computer

भारताला बॉक्सिंगमध्ये मेडल जिंकवून देणारी लवलीना बोर्गोहेन आहे तरी कोण?

कालच मेरी कोमच्या पराभवाने क्रीडा रसिकांना हळहळ वाटली. पण तोच, आज सकाळी एक आनंदाची बातमी आली की लवलीना बोर्गोहेनने भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. तिने बॉक्सिंगमध्ये सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित आहे. लवलीना ही ऑलिम्पिकमध्ये पोहोचणारी पहिली आसामची महिला अ‍ॅथलीट आहे. ही लवलीना आहे कोण? तिची आज आपण ओळख करून घेऊयात.

लवलीनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ साली आसाम येथील गोलाघाटमध्ये झाला. तिला दोन मोठ्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघीही राष्ट्रीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत खेळल्या आहेत. किक-बॉक्सिंग मध्ये खेळाडू मुक्का मारतो आणि लाथ ही मारू शकतो. लवलीनाही सुरुवातीला किक-बॉक्सिंग करत होती. मात्र काही काळाने ती बॉक्सिंगकडे वळली. ती ६९ किलो (वॉल्टरवेट) वजनी गटात खेळते. तिची ऑलिम्पिकच्या आधीची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. तिने २०१७ मध्ये आशियाई स्पर्धा (कांस्य), २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (कांस्य), २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा (कांस्य), २०२१ आशियाई स्पर्धा (कांस्य) या स्पर्धांमध्ये पदक मिळवले आहे. तसेच २०२० मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मागच्या वर्षी जॉर्डन येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत लवलीनाने उझबेकिस्तानच्या माफटूनखॉन मेलिएव्हाचा पराभव केला होता. या विजयासह तिने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला होता. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी लवलीना ही आसामची पहिलीच बॉक्सर होती. मेरी कोम ही तिचे प्रेरणास्थान. ओलीम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यावर आसाममध्ये मेरी कोमची पोस्टर्स लावली होती. पोस्टर्सचा असा परिणाम झाला की राज्याच्या बॉक्सिंग अकादमींमध्ये अचानक मुलांचा पूर आला. आसाममधील प्रत्येक चौथ्या मुलाला बॉक्सर बनायचे होते आणि त्यात खूप मुली होत्या.

पूर्वी राज्यातील मुली बॉक्सिंगमध्ये जात नव्हत्या. लवलीना तेव्हा शाळेत शिकत होती. चांगल्या खेळाडूंच्या शोधात असताना किकबॉक्सर लवलीना शालेय बॉक्सिंग चाचण्यांमधून उचलून थेट सब ज्युनियर नॅशनलमध्ये महाराष्ट्रात पाठवण्यात आले आणि या निवडीनंतर जवळजवळ लगेचच, लवलीनासह अनेक मुलींना गुवाहाटी बॉक्सिंग केंद्रात पाठवण्यात आले. गुवाहाटीला आल्यानंतर या किकबॉक्सरने बॉक्सिंगला सुरुवात केली आणि त्यासाठी फक्त सुरुवात करण्याची गरज होती कारण त्यांच्याकडे बॉक्सिंगसाठी आवश्यक गोष्टी आधीच होत्या. प्रशिक्षक पदम बोरो यांच्या मते तिचा लढाऊ बाणा, शारीरिक संतुलन व तग धरण्याची क्षमता पाहून प्रशिक्षक पदम बोरो यांना तिच्या क्षमतेचा अंदाज आला. मग सुरुवात झाली कडक प्रशिक्षणाची.

२०१६ पासून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी खेळण्यास सुरुवात केली. २०१८ साली कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात होणार होते. सर्व खेळाडू तयारी करत होते आणि लवलीनाची निवड झाल्यावर ती गोल्ड कोस्टमध्ये गेली. पण तिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.
पण त्याचा बदला तिने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून घेतला आणि त्यानंतर पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले. या दोन पदकांमुळे लवलीनाचा आत्मविश्वास वाढला.

आता तिने आधीच टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. पुढच्या सामन्यानंतर ठरेल ती कोणते पदक जिंकेल, रौप्य किंवा सुवर्ण? तिचे डोळे सुवर्ण पदकावर आहेत. पदकाबद्दल म्हणणे ऐकले की तिचे अजून कौतुक वाटते , कारण ती म्हणते, " मेडल तो गोल्ड ही होता है"

इस लडकीके खेलने दिल जीत लिया है, सिर्फ गोल्ड लाना बाकी है! All the best लवलीना!

सबस्क्राईब करा

* indicates required