मे महिन्यात आय पी एल थांबवली तेव्हा कोणता संघ पुढे होता? ऑरेंज कॅप, परपल कॅप कुणाकडे होती? उजळणी करून घ्या

आजपासून आयपीएलचे धुमशान पून्हा एकदा सुरू होत आहे. मे महिन्यात कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्यामुळे अनेक आयपीएल चाहत्यांची निराशा झाली होती. आता पुन्हा आयपीएल सुरु होत असल्याने चाहते खुश आहेत. पण अनेकजण आयपीएलचे सध्याचे स्टेटस काय हे विसरून गेले आहेत. अशा सर्वांसाठी आयपीएल थांबविण्यात आले तेव्हा आयपीएलची परिस्थिती काय होती, हे वाचकांसाठी देत आहोत. 

आयपीएलच्या एकूण ६० सामन्यांपैकी २ मे २०२१ ला पंजाब आणि दिल्ली दरम्यान खेळवला गेलेला सामना हा स्पर्धा स्थगित करण्यात आली त्याआधी झालेला शेवटचा सामना होता. हा २९ वा सामना होता. याचाच अर्थ बरोबर अर्धी आयपीएल अजून व्हायची बाकी आहे. या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला होता. 

गुणतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली कॅपिटल्स ८ सामन्यांपैकी ६ जिंकून १२ गुणांसहीत पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी ७ सामन्यांमध्ये ५ जिंकून १० गुण असलेली धोनीची सिएसके आहे. तिसऱ्या स्थानी आरसीबी, चौथ्या क्रमांकावर मुंबई, पाचवी राजस्थान, सहावी पंजाब, सातवी कोलकाता तर सर्वात तळाशी आहे हैदराबाद. हैदराबादला ७ पैकी अवघा एक सामना जिंकता आलेला आहे. 

ऑरेंज कॅप ही शिखर धवनकडे आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये  ३८० धावा केल्या आहेत तर त्याच्या खालोखाल पंजाबचा केएल राहुल हा आहे. त्याने ७ सामन्यांत ३३१ धावा केल्या आहेत. धवन आणि केएल राहुलच्या धावांमधील अंतर पाहता ऑरेंज कॅप कधीही केएल राहुलकडे जाऊ शकते. 

दुसरीकडे पर्पल कॅप मात्र आरसीबीच्या हर्षल पटेलकडे आहे. आपल्या बॉलिंगने सर्वांचे लक्ष वेधुन घेतलेल्या हर्षल पटेलने ७ सामन्यांत १७ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा अवेश खान आहे. त्याने ८ सामन्यांत १४ विकेट घेतल्या आहेत. 

आता पुढे या क्रमवारीत कसा बदल होतो आणि शेवटी कोण यंदाची ट्रॉफी घेऊन जातो याकडे आयपीएलप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतील.

सबस्क्राईब करा

* indicates required