५०,१०० नव्हे तर तब्बल १९९ शतके झळकावणारा फलंदाज; हेल्मेट न घालताच करायचा गोलंदाजांची धुलाई..

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट सारखे फलंदाज जोरदार कामगिरी करत आहेत. तीनही खेळाडूंनी एकत्र सुरुवात केली आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. मात्र विराट कोहली उर्वरित २ खेळाडूंपेक्षा २ पाऊल पुढे आहे. त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट येण्यापूर्वी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, डॉन ब्रॅडमन आणि रिकी पाँटिंग सारखे दिग्गज फलंदाज होऊन गेले. ज्यांना आजही संपूर्ण क्रिकेट विश्व सलाम ठोकतं.

मात्र क्रिकेट इतिहासात असा एक फलंदाज होऊन गेला, ज्याची बरोबरी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि डॉन ब्रॅडमनला देखील करता आली नाही. या खेळाडूचं नाव आहे,जॅक बॅरी हॉब्स. इंग्लडचा फलंदाज जॅक बॅरी हॉब्सच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके झळकावली आहेत.

जॅक हॉब्सने आपल्या कारकिर्दीत एकूण ८३४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. ज्यात त्याने ५०.७० च्या सरासरीने ६१७६० धावा केल्या. यादरम्यान हॉब्सने १९९ शतके झळकावली. हॉब्स शिवाय इतर कुठल्याही फलंदाजाला असा विक्रम करता आला नाहीये.

४६ व्या वर्षी झळकावले शतक...

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावांचा विक्रम करण्यासह वयाच्या ४६ व्या वर्षी शतक झळकवण्याचा विक्रमही जॅक हॉब्सच्या नावे आहे. वयवर्ष ५० असताना देखील ते गोलंदाजांचा घाम काढायचे. हेच कारण आहे की त्यांना द मास्टर देखील म्हटलं जायचं. तसेच त्यांच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ६१ सामन्यांमध्ये ५४१० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी १५ शतके झळकावली. तर २११ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.

डॉन ब्रॅडमनला देखील सोडलय मागे...

क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन सारखा दुसरा कुठलाच फलंदाज झाला नाहीये. डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण २३४ सामने खेळले. ज्यात त्यांनी २८०६७ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी ११७ शतके झळकावली. तर कसोटी क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांनी ५३ कसोटी सामन्यांमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी एकूण २९ शतके झळकावली होती.

काय वाटतं, असा कुठला फलंदाज आहे जो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जॅक हॉब्सचा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required