विराट अन् रोहितला एका सामन्यासाठी लाखो रुपये मानधन तर १९८३ साली भारतीय खेळाडूंना मिळायचे केवळ इतकेच मानधन

क्रिकेट हा भारतीयांसाठी केवळ एक खेळ नव्हे तर धर्म आहे. या खेळाशी अनेकांच्या भावना जोडल्या आहेत. भारतीय संघ परदेशात खेळण्यासाठी गेला असेल तरिदेखील भारतीय त्यांना समर्थन करण्यासाठी परदेशात जात असतात. ज्यांना तिथे जाऊन समर्थन करणं शक्य होत नाही ते चाहते पहाटे ४ वाजता टीव्ही समोर बसून सामन्याचा आनंद घेत असतात. १९८३ साली जेव्हा भारतीय संघाने विश्वचषकाला गवसणी घातली त्यावेळी संपूर्ण भारताने रेडीओद्वारे सामन्याचा आनंद घेतला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय संघाने असा कारनामा केला होता. परंतु त्यावेळी भारतीय संघाला एक सामना खेळण्यासाठी किती मानधन मिळायचे माहीत आहे का? चला तर या लेखातून याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड पैकी एक आहे. हेच कारण आहे की, भारतीय संघासाठी खेळणारे खेळाडू काही वर्षातच कोट्यावधींची कमाई करत असतात. या खेळाडूंची विभागणी ए प्लस, ए, बी आणि सी या श्रेणीत केली जाते. तसेच त्यांना वार्षिक मानधन देखील ठरलेल्या श्रेणी नुसार दिले जाते. ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये वार्षिक मानधन दिले जाते.

तसेच एका सामन्यातील मानधनाबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मानधन दिले जाते. तसेच वनडे सामन्यासाठी प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपये आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये मानधन दिले जाते. तसेच १९८३ रोजी भारतीय संघातील खेळाडूंना वनडे क्रिकेट खेळण्यासाठी केवळ १५०० रुपये मानधन दिले जात होते. या संघाचे कर्णधारपद कपिल देव यांच्या हाती होते. तसेच या संघाचे संगव्यवस्थापक बिशन सिंग बेदी यांना देखील १५०० रुपये मानधन दिले जात होते.

सबस्क्राईब करा

* indicates required