आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; बुमराह बाहेर तर मुख्य खेळाडूंचे झाले पुनरागमन....

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit bumrah) दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. तर माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) संघात पुनरागमन झाले आहे. विराट कोहली इंग्लंड विरुध्द झालेल्या मालिकेत खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. तर संघातील सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार केएल राहुल देखील संघात परतला आहे.

बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. तर श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडणार आहे. हा सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे.

ही स्पर्धा २७ ऑगस्ट पासून सुरू होणार असून, भारतीय संघासह आणखी सहा संघ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. यामध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान या संघांचा समावेश असणार आहे. तर उर्वरित एक संघ पात्रता फेरी जिंकून प्रवेश करेल. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सात वेळेस आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे आयोजन टी -२० फॉरमॅटमध्ये करण्यात येणार आहे.

आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा,आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि आवेश खान

राखीव खेळाडू 

श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर

भारतीय संघाचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. पाकिस्तान संघाने भारतीय संघाला २०२१ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले होते. आता भारतीय संघाकडे या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required