नॅशनल रेसलिंग चँपियनशिप : चला, महाराष्ट्राच्या या ३० खेळाडूंना सपोर्ट करूयात..

दंगल सिनेमा तुम्ही पाह्यला असेलच. त्यात गीता सिनीयर नॅशनल रेसलिंग चँपियनशिप जिंकते आणि मग पटियालाच्या नॅशनल स्पोर्ट्स ऍकॅडमीत जाते. तर आता तीच सिनीयर नॅशनल रेसलिंग चँपियनशिप होऊ घातलेय. स्पर्धा चालू होतेय १४ नोव्हेंबरला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे एकूण ३० खेळाडू सामील होणार आहेत. जाणून घ्या या स्पर्धेचं महत्त्व काय आहे आणि ही स्पर्धा जिंकणार्‍या खेळाडूला पुढे काय लाभ होणार आहे ते..

बोभाटा  महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगच्या सौजन्याने लेखमालिकांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेच्या जगात घेऊन जाणार आहे. या स्पर्धेतल्या रोजच्या घडामोडींवर आमच्या बरोबरीने तुम्हीही नजर ठेवा.. या सर्व खेळाडूंना आपण एकत्रितपणे साथ देऊया.


कुस्तीगीर खाशाबा जाधव (स्रोत)

१९५२ साली खाशाबा जाधवांनी ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पदक जिंकलं आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे अनेक मल्ल घडू लागले. आधीच्या स्पर्धा फक्त गावोगावीच्या जत्रा आणि उरूस इथंपर्यंतच मर्यादित होत्या. त्यानंतर मात्र इतर स्पर्धांसाठीही कुस्त्या रंगायला लागल्या. मग काय,  कुस्तीकडे पाहण्याचा लोकांचा आणि खेळाडूंचाही दृष्टीकोन बदलायला लागला. गावोगावच्या लढती जितक्या महत्त्वाच्या, तितक्याच स्पर्धाही महत्त्वाच्या.. हा विचार मनात रुळणार्‍यांची संख्या वाढायला लागली.

पण मग आधी कुणी स्पर्धांना महत्त्व देत नसे का ? तर, नाही. पण, आधीपेक्षा टक्का आणि भान दोन्हीही वाढलं. त्यामुळं मग ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांभोवतीचं वलय अधिक वाढू लागलं. स्पर्धांचं रूपडं बदललं, त्या क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधू लागल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंच्या मनात घर करू लागल्या.


कुस्तीगीर हरिश्चंद्र माधव बिराजदार (स्रोत)

इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये मेडल्स मिळवायची तर आधी देशातल्या सर्वोच्च सर्वोच्च अशा वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेला सामोरं जाणं ही गरज असल्याचं खेळाडूंच्या लक्षात येऊ लागलं. ही वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीस्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीचा गेटपास. शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार यासारख्या मानाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी ग्राह्य धरलं जाणारं आवश्यक असं यश. त्यामुळे मुळातच ही स्पर्धा आपली वेगळी शान राखून आहे. आता तर इथं स्पर्धा इतकी वाढलीय, की ती जिंकणं सोपं राहिलं नाहीय. त्यामुळं ही स्पर्धा खेळाडूंसाठी अधिकच महत्त्वाची झालीय.

तर मंडळी, येत्या १४ ते १७ नोव्हेंबर रोजी इंदौरमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. कुस्तीचे तीन गट यात पाडले गेले आहेत-  फ्रीस्टाईल, ग्रीकरोमन आणि महिला गट. या तीन गटांतून एकूण ३० खेळाडू महाराष्ट्राकडून रिंगणात उतरणार आहेत.  राज्यस्तरीय म्हणजेच जे स्टेटलेव्हलला कुस्ती जिंकतात, त्या विजेत्यांना या स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत सहभागी होता येतं. पण पुढची निवड सोपी नाहीय. आपल्या देशात भारतीय कुस्ती महासंघ आहे. त्याच्यासोबत २८ राज्यं जोडली गेली आहेत. या २८ राज्यांमधून प्रत्येक वजनी गटातून एक खेळाडू यासाठी निवडला गेलाय.


कुस्तीगीर मारुती ज्ञानू माने (स्रोत)

आता या स्पर्धेत या २८ राज्यांमधले सरस खेळाडू चार फेर्‍या पार करत अंतिम फेरीत पोहोचतील. अंतिम फेरीतल्या चुरशीच्या लढतीतून विजयी ठरलेलेखेळाडू भारतीय कुस्ती महासंघाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या निवड चाचणीत सहभागी होतील. गेल्या वर्षीप्रमाणे सुवर्ण कामगिरी कायम ठेवण्याचं, राज्याच्या अपेक्षा पेलण्याचं आव्हान या आपल्या ३० मावळ्यांसमोर आहे. ही पदकं केवळ एक-दोन वर्षांच्या प्रयत्नांनी मिळत नसतात. त्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या आवश्यक असते. गेल्या वर्षी रेश्मा माने हिनं महाराष्ट्राचं सुवर्णखातं उघडलं होतं. त्यामुळे यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या खेळाकडे आशेनं पाहिलं जात आहे. या स्पर्धेत पदक मिळालं तर इंटरनॅशनल स्पर्धांची कवाडं उघडी करून घेण्याचं ध्येय खेळाडूंसमोर आहे. त्यांची स्पर्धा इतरांइतकीच स्वत:शीही असणार आहे. त्यात ते जिंकले तरच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोहोचण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल.

तर मंडळी, आपण या आपल्या ३० मावळ्यांना नॅशनल स्पर्धा जिंकण्यासाठी आणि पुढे इंटरनॅशनल लेव्हलला पुढे जाण्यासाठी आपल्या शुभेच्छा त्यांना देऊयात.

 

महाराष्ट्र रेसलिंग चॅंपियन्स लीग काय आहे ?


(स्रोत)

MWCL म्हणजेच महाराष्ट्र रेसलिंग चॅंपियन्स लीग ही मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद इथल्या मल्लांची एक कुस्ती लीग स्पर्धा असेल. कुस्तीचं पुनरूज्जीवन आणि या खेळाडूंची २०२०च्या ऑलिंपिक स्पर्धांची तयारी हे या लीगचं उद्दिष्ट आहे.