computer

२०१६ सालची अतिशय वाईट कामगिरी ते यंदा रौप्य पदक....मीराबाई चानू यांचा प्रवास प्रेरणादायी आहे!!

ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळी भारतीय खेळाडूंच्या पदकांच्या संख्येत वाढ व्हावी याकडे डोळे लावून बसलेल्या भारतीयांना स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी चांगली बातमी मिळाली. मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले आहे. 

अवघी ४ फूट ११ इंच उंची असलेल्या मीराबाई यांची मागच्या ऑलिम्पिकमधील अतिशय वाईट कामगिरी पाहता यावेळी त्या पदक मिळवतील का याकडे संशयाने बघितले जात होते, पण सर्वांचे अंदाज खोटे ठरवत मीराबाई यांनी 'हार कर जितने वाले को बाजीगर कहते है', ही गोष्ट सिद्ध केली. 

भारताला २००० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवून दिले होते. पण गेली २० वर्ष या खेळात पदकाचा दुष्काळ होता, मीराबाई यांनी तो दूर केला आहे. 

मीराबाई यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी मणिपूर राज्याची राजधानी इंफाळपासून २०० किलोमीटर दूर असलेल्या नोंगपेक काकचिंग या खेड्यात झाला. लहाणपणी त्यांना कुठल्याही सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. इशान्य भारतातील सर्वसामान्य नागरिकांना जो संघर्ष करावा लागतो, तोच त्यांच्याही वाटेला आला होता. 

लहानपणी त्यांना बांबूची लाकडे उचलून इकडून तिकडे घेऊन जावी लागायची इथेच त्यांचा सराव सुरु झाला असे म्हणता येईल. खेळात आपण करियर करावे असे त्यांना वाटत होते. सुरुवातीला त्यांना नेमबाजीत आवड निर्माण झाली, पण ७वीत असताना त्यांनी भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू कुंजराणी देवी यांच्यावर धडा वाचला आणि त्यांनी वेटलिफ्टिंग हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनविले. 

२००७ साली त्यांनी खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा ना कुठली ट्रेनिंग होती, ना वजन उचलण्यासाठी योग्य अशी साधने होती. कुठल्याही खेळासाठी योग्य डायटचे मोठे महत्त्व असते. पण एका गरीब घरातील मुलीला हेही परवडण्यासारखे नसते. अशाही परिस्थितीत त्यांनी हिंमत सोडली नाही. 

मीराबाई ११ वर्षांच्या असताना त्यांना पहिले यश दिसले. त्या अंडर १५ चॅम्पियन झाल्या. पुढे तर ज्या कुंजराणी यांचा आदर्श घेऊन त्या खेळात उतरल्या त्यांच्याच नावावर असलेला १९२ किलो वजन उचलण्याचा विक्रम त्यांनी मोडला. २०१४ साली त्यांनी ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. पण २०१६ चे ऑलिम्पिक हे त्यांच्यासाठी एखाद्या दुस्वप्नासारखे होते. एखादा खेळाडू हरला त्यापेक्षा नामुष्कीजनक असते त्याने खेळ जर पूर्ण केला नाही तर, मीराबाई यांच्या बाबतीत असेच झाले. लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना जे वजन आधी मीराबाई सहज उचलू शकत होत्या, ते त्या उचलू शकल्या नाहीत आणि त्यांच्या नावापुढे लिहिले गेले 'डिड नॉट फिनिश' !!

देशभर त्यांच्यावर टीका सुरू झाली. यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. एवढेच काय त्यांना यासाठी डॉक्टरकडे जावे लागले. त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा डाग पुसण्यासाठी त्यानी खेळत राहणे गरजेचे आहे, हे त्यांना त्यांच्या कुटूंबाने पटवून दिले. त्यांनी पुन्हा जोरदार प्रॅक्टिस सुरू केली. वजन संतुलित ठेवण्यासाठी त्या जेवत देखील नसत. प्रॅक्टिसमध्ये खंड पडू नये म्हणून आपल्या सख्या बहिणीच्या लग्नात त्या गेल्या नाहीत. या मेहनतीचे पहिले फळ त्यांना २०१८ साली ऑस्ट्रेलिया येथे सुवर्णपदक जिंकून मिळाले, तर यंदा त्यांनी थेट ऑलिम्पिकला गवसणी घातली आहे.

मीराबाई चानू यांचा हा प्रवास एखाद्या सिनेमाला शोभावा असा आहे, कदाचित त्यांच्यावर सिनेमा येईलही पण मीराबाई यांचा प्रवास इथेच संपणारा नाही, त्यांनी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे ध्येय बाळगले आहे. त्यांचे हे ध्येय पुढच्यावेळी पूर्ण व्हावे याच बोभाटाकडून शुभेच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required