आयसीसीच्या नियमांमध्ये मोठे बदल!! १ ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या या नियमांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी )(ICC) मंगळवारी (२० सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली आहे. येत्या १ ऑक्टोबर पासून क्रिकेटच्या नियमांमध्ये ८ मोठे बदल केले जाणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली असलेल्या पुरुष क्रिकेट समितीने एमसीसीच्या (मेरीलबोन क्रिकेट क्लब) नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. या मागणीला महिला क्रिकेट समितीचा देखील पाठिंबा मिळाल्याने आता क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे नवे नियम १ ऑक्टोबर पासून लागू करण्यात येणार आहेत. म्हणजेच येणाऱ्या टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत या नव्या नियमांनुसार सामने खेळवले जातील. चला तर नव्या नियमांबाबत जाणून घेऊया अधिक माहिती. (New rules introduced by icc in international cricket)

१) फलंदाज झेल बाद झाल्यास नवीन येणारा फलंदाज स्ट्राइक घेणार. यापूर्वी जेव्हा फलंदाज झेल बाद व्हायचा त्यावेळी स्ट्राइक बदलल्याने फलंदाजाला दुसऱ्या टोकाला जावे लागायचे मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

२) कोरोनाच्या काळात २ वर्षे क्रिकेट खेळण्यावर बंदी होती. मात्र जेव्हा क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झाले त्यावेळी काही बंधने लादण्यात आली होती. त्यापैकीच एक बंदी म्हणजे चेंडूवर लाळेचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. गोलंदाज चेंडूला चकचकीत ठेवण्यासाठी लाळेचा वापर करतात. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळेचा वापर करण्यास कायमची बंदी घालण्यात आली आहे. 

३) नवीन फलंदाजाला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राइक घेण्यासाठी २ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तर टी -२० क्रिकेटमध्ये ९० सेकंदांचा अवधी दिला जाणार आहे. यापूर्वी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये नव्या फलंदाजाला स्ट्राइकवर येण्यासाठी ३ मिनिटांचा अवधी दिला जायचा.

४) गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला तर तो चेंडू डेड म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच फलंदाजाला जर एखादा चेंडू खेळपट्टी सोडण्यास भाग पाडत असेल तर तो चेंडू नो चेंडू घोषित करण्यात येईल.

५) जर गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत असताना क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूंनी काही अनुसूचित हालचाली किंवा चुकीचे वर्तन केले तर तो चेंडू डेड घोषित केला जाईल. तसेच फलंदाजी करत असलेल्या संघाला ५ धावा पेनल्टी स्वरूपात दिल्या जातील.

६) जर गोलंदाज गोलंदाजी करत असेल आणि फलंदाज क्रिझच्या बाहेर असेल तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. यापूर्वी असे करणे चुकीचे समजले जायचे.

७) टी -२० क्रिकेटमध्ये आता वनडे क्रिकेटमध्ये देखील षटक पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन असणार आहे. जर गोलंदाजी करत असलेल्या संघाने षटक नियोजित वेळेत पूर्ण न केल्यास, १ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या आत ठेवणे बंधनकारक असणार आहे.

हे नियम येत्या १ ऑक्टोबर पासून लागू केले जाणार आहेत. तुम्हाला जर आयसीसीच्या एका नियमात बदल करण्याची संधी मिळाली, तर तो कुठला नियम असेल? कमेंट करुन नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required