ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेत 'हा' खेळाडू ठरू शकतो एक्स फॅक्टर...

यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धा भारतात पार पडणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंका संघासोबत दोन हात करत आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलिया संघासोबत ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघातील चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव हा सातत्याने चांगली कामगिरी करतोय. मात्र त्याला सतत दुर्लक्ष केलं जात आहे. श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील अप्रतिम गोलंदाजी करत ३ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की," तो आधी पासूनच तिथे होता. मुद्दा फक्त आत्म विश्वासाचा आहे. आपण रोहित शर्माला आतापर्यंत पाहिलं आहे की, तो नेहमीच युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवू शकतो. आता वेळ आली की, त्याने कुलदीप यादवच्या मागे उभं राहावं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेत कुलदीप यादवची गोलंदाजी महत्वाची भूमिका बजावू शकते. जर तुम्ही त्याला संघात ठेवले आणि त्याला एकदिवसीय फॉर्मेट खेळू दिले नाही आणि तुम्ही त्याला अचानक कसोटी मालिकेसाठी आणले तर त्याला हवी तशी कामगिरी करता येणार नाही."

कुलदीप यादवला बांगलादेश विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात देखील खेळण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने फलंदाजी करताना ४० धावांची खेळी केली होती. त्याने अश्विन सोबत मिळून ८७ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर गोलंदाजीला आल्यावर त्याने ५ गडी देखील बाद केले होते. याबाबत बोलताना गौतम गंभीरने म्हटले की, " ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी कुलदीप यादवला प्रत्येक वनडे मालिका खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण तो ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या मालिकेत तो महत्वाची भूमिका बजावणार आहे. तो माझ्यासाठी आर अश्विन आणि अक्षर पटेल पेक्षा जास्त एक्स फॅक्टर खेळाडू आहे."

सबस्क्राईब करा

* indicates required