computer

बूट घेण्यासाठीही पैसे नसलेल्या रेवतीने टोकियो ऑलेम्पिकमध्ये धडक कशी मारली? तिची यशोगाथा डोळ्यात पाणी आणेल!!

भारताकडून टोक्यो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या बऱ्याच खेळाडूंमध्ये एक साम्य बघायला मिळत आहे. ते म्हणजे अतिशय खडतर परिस्थिती असूनही आपल्या मेहनतीच्या जीवावर या लोकांनी ऑलिम्पिकपर्यंत धडक मारली आहे. आज अशाच एका खेळाडूची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत.

रेवती वीरामणी या धावपटू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तमिळनाडूच्या रेवती या ७ वर्षे वयाच्या असतानाच त्यांचे वडील वारले तर पुढील एका वर्षात आईचेसुद्धा निधन झाले. रेवती आणि त्यांच्या बहिणीची  जबाबदारी आता त्यांच्या म्हाताऱ्या आजीवर येऊन पडली होती.

रेवती आणि त्यांच्या बहिणीला त्यांच्या आजीने मजुरी करून वाढवण्यास सुरुवात केली. रेवती यांना लहानपणापासून धावण्यात असलेली आवड बघून त्यांच्या आजीने आपली मेहनत वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले. रेवती यांना मात्र धावण्यासाठी बूट घ्यायलाही पैसे नव्हते. त्यांनी बुटांशिवाय आपला सराव सुरू ठेवला.

रेवती यांनी विनाबुटांच्या अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला. त्यांची प्रतिभा मात्र कानन नावाच्या प्रशिक्षकाने ओळखली. त्यांना जेव्हा समजले की आई-वडिलांशिवाय वाढणाऱ्या मुलीला तिची आजी धावपटू होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अशावेळी त्यांनी स्वखर्चाने रेवती यांना बूट घेऊन दिले. कॉलेज फीसुद्धा त्यांनी भरली. 
 
या काळात मात्र रेवती आणि त्यांच्या आजीला समाजाकडून प्रचंड टोमणे मिळत असत. मुलगी असून तिला धावण्यासाठी पाठवते म्हणून लोक त्यांच्या आजीला नावे ठेवत. मात्र आजी काय बधली नाही. पुढे रेवती यांना चांगले सहकारी भेटले. त्यांनी वेळोवेळी त्यांना मदत केली.

रेवती यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या, त्याचे फळ म्हणून त्यांना दक्षिण रेल्वेत नोकरी मिळाली. पण एवढ्यावर संतुष्ट होणे रेवती यांना पसंत नव्हते. त्यांनी प्रॅक्टिस सुरू ठेवली. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांनी ४००मीटरची रेस अवघ्या ५३.५५ सेकंदात पार करत ऑलिम्पिक स्पर्धांच्या मार्गावर पाऊल ठेवले. 

आज रेवती २३ वर्षांची आहे. तिच्याकडे आता आशेने बघितले जात आहे. पहिलेच ऑलिम्पिक असल्याने तिच्याकडे अनुभव नसला तरी जिद्द मात्र मोठी आहे. याच धधाडीच्या जीवावर तिने पदक खेचून आणले तर आश्चर्य वाटणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required