढचे पाउल उचलले आणि थेट कोर्ट ऑफ आर्बीट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. पायोष्णी मित्रा हिचा जेंडर इश्श्यूज इन स्पोर्ट्स हा अभ्यासाचा विषय होता. ब्रूस किड जे स्करर्बोरो या कॅनडा मधल्या विद्यापीठाचे प्रिन्सिपल आणि जेस बटिंग हा क्रीडा विषयक केसेस घेणारा वकील या तिघांनी द्यूतीला मदत करायचे ठरवले. CAS ने कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे तिच्यावरची स्त्री म्हणून खेळण्याची बंदी उठवली. त्यासाठी त्यांनी २ वर्षांची मुदत देखील दिली होती, पण AFI पुरावे देऊ न शकल्यामुळे तिला परत १०० मीटर आणि २०० मीटर womens स्पर्धेत सहभागी होता आले. इतकी मोलाची मदत करणाऱ्या जेस बटिंगने तिच्याकडून या केसची फी सुद्धा घेतली नाही. हे तिघेही तिच्या आयुष्यातले पहिले देवदूत होते.

पायोष्णी मित्रा आणि द्युती चंद (स्रोत)

आता तिला परत पहिल्यापासून सुरुवात करायची होती. या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर असणारे तिचे कोच रमेश यांनी त्यांच्या एका मित्राला पुल्लेला गोपीचंद यांना मदतीची साद घातली. आणि त्यांनीही मोठ्या मनाने ती मान्य केली. कोणतीही चूक नसताना इतके सारे भोगावे लागलेल्या या खेळाडूला शक्य तेवढी सगळी मदत करायचे गोपीचंद यांनी ठरवले. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया मध्ये राहून प्रशिक्षण शक्य होईना तेव्हा द्यूतीसाठी बॅडमिंटन अकादमीची दारे उघडली गेली आणि तिथे राहून तिचा सराव करायला लागली. 

कोच रमेश आणि द्युती चंद (स्रोत)

२०१७ पासून ती मैत्र फौंडेशन या गोपीचंद यांनी सुरु केलेल्या होतकरू खेळाडूंसाठीच्या अकादमीत सराव करत आहे, तिच्या सारखेच अजुन ३९ खेळाडू तिथे आहेत, कदाचित पुढचे ऑलिंपिक, आशियाई विजेते तिथलेच असतील. गोपीचंद हे तिच्या आयुष्यात आलेले दुसरे देवदूत ठरले. अर्थात प्रत्येकवेळी तिच्या पाठीशी उभे राहिलेले तिचे कोच रमेश नागापुरी हे तिच्यासाठी नक्कीच कोणत्याही देवापेक्षा कमी नसणार आहेत. अवघ्या २२ वर्षाच्या द्यूतीकडून नक्कीच खूप अपेक्षा ठेवता येणार आहेत. 

स्रोत

द्यूतीने जकार्ता आशियाई खेळांमध्ये २ रौप्य पदके मिळवली आहेत. २०० मीटर आणि १०० मीटर मध्ये. पण तिने दिलेला लढा. त्यासाठी झेललेल्या नजरा, अवहेलना यापुढे ते रौप्यपदक देखील सोनेरी रंगाने झळाळून निघत आहे.

 

लेखिका : मानसी होळेहोन्नुर