computer

ऑलिंपिक २०१६ : ११ ऑगस्टला भारताचा सहभाग-बॅडमिंटनच्या वारीला सुरूवात, आज मात्र पदकाची आशा मात्र धूसर

कालचे महत्त्वाचे निकालः

काल नेमबाजीमध्ये 'जितू राय' व 'प्रकाश नंजप्पा'ने क्वालिफिकेशनची फेरी पार केली नाही. त्यांना अनुक्रमे १२ व्या व २५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

महिला तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे दीपिका कुमारीने दोन सामने जिंकत ६४ जणांच्या फेरीतून ३२ व ३२ जणांच्या फेरीतून पहिल्या १६ जणांच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे बोम्बायला देवीनेसुद्धा तिच्याकडून असलेल्या अपेक्षांच्यापेक्षा सरस कामगिरी करत पहिल्यांदाच १६ जणांच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. 

भारोत्तोलन अर्थात वेटलिफ्टिंग पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात भारताच्या सतिश शिवलिंगम याला त्याच्या गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुरुष ज्युडोच्या ९० किलो वजनी गटात अवतार सिंग याला थेट पाठ टेकवून पहिल्याच फेरीत मात मिळाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.

महिला हॉकीमध्येही ऑस्ट्रेलियाने भारतावर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणे आता अधिक कठीण झाले आहे.

पुरुष बॉक्सिंगच्या ८४ किलो वजनी गटात मनोज कुमारने पहिली फेरी जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

 

आज काय?:

ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून सहाव्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल. 

गोल्फः

अनिर्बन लाहिरी व शिव चौरसिया पुरुष गोल्फ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करतील. 

बॅडमिंटनः

महिला दुहेरी गट सामन्यांना आज सुरूवात होईल. त्यात भारताच्या अश्विनी पोनप्पा व ज्वाला गट्टाचा सामना आपल्या गटातील जपान संघाशी होईल.

पुरुष दुहेरी गट सामन्यांनाही आज सुरूवात होईल. त्यात भारताच्या बी.एस.रेड्डी आणि एम.अत्री यांच्या संघाचा सामना इंडोनेशियन संघाशी होईल.

 

महिला एकेरीच्या गट सामन्यात. पी.व्ही सिंधुचा सामना हंगेरीच्या लॉराशी संध्याकाळी ६:४० ला होईल, तर ७:५० ला आज सायना नेहवाल आपला पहिला गट सामना ब्राझीलच्या खेळाडूशी खेळेल.

पुरुष एकेरीच्या गट सामन्यात. श्रीकान्त कदम्बीचा सामना मेक्सिकोच्या लिनो मुनोझशी पहाटे ५:३५ ला होईल.

टेनिस:

टेनिसमध्ये जरी पुरुष दुहेरी व महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले असले तरी मिश्र दुहेरीच्या स्पर्धांना आज सुरूवात होत आहे. आज भारताच्या सानिया मिर्झा व बोपन्नाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाशी होईल. 

हॉकी:

संध्याकाळी ६:३० वाजता पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघ नेदरलँडला भिडेल. भारताने आधीचा सामना जिंकत आधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

पहाटे ४:०० वाजता महिला हॉकीमध्ये भारतीय संघ अमेरिकेला भिडेल. भारताला आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.

तिरंदाजी:

महिला तिरंदाजी स्पर्धांत दीपिका कुमारी व  बोम्बायाला देवी शेवटच्या सोळा जणांमध्ये नॉक आउटपद्धतीने सामने खेळतील. जर त्या सामने जिंकत गेल्या तर दिवसाच्या अखेरीस त्या पदकासाठी खेळतील.

पदकाच्या अपेक्षा:

आज ज्या स्पर्धांमध्ये पदके प्रदान होणार आहेत त्यापैकी केवळ तिरंदाजीमध्ये भारताचा सहभाग असू शकेल. यात दीपिका व बोम्बायला अशा दोघीजणी अंतिम १६मध्ये पोचल्या आहेत. पैकी दीपिका व बोम्बायला यांनी असाच खेळ चालू ठेवला तरी कोरीया व तैपेयीच्या खेळाडूंपुढे त्यांचा पाड लागणे कठीणच आहे. अर्थात आपण आशा ठेवायला हरकत काहीच नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required