computer

भारतात जन्मलेले आणि भारताविरुद्ध उत्तम क्रिकेट कामगिरी केलेले ६ क्रिकेटपटू!!

परवाचा अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा अशी नावे लिहिलेली जर्सी घातलेल्या चौघांचा फोटो सगळीकडे फॉर्वर्ड झाला. यात मेख अशी होती की पटेल हा न्यूझीलंडचा एजाज़ पटेल आहे आणि रविंद्रही न्यूझीलंडचाच रचिन रविंद्र आहे. थोडक्यात, ही तर भारतात जन्मलेल्या किंवा भारतीय आईबाबांच्या पोटी जन्माला आलेल्या परंतु भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंची गोष्ट आहे!!

पण मग हे असे दोघेच आहेत की आणखी कुणी आहेत, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत!! आज आम्ही भारतीय वंशाच्या अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी इतर देशांकडून खेळताना भारतीय संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केली.

एजाज़ पटेल

एजाज पटेल हे नाव नुकतेच मुंबई कसोटीत एका डावात १० बळी घेतल्यामुळे खूप गाजले. हा न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदजी करत असला तरी हा मुंबईत जन्मलेला आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात त्याचे बालपण गेले. ऑकलंडला कुटुंबासोबत तो गेला तेव्हा तो ८ वर्षांचा होता. १९९६ मध्ये तो कुटुंबासोबत न्यूझीलंडला गेला आणि तेथून क्रिकेटर म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला. एजाजने आधी वेगवान गोलंदाज म्हणून सुरुवात केली. नंतर २० व्या वर्षी त्याने फिरकी गोलंदाजी सुरू केली.
भारताविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करून १० बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.

ईश सोधी

न्यूझीलंडकडून खेळणारा ईश सोधी हा सुद्धा भारतात जन्मलेला आहे. त्याचा जन्म पंजाबच्या लुधियाना येथे झाला. सोधी फक्त ४ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. ICC T20 विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत भारत हरला याचे कारण ईश सोधी! एलिमिनेटर सामन्यात त्याने भारताविरुद्ध ४ षटकांत २/१७ चा शानदार स्पेल केला. २९ वर्षांचा हा खेळाडू न्यूझीलंडकडून आतापर्यंत १७ टेस्ट, ३३ एकदिवसीय आणि ६६ टी-20 खेळला आहे.

केशव महाराज

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू केशव महाराज याचेही भारतीय कनेक्शन आहे. त्याचे वडील अथमानंद हे भारतीय आहेत. ते सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील नताल प्रांताकडून खेळले. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघात त्यांना प्रवेश मिळाला नाही. परंतु केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून एक महत्वाचा फिरकी गोलंदाज म्हणून खेळला. फक्त गोलंदाज म्हणून नाही, तर तो फलंदाजीही करतो. ३१ वर्षांच्या या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत ३६ कसोटी, १५ एकदिवसीय आणि ६ टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १५५ विकेट्स आणि ८३५धावा आहेत.

माँटी पानेसर

गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने भारतात केवळ एकच कसोटी मालिका गमावली होती. ती 2012-13 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली गेली होती. या कसोटीत एक नाव कोणीही विसरू शकले नाही ते म्हणजे माँटी पानेसर! याने या मालिकेत १७ विकेट घेतल्या आणि इंग्लंडला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. माँटी पानेसर हा मूळचा भारतीय आहे. त्याचे आईवडील पंजाबच्या पटियाला इथले आहेत. १९७९ मध्ये ते इंग्लंडला गेले.

नासिर हुसेन

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नासेर हुसेन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिली आहे .भारतीय संघाविरुद्ध त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. ज्यामध्ये २००२ च्या नॅटवेस्ट ट्रॉफी फायनलमधील शानदार शतकाचाही समावेश होता. नासिर हुसेन यांचा जन्म भारतात झालेला आहे. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला. वयाच्या ७ व्या वर्षी तो कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये गेला. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९९३ते २००३ च्या कारकीर्दीत हुसेन यांनी इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली. 

रचिन रवींद्र

रचिन रवींद्र हे नाव अलीकडेच तुम्ही ऐकले असेल. न्यूझीलंड संघात खेळणारा या २२ वर्षांच्या डावखुऱ्या फिरकीपटूने आता पर्यंत २ कसोटी आणि ६ T-20 सामने खेळले आहेत. हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते ९०च्या दशकात न्यूझीलंडला गेले. रचिन हे नाव ठेवण्याचे कारणही याचे भारताशी असलेले नाते दाखवते. भारतीय दिग्गज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर (रा-चिन) यांच्या नावावरून हे नाव ठेवले आहे. त्याने नुकतेच २०२१मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पुढे येणारा काळ तो कसा खेळतो यावर सगळ्यांचे लक्ष असेल.

तुम्हाला या यादीत आणखी कोणते नाव सांगायचे आहे का? आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required