गोष्ट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बरोबरीत सुटलेल्या पहिल्या कसोटी सामन्याची; आतापर्यंत केवळ २ सामने सुटले आहेत बरोबरीत...

कसोटी क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटल्याचे क्वचितच पाहायला मिळते. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकदा नव्हे तर दोन वेळेस सामना बरोबरीत सुटला आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही सामने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना बरोबरीत सुटले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला बरोबरीत सुटलेला सामना १४ डिसेंबर १९६० रोजी पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमने सामने होते. तर दुसरा सामना २२ सप्टेंबर १९८६ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. हा सामना भारतीय संघ जिंकू शकला असता, मात्र शेवटच्या क्षणी हा सामना बरोबरीत सुटला. चला तर जाणून घेऊया या सामन्याबद्दल अधिक.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव..

मद्रासच्या (चेन्नई) मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या डावात ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना ७ गडी बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला होता. या धावा करण्यात डीन जोन्स, डेविड बुन आणि ॲलेन बॉर्डर यांनी मोलाचे योगदान दिले होते. जोन्सने महत्वपूर्ण खेळी करत दुहेरी शतक झळकावले होते. तर डेविड बून आणि ॲलेन बॉर्डर यांनी शतकी खेळी केली होती. 

भारतीय संघाचा पहिला डाव...

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात केलेल्या ५७४ धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३९७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या डावात १७७ धावांची आघाडी मिळाली होती. संघातील इतर फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर कपिल देव यांनी झुंज देत ११९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. 

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव...

भारताचा दुसरा डाव स्वस्तात संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १७० धावांवर घोषित करत शेवटच्या दिवशी भारतीय संघाला ३४८ धावांचे आव्हान दिले.

भारताचा दुसरा डाव..

ज्यावेळी हा कसोटी सामना सुरू होता, त्यावेळी शेवटच्या दिवशी ३४८ धावांचा पाठलाग करणं जरा कठीण होतं. मात्र सामना ड्रॉ केला जाऊ शकत होता. सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर आणि के श्रीकांत यांनी चांगली सुरुवात करून देत ५५ धावांची भागीदारी केली. के श्रीकांत बाद झाल्यानंतर सुनील गावस्करांनी अमरनाथ सोबत मिळून १०३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ विजय मिळवू शकतो असा विश्वास संघात निर्माण झाला. दुसऱ्या डावात सुनील गावस्करांनी ९०, अमरनाथ यांनी ५१, अझरुद्दीन यांनी ४२, चंद्रकांत पंडित यांनी ३९ आणि रवी शास्त्री यांनी नाबाद ४८ धावांची खेळी केली.

भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र शेवटच्या क्षणी हा सामना बरोबरीत सुटला. ३४७ धावांवर भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. मुख्य बाब अशी की, भारतीय संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवण्यासाठी केवळ ४ धावांची आवश्यकता होती. रवी शास्त्री आणि मनिंदर सिंग दोघेही फलंदाजी करत होते. पहिल्या ३ चेंडूंवर रवी शास्त्री यांनी दोन धावा केल्या होत्या. तर चौथ्या चेंडूवर १ धाव घेत मनिंदर सिंग स्ट्राईकवर आले. दोन चेंडू आणि केवळ १ धावेची आवश्यकता. असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना जिंकणार. मात्र पाचव्या चेंडूवर मनिंदर सिंग पायचीत झाले आणि हा सामना बरोबरीत सुटला. 

३ कसोटी सामन्यांची ही मालिका ०-० ने बरोबरीत सुटली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required