बॅटिंग किंवा बॉलिंग न करताही या खेळाडूला ‘मॅन ऑफ दि मॅच’ का देण्यात आलं ?

ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा ‘मॅन ऑफ दि मॅच’ हे नेहमी बॅट्समनला दिलं जायचा. तसा बॉलरला पण मान होता पण क्वचितच एखाद्या बॉलरला ‘मॅन ऑफ दि मॅच’ घोषित केलं जायचं. फिल्डरबद्दल तर काही विचारायलाच नको. फिल्डर हा टीममधला अत्यंत दुर्लक्षित घटक होता. १९८६ सालच्या एका सामन्यात मात्र तोपर्यंतचा सगळा इतिहास बदलला. पहिल्यांदाच एका फिल्डरला ‘मॅन ऑफ दि मॅच’घोषित करण्यात आलं होतं.
काय घडलं होतं त्या दिवशी ?
२८ नोव्हेंबर, १९८६ रोजी शारजाह येथे पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीजचा सामना होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दुसरा सामना होता. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन इम्रान खानने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओपनर म्हणून सलीम युसुफ आणि मुदस्सर नझर दोघे मैदानात आले.
यावेळी वेस्ट इंडीजच्या टीममधला ‘गस लोगी’ काही वेगळ्याच मूड मध्ये खेळायला आला होता. तो टीममधला सामान्य फिल्डर होता, पण त्या दिवशी त्याने एक हाती सामना जिंकवून दिला. जेमतेम १५ धावा पूर्ण होण्याच्या आतच दोन्ही ओपनर्सना गस लोगीने कॅच आउट केलं होतं.
(गस लोगी)
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला पाकिस्तानचा सर्वात अनुभवी जावेद मियांदाद ३२ रन्सवर रन आउट झाला. हा क्षण फार महत्त्वाचा होता. जावेद मियांदाद हा वेगवान धावांसाठी प्रसिद्ध होता, पण मियांदादने धावा पूर्ण करण्याच्या आतच गस लोगीने विजेच्या वेगाने बॉल स्टंपच्या दिशेने फेकला होता.यानंतर आलेल्या कोणत्याही बॅट्समनला १५ रन्सच्या पुढे जाता नाही आलं.
२ कॅचेस आणि १ रन आउट नंतर सगळ्यांचं लक्ष गस लोगीवर होतं, पण गोष्ट इथेच संपणार नव्हती. या पठ्ठ्याने पुढे १ कॅच आणि १ रन आउट करून आपल्या खात्यात एकूण ५ विकेट सामील केले होते. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानला जेमतेम १४३ रन्स पूर्ण करता आले. एवढ्या कमी धावांचं लक्ष पूर्ण करणे त्यावेळच्या बलाढ्य वेस्ट इंडीज टीमसाठी फारच सोप्पी गोष्ट होती.वेस्ट इंडीजने सामना ९ विकेट राखून जिंकला.
(जावेद मियांदाद)
महत्त्वाची बाब म्हणजे गस लोगीने त्या सामन्यात बॅटिंग किंवा बॉलिंग केली नव्हती. त्याने मिळवलेल्या ५ महत्त्वाच्या विकेट्समुळे इतिहासात पहिल्यांदाच एका फिल्डरला ‘मॅन ऑफ दि मॅच’गोषित करण्यात आलं. गस लोगी हा ‘फ्लायिंग कॅरिबियन’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध झाला.