computer

जर्मनीला गेलेले श्रीलंकेचे खेळाडू रातोरात कसे गायब झाले ?

देश-विदेश फिरायला मिळावा असे कुणाला वाटत नाही? एकदा तरी आपण देशाबाहेर जाऊन बाहेरच्या लोकांचा देश पाहावा, त्यांचे राहणीमान जवळून पाहावे अशी अनेकांची तीव्र इच्छा असते आणि मग काही अतरंगी लोकं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढतात. श्रीलंकेतील काही तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी बाहेर जायचे होते. पण त्यांना परदेशात जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळत नव्हती. पण म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग. तसाच या तरुणांनीही आपला मार्ग शोधला. आता हा मार्ग कोणता होता आणि त्यावर त्यांनी कशाप्रकारे अंमलबजावणी केली हे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

तर ही घटना आहे २००४ सालची. जर्मनच्या टीव्हीएस वीटीसलिंगन स्पोर्ट्स क्लबने देशोदेशीच्या संघाना एका आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निमंत्रित केले होते. त्यांनी श्रीलंकेलाही त्यांची एखादी टीम या सामन्यांसाठी पाठवण्याची विनंती केली होती. त्यावेळी जर्मनीत होणाऱ्या या सामन्यांमध्ये सहभागी होईल अशी मजबूत व्हॉलीबॉल टीम श्रीलंकेकडे नव्हती. तेव्हा त्यांनी देशातील हॉलीबॉलची आवड असणाऱ्या तरुणांना एकत्र करून एक नवी आंतरराष्ट्रीय टीम बनवण्यास सुरुवात केली.

देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारी हॉलीबॉलची टीम बनवायची आहे अशी माहिती त्या तरुणांना मिळाली. या टीममध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या जाचक अटी पूर्ण कराव्या लागत होत्या त्या शिथिल केल्या होत्या. त्यामुळे युरोपात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या या तरुणांनी आपले नाव या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल  संघात नोंदवले. त्यांना हॉलीबॉलमधील ओ की ठो कळत नव्हता तरी श्रीलंकेने अशा तरुणांची ही टीम जर्मनीला पाठवण्याचे निश्चित केले आणि हा संघ जर्मनी दौऱ्यावर गेलासुद्धा!!

आता एका देशाकडून आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल सामना खेळायला आलेला हा संघ खरे तर खेळाडूंचा संघ नव्हताच. पण तरीही त्यांनी सुरुवातीचे काही सामने खेळले आणि अर्थातच या एकही सामन्यात त्यांना फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर- खरे तर हरल्यानंतर- अचानकच एक दिवशी २३ खेळाडूंची ही अख्खी टीम जर्मनीतून गायब झाली.

जर्मनीच्या टीव्हीएस वीटीसलिंगन स्पोर्ट्स क्लबने त्यांना दुसऱ्या दिवशी बॅव्हेरीयामध्ये खेळल्या जाणाऱ्या टूर्नामेंटसाठी तयार राहण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे हा संघ तयार आहे का हे पाहण्यासाठी या स्पोर्ट्स क्लबचा मनेजर हे खेळाडू ज्या हॉटेलवर उतरले होते तिथे गेला आणि पाहतो तर काय? त्या टीमच्या कोचसह अख्खी टीमच हॉटेलमधून गायब झाली होती. जाता जाता त्यांनी फक्त एक चिठ्ठी तिथे ठेवली होती ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “आम्ही फ्रांसला जातोय.”

आता पुढच्या सगळ्या सामन्यांचे तीन तेरा वाजले होते हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच, पण कहर म्हणजे त्या टीमने आपले न धुतलेले कपडे सोबत नेण्याइतकाही समंजसपणा दाखवला नव्हता. हॉटेलच्या लॉंड्रीतच त्यांनी ते कपडे तसेच टाकून दिले होते.

फ्रान्सवरून इटलीला पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्यांनाही आपण सुखरूप असून आपल्याला इटलीमध्ये नोकरी मिळाल्याचे कळवले.
त्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला. मात्र जर्मनीला या घटनेने जबरदस्त धडा दिला होता. इथून पुढे आपण कधीच श्रीलंकन टीमला आपल्या स्पर्धांसाठी बोलावणार नाही अशी शपथच या स्पोर्ट्स क्लबने घेतली.

२००८ मध्ये या सत्य घटनेवर आधारित एक मचान नावाचा इटालियन चित्रपटही येऊन गेला. ज्यामध्ये श्रीलंकेतून सुटून युरोपमध्ये जाण्यासाठी या तरुणांनी जो मार्ग अवलंबला त्याचे चित्रण दाखवण्यात आले आहे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required