ड्रेसिंग रूम किस्सा भाग ३ - जेव्हा चक्क प्रशिक्षकाने वीरेंद्र सेहवागला केली होती धक्काबुक्की, वाचा तो किस्सा

भारतीय क्रिकेटपटुंच्या आयुष्यातील अनेक किस्से आपल्या सोशल मीडियाद्वारे ऐकायला मिळतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची माहिती ते सोशल मीडियावर फोटोज् किंवा व्हिडिओ शेअर करत देत असतात. परंतु सामना सुरू असताना ड्रेसिंग रूममध्ये काय घडतंय? याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसते. तुम्हाला ही ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडतंय हे किस्से जाणून घ्यायची उत्सुकता असेलच. बोभाटाच्या ड्रेसिंग रूम किस्सा या मालिकेतील तिसऱ्या भागात वीरेंद्र सेहवाग सोबत २००२ मध्ये घडलेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय संघ २००२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होता. इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये नेटवेस्ट मालिका सुरू होती. त्यावेळी आपला विरू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीनच होता. तर जॉन राईट (John wright) हे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होते. वीरेंद्र सेहवाग आपल्या विस्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध होता. निडरपणे फलंदाजी करत असताना तो खराब शॉट खेळून बाद होता. त्यामुळे फलंदाजीला जाण्यापूर्वी जॉन राईट यांनी वीरेंद्र सेहवागला बजावून सांगितले होते की, खराब शॉट खेळून बाद होऊ नकोस.

परंतु वीरेंद्र सेहवाग कसला ऐकतोय, त्याने तेच केलं जे त्याला करायचं होत. फलंदाजी करताना त्याने खराब शॉट खेळला आणि बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्यावेळी जॉन राईट त्याची ड्रेसिंग रूममध्येच वाट पाहत बसले होते. वीरेंद्र सेहवाग ड्रेसिंग रूममध्ये येताच जॉन राईट यांनी त्याला ओरडायला सुरुवात केली. तसेच रागात त्याची कॉलर पकडून त्याला मागे ढकलले होते. हे प्रकरण भरपूर चर्चेत देखील आले होते. ही बातमी माध्यमांपर्यंत देखील पोहोचली होती. जॉन राईट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २००३ विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

तसेच वीरेंद्र सेहवागच्या (virender sehwag) कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०४ कसोटी सामने खेळले. ज्यात त्याने ४९.३४ च्या सरासरीने एकूण ८५८६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २३ शतक आणि ३२ अर्धशतक झळकावले. तसेच वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, २५१ वनडे सामन्यात त्याने ३५.०६ च्या सरासरीने एकूण ८२७३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १५ शतक आणि ३८ अर्धशतक झळकावले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required